व्हायटेसी कुलातील व्हायटिस प्रजातीतील वनस्पतीच्या फळांना सामान्यपणे द्राक्ष म्हणतात. जगभर या वनस्पतीच्या सु. ६० जाती आहेत. मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असलेल्या द्राक्षवेलीचे शास्त्रीय नाव व्हायटिस व्हिनिफेरा आहे. इतर दोन महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या जाती उत्तर अमेरिकेतील (व्हा. ल्युब्रास्का आणि व्हा. रोटुंडीफोलिया) आहेत.

पाने व फळांसहित द्राक्षाची वेल

जगात लागवडीखाली असलेल्या द्राक्षांचे ९०% प्रकार व्हा. व्हिनिफ़ेरा या जातीपासून तयार केलेले आहेत. असे प्रकार जवळजवळ ५,००० आहेत, त्यांपैकी १०० प्रकार मुख्य मानले जातात. ही वनस्पती मूळची भूमध्य सामुद्रिक प्रदेश आणि पश्चिम आशियातील आहे. सु. ६,०००–८,००० वर्षांपूर्वीपासून जगभर द्राक्षवेलीची फळांसाठी लागवड केली जात आहे. भारतात इ. स. १३०० च्या सुमारास इराण व अफगणिस्तान येथून द्राक्षवेल आली, असे मानतात.

द्राक्षवेल ही बहुवर्षायू, बळकट व पानझडी