वाळवी (ओडोण्टोटर्मिस ओबेसस)

(टर्माइट). एक उपद्रवी कीटक. वाळवीचा समावेश संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या आयसॉप्टेरा (सदृशपंखी) गणाच्या टर्मिटिडी कुलात करतात. वाळवीला ‘पांढऱ्या मुंग्या’ असेही म्हणतात. वाळवीचा प्रसार जगात सर्वत्र आहे. वाळवीची सहा कुले असून सु. दोन हजार जाती आहेत. भारतात त्यांच्या सु. २६० जाती आढळून येतात. त्यांपैकी प्रामुख्याने आढळणाऱ्या वाळवीचे शास्त्रीय नाव ओडोण्टोटर्मिस ओबेसस आहे.

वाळवीच्या शरीराचे डोके, धड, उदर असे तीन भाग असतात. डोके लहान असून त्यावर स्पर्शकांची एक जोडी असते. स्पर्शक अनेक खंडांचे असून मणिरूपी असतात. संयुक्त नेत्रांची आणि साध्या नेत्रांची एक जोडी असते. मुखांगे अन्न चघळून खाण्यासाठी असतात. पंख उदरापेक्षा लांब असतात. बहुधा पंख गळून पडतात. त्यांचे रंग तपकिरी, पिवळा, काळा इ. विविध प्रकारांचे असतात. त्यांच्या काही जाती दिवसा, तर काही रात्री उड्डाण करतात.

वाळवी समाजप्रिय कीटक असून वारूळात राहतात. वारुळात त्यांच्या वसाहती असतात. वसाहतीत राहणाऱ्या वाळवींची शरीर संरचना, कार्य व वर्तन यांनुसार कामकरी, सैनिक व प्रजननक्षम अशी विभागणी झालेली असते.

कामकरी वाळवी : कामकरी वाळवींचा रंग बाल्यावस्थेत पांढरा असतो, तर प्रौढावस्थेत फिकट बदामी होतो. शरीराची ठेवण लहान असते. आकारमानाने ते सर्वांत लहान असतात. मुखांगात जबडे (जंभ) असतात. डोळे नसल्यामुळे कामकरी आंधळे असतात. धडावर पंख नसतात. प्रजननक्षमता नसल्यामुळे वांझ असतात. कामकरी वाळवी वारुळातील इतरांसाठी व वारुळासाठीची कामे करतात. अन्न गोळा करणे, अंडी व लहान वाळवींची निगा राखणे, प्रजननक्षम वाळवींना अन्न देणे, वारूळ बांधणे, त्यांतील कोठड्या, मार्गिका स्वच्छ ठेवणे अशी कामे त्या करतात. कामकरी वाळवी नेहमी वारुळात असतात आणि क्वचितच वारुळाबाहेर येतात. वारुळात सामान्यपणे कामकरी वाळवी संख्येने अधिक असतात. कुजलेले लाकूड व कवकबीजाणू हे त्यांचे अन्न असते. वाळवींमध्ये कामकरी हे सर्वांत उपद्रवी असून ते लाकूड खाऊन व पोखरून प्रचंड नुकसान करतात.

सैनिक वाळवी : सैनिक वाळवी मध्यम आकारमानाच्या असतात. त्यांचा रंग फिकट बदामी असतो. सैनिक वाळवीचे डोके तुलनेने मोठे व चपटे असते. मुखांगातील जंभ मोठे असून शत्रूचा प्रतिकार करण्यासाठी चावा घेऊ शकतात. काही सैनिक वाळवींमध्ये डोके जास्त उंच असून जबडे लहान असतात. वारुळामध्ये छिद्रे पाडण्यासाठी त्यांचा वापर होतो. काही सैनिक वाळवींमध्ये शीर्षग्रंथी असतात, ज्यांतून विशिष्ट स्राव येतो. सैनिक वाळवीची संख्या कामकरी वाळवींपेक्षा तुलनेने खूपच कमी असते. सैनिक वाळवींना पंख नसतात, तसेच ते प्रजननक्षम नसतात. सैनिक वाळवी स्वत:हून अन्न खात नाहीत, कामकरी वाळवी त्यांना अन्न भरवितात. सैनिक वाळवी वारुळाच्या वेगवेगळ्या दारांजवळ बहुतकरून असतात. वारुळातील सदस्यांचे रक्षण करणे हे त्यांचे काम असते. घुसखोरांचा चावा घेणे, त्यांच्यावर क्षोभक विषे, सरस व क्लथनरोधी रसायनांचा मारा करून ठार करणे अथवा पळवून लावणे अशा प्रकारे ते वारुळाचे रक्षण करतात.

