अक्कलकाराचे स्तबक

अक्कलकारा ही कंपॉझिटी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव स्पायलँथिस ऍक्मेला आहे. ही औषधी वनस्पती भारत, श्रीलंका व फिलिपीन्स या देशांत आढळते. बागेतही ही वनस्पती लावतात

ही वनस्पती साधारणपणे 20 – 50 सेंमी. उंचीची असते. या वनस्पतीचे खोड व फांद्या केसाळ असतात. पाने साधी असून समोरासमोर, अंडाकृती, दातेरी व देठाकडे निमुळती असतात. फुलांची लंबगोल, पिवळट लाल स्तबके नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात येतात. यामध्ये भोवतालची किरण-पुष्पके स्त्रीलिंगी व मधली बिंब-पुष्पके द्विलिंगी असतात.

फुलांना झोंबणारा वास असून त्यांची चव तिखट असल्यामुळे चघळल्यास लाळ सुटते. जिभेच्या विकारावर ही फुले उपयुक्त आहेत. काही ठिकाणी स्त्रियांना प्रसूतीनंतर देतात. पुरळ उठून खाज सुटल्यास पाने अंगास चोळतात. तोंडास कोरड पडल्यास बिया चघळतात. अनेक देशांत आमांशावर औषध म्हणून ही वनस्पती पाण्यात उकळून देतात. रेचक म्हणून मुळाचा काढा देतात. पानांचा काढा मूत्रल (लघवी साफ करणारा) आहे. याच्या काढ्यामध्ये मुतखडा विरघळतो, असे मानतात. संधिवात व त्वचारोग बरा करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग करतात. फुलांचा अर्क दाढदुखीवर उपाय म्हणून लावतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा