किवी

किवी हा न उडणारा एक पक्षी आहे. पक्षी वर्गातील अ‍ॅप्टेरिजिडी कुलातील हा पक्षी फक्त न्यूझीलंडमध्ये आढळतो. किवीच्या पाच जाती असून, त्यांपैकी विपुल प्रमाणात आढळणार्‍या जातीचे शास्त्रीय नाव अ‍ॅप्टेरिक्स ऑस्ट्रॅलिस आहे.

किवी आकाराने पाळीव कोंबडीपेक्षा थोडा मोठा असतो. मादी नरापेक्षा थोडी मोठी असते. पिसारा केसांसारख्या पिसांचा बनलेला असून पिसे कायम विस्कटलेली असतात. पिसार्‍याचा रंग उदी असतो. तिला शेपूट नसते. शरीरावरील पिसे सस्तन प्राण्यांच्या केसांप्रमाणे दोन शाखा असणारी असतात. चोच लांब आणि बारीक असते. तिच्यावर श्वसनरंध्रे असतात. डोळे बारीक असतात. कानाची छिद्रे मोठी असतात. दृष्टी जरी मंद असली, तरी श्रवणेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असतात. चोच आणि चेहर्‍यावरील राठ पिसे स्पर्शेंद्रियाचे कार्य करतात. पाय आखूड पण मजबूत असून बोटांवरील नख्या तीक्ष्ण असतात.

किवी अत्यंत लाजाळू, दडून राहणारा व निशाचर आहे. गांडुळे, कीटक व झाडांखाली पडलेली फळे हे याचे खाद्य आहे. दिवसा लपून रात्री पायाच्या नख्यांनी जमीन उकरीत आणि आपली लांब चोच जमिनीत खुपसून तो खाद्य शोधतो. उडणार्‍या पक्ष्यांप्रमाणे किवीच्या उरोस्थीवर हाडांचा फाळ जवळजवळ नसतोच. पंखांची वाढ खुंटलेली असल्यामुळे त्यांना उडताही येत नाही. पंख पाठीवरील पिसात दडलेले असतात. त्यांचा वापर होत नसल्याने त्यासाठीचे स्नायू अविकसित असतात. किवीची हाडे इतर पक्ष्यांप्रमाणे नसून सस्तन प्राण्यांप्रमाणे असतात.

मार्च ते जून हा किवीच्या विणीचा हंगाम असून त्यांची जोडी २० वर्षांपर्यंत एकत्र राहते. मादी झाडाच्या मुळाखालच्या किंवा दरडीतील बिळात एक किंवा दोन अंडी घालते. या पक्ष्याच्या आकाराच्या मानाने अंडे फार मोठे असते. त्याचे अंडे सु. १३५ ते ८५ मिमी. आकाराचे असून सरासरी वजन ४५० ग्रॅ. असते. कोंबडीच्या अंड्यापेक्षा सु. दहा पट मोठे असते. अंडी घातल्यावर मादी इतकी क्षीण होते, की अंडी उबविण्याचे काम नरालाच करावे लागते. ७५-७७ दिवसांनंतर अंड्यांतून पिले बाहेर पडतात. न्यूझीलंडमधील माओरी जमातीचे लोक किवीचे मांस भाजून किंवा उकडून खातात. किवी पक्षी न्यूझीलंडचे राष्ट्रीय पक्षी आहे. ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातील ब्रिटिश वैज्ञानिकांनी केलेल्या डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्लाच्या (डीएन्एच्या) अभ्यासातून किवी हे ऑस्ट्रेलियातील एमू व कॅसोवेरी या न उडणार्‍या पक्ष्यांच्या अधिक जवळचे आहेत, असे दिसून आले आहे.