प्रजननक्षम वाळवी : प्रजननक्षम वाळवी प्रजननाचे कार्य करतात. त्यांना नर-मादी किंवा राजा-राणी म्हणतात. त्यांचा रंग गडद तपकिरी असतो. नर-मादी दोन्ही पंखहीन असून त्यांची निर्मिती पंखधारी मातापित्यांकडून झालेली असते. राणीचे उदर जास्त लांब असून राणी सु. ११ सेंमी. लांब, तर नर २ सेंमी. लांब असतो. राणीच्या उदरात मोठी प्रजननसंस्था असून तिच्या उदरात अंडी असल्यामुळे ती फुगीर दिसते. कामकरी वाळवी राजा-राणीची सर्व प्रकारे काळजी घेतात.

मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे वाळवीच्या निवासालादेखील वारूळ म्हणतात. ओलसर लाकूड, वाळलेले लाकूड यांवर, जमिनीखाली तसेच जमिनीवर वाळवी वारूळ करते. ओलसर लाकडात राहणारी वाळवी आकाराने मोठी असते. जमिनीखालील वाळवी संख्येने जास्त असून त्यांची संख्या एका वारुळात दोन लाखांपर्यंत असते. जमिनीखाली बिळे व छिद्रे पाडून वाळवी वारूळ तयार करतात. त्यामुळे जमिनीवर मातीचा ढिगारा दिसतो. वाळवीच्या काही जाती लाकूड खातात. खाताना लाकूड कुरतडले जाते. त्या लाकडात कोठड्या (खोल्या), पुढे मोकळी जागा अथवा सज्जे तयार करतात. जमिनीवरील वारुळाचे आकार सरळसोट झाडासारखे, फांद्या असलेल्या झाडासारखे, ओबडधोबड असे विविध असते. वारुळाच्या आकारमानातही विविधता आढळते. वारुळाचा तळाकडील व्यास ३–४ मी. व उंची ६ मी.पर्यंत अथवा जास्त असते. वारुळाचा तळ भक्कम असतो. वारूळ ‍तयार करण्यासाठी माती, चिखल, लाळ व विष्ठा वापरली जाते. वारुळाच्या आत कोठड्या, सज्जे, मार्ग, मार्गिका यांचे जाळे असते. राजा-राणीची कोठडी तळावरील भागात असते. तिला राज कोठडी म्हणतात. याच भागात अन्न साठविण्यासाठी कोठड्या असतात. कामकरी वाळवींच्या कोठड्या आतील भागात असतात. वारुळाच्या दर्शनी अथवा बाहेरच्या भागात छिद्रांजवळ सैनिक वाळवीच्या कोठड्या असतात. वारुळाचे आतील तापमान बाहेरच्यापेक्षा जास्त असते. बाष्पनियंत्रण व वायुवीजन चांगले घडून येते. काही वारुळे झाडांवरही असतात. वारुळामुळे वाळवीला आसरा व संरक्षण ‍मिळतो.

पोषण : सेल्युलोज हे वाळवीचे मुख्य अन्न आहे. लाकूड, गवत, पाने, कापूस, कागद, पुठ्ठा, हयूमस, शेणखत इत्यादींपासून वाळवी सेल्युलोज मिळवितात. अन्न मिळविण्यासाठी कामकरी वाळवी वारुळाबाहेर पडतात आणि अन्न खाऊन वारुळात परत येतात. त्यानंतर ओकारी काढतात अथवा गुदद्वारातून अन्न बाहेर टाकतात. गुदद्वारातून टाकलेले अन्न विष्ठेपेक्षा वेगळे असते. दोन्ही प्रकारांचे अन्न राजा-राणी, सैनिक व अर्भक वाळवी यांना भरविले जाते. या अन्नात कशाभिकायुक्त सहजीवी आदिजीव असतात. वाळवीच्या आतड्यामध्ये ट्रायकोनिम्फा, कोलोनिम्फा हे आदिजीव असतात. हे आदिजीव सेल्युलेज व सेलोबायोज ही विकरे स्रवतात. त्यामुळे सेल्युलोजचे ग्लुकोज व ॲसिटिक आम्ल यांत रूपांतर होते. काही जातींच्या वाळवीमध्ये सहजीवी आदिजीवांऐवजी आतड्यातील जीवाणू असतात. जीवाणूंमध्येही सेल्युलोज व सेलोबायोज ही विकरे असतात आणि ते सेल्युलोजचे पचन करतात. वाळवीच्या काही जातींमध्ये वाळवीच ही विकरे स्रवते. वाळवीला प्रथिनांचीदेखील गरज असते. त्याकरिता ती दुसऱ्या वाळवीला खाते. कवके खाऊनही वाळवी प्रथिने मिळविते. काही वाळवी सहजीवी कवकांची लागवड करतात, त्याला ‘कवक उद्यान’ म्हणतात. त्यात लिग्निन हे कर्बोदक भरपूर प्रमाणात असते.

संदेशवहन : वाळवी समाजप्रिय कीटक असल्याने वारुळातील सदस्यांत संदेशवहन असणे आवश्यक असते. वारुळाची उभारणी, अन्नाचा शोध, धोक्याचा इशारा, संरक्षण इत्यादींची देवाणघेवाण सतत होत असते. डोळे असलेल्या वाळवींमध्ये डोळे, तर अंध असलेल्या सदस्यात रासायनिक द्रव्ये व स्पर्शाद्वारे संदेशवहन होते. अन्न मिळविण्यासाठी कामकरी वाळवी वारुळाबाहेर येतात. त्यांची जमिनीवर रांग लागते. वाळवी रासायनिक द्रव्य जमिनीवर सोडते, त्याच्या गंधाद्वारे अन्नाची ‍दिशा इतरांना कळते. धोक्याची सूचना इतरांना धडका मारून दिली जाते.

वसाहती : वाळवीच्या नवीन वसाहतीची स्थापना पंखधारी प्रौढ वाळवीकडून होते. पंखधारी प्रौढ नर-मादी (राजा-राणी) वारुळातील त्यांच्या कोठडीत काही काळ एकत्र राहतात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीस योग्य वातावरणात बाहेर पडतात. याच सुमाराला कामकरी वाळवी त्यांना वारुळातून बाहेर पडण्यासाठी बोगदे, मार्गिका व वारुळाच्या बाहेरच्या भागावर छिद्रे तयार करतात. सैनिक वाळवी छिद्रांच्या आसपास पहारा देतात आणि शत्रूला वारुळात प्रवेश करू देत नाहीत. एका क्षणी छिद्रातून वाळवीची नर-मादी बाहेर झेप घेतात. त्याला ‘‍मीलन-उड्डाण’ म्हणतात. नर-मादी जमिनीवर उतरतात तेव्हा त्यांचे पंख गळून पडतात. ही जोडी नवीन वारूळ करण्यासाठी एखादी भेग, लाकूड अथवा भुसभुशीत जमीन शोधून काढते. जमिनीला छिद्र पाडून एक कोठडी तयार केली जाते. कोठडीचे छिद्र विष्ठेने बंद केल्यावर नर-मादीचे प्रथम मीलन होते. गरजेनुसार अधूनमधून त्यांचे मीलन होतच असते. यात नराच्या शुक्रपेशी मादीच्या शुक्रपेशी-ग्राहिकेत साठविल्या जातात. त्यानंतर मादी अंडी घालते. अंड्यांची संख्या कमी, म्हणजेच काही शेकड्यांत असते. अंड्यातून जन्मलेल्या पिलांपासून कामकरी वाळवी व सैनिक वाळवी तयार होतात आणि पुन्हा वसाहत तयार ‍होऊ लागते. २–५ वर्षांच्या कालावधीत राणीची अंडी घालण्याची क्षमता वाढत जाते. वाळवीची राणी प्रतिसेकंदास एक याप्रमाणे दररोज सु. ३६ हजारांपर्यंत अंडी घालते. या कालावधीत काही महिने राजा-राणी पिलांचे संगोपन करतात. वसाहत जशी मोठी होत जाते तसे कामकरी वाळवी वारुळातील कामे करतात. काही जातीतील वाळवीच्या वसाहती शंभर ते हजार सदस्यांच्या असतात, तर काही जातींमध्ये लाखो ते कोटी सदस्य असतात. ही सर्व निर्मिती वाळवीच्या एका प्रजननक्षम नर-मादी जोडीपासून होते. या जोडीला प्राथमिक प्रजननक्षम जोडी म्हणतात. काही वर्षानंतर द्वितीय प्रजननक्षम जोडी तयार होते. ती जोडी वारुळाबाहेर पडून नवीन वसाहत ‍निर्माण करते. कामकरी, सैनिक, तसेच प्रजननक्षम वाळवी निर्माण करणे हे परिस्थितीनुसार आणि वाळवीमधील सामाजिक वर्तन, पोषक घटक, संप्रेरके आणि रासायनिक घटक यांनुसार ठरते.

वाळवीमध्ये अर्धरूपांतरण व अपूर्ण जीवनचक्र असून त्यांच्या वाढीचे अंडे, कुमारावस्था व प्रौढावस्था असे टप्पे असतात.

मुंग्या, भुंगे, चतुर, बेडूक, सरडे, पक्षी, उंदीर, मुंगीखाऊ हे वाळवीचे शत्रू आहेत. वाळवी लाकूड खाऊन, कुरतडून, छिद्रे पाडून लाकडाचे नुकसान करते. त्यामुळे इमारतीचे लाकूड, जमिनीत पुरलेले लाकडी खांब, लाकडी पूल, ओंडके, पाणी अडविण्यासाठी वापरलेल्या फळ्या (बरगे), रेल्वेचे लाकडी पाट, फर्निचर यांचे नुकसान होते. पुस्तके, वह्या, सुती कपडे, टोपल्या, गालिचे यांचे तसेच शेते, मळे, वने यांतील वनस्पतींचे ते नुकसान करतात. काही प्रमाणात वाळवी मानवाला उपयुक्त असते. तिचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी होतो. तसेच वाळवी लागलेल्या जमिनीत हवा खेळती राहिल्यामुळे जमिनीचा कस वाढतो. वारुळाची माती जोरखत म्हणून वापरतात तसेच, रत्नांना पॉलिश करण्यासाठी, टेनिसचे क्रीडांगण, जमीन तयार करण्यासाठीही वारुळाची माती वापरतात.

नियंत्रण : वाळवीचे नियंत्रण अनेक प्रकारे करतात. वाळवी लागू नये यासाठी बांधकाम करण्यापूर्वी तसेच नंतर जमिनीत कीटकनाशके ओततात. लाकडी बांधकामालगत अरुंद चर खणून त्यात कीटकनाशके भरतात. त्यामुळे लाकूड कुजत नाही. लाकडाला छिद्रे पाडून वाळवीनाशक रसायने भरतात. शेतात कडुनिंबाची, करंजीची पेंड टाकतात. नांगरणी करून वाळवीनाशके टाकतात. क्रिओसोट, मर्क्युरिक क्लोराइड, झिंक क्लोराइड, सोडियम फ्ल्युओरोसिलेकेट, लिंडेन, डायएल्ड्रीन, सोडियम आर्सेनेट, ट्रायक्लोरोबेंझीन, मॅलॅथिऑन, पायरेथ्रम, टॉक्झोफेन आदी वाळवीनाशके आहेत. ती धुरळणी, भुकटी, पाण्यात विरघळवून, फवारे या प्रकारे वापरतात. मेथोप्रीन हे रसायन वाळवीमध्ये असलेल्या आदिजीवांना नष्ट करते. त्यामुळे वाळवीच्या पिलांना ओकारीचे अन्न मिळत नाही. अशा परिस्थितीत अन्न न मिळाल्याने वाळवीची पिले मेल्याने वाळवीच्या वाढीवर नियंत्रण येते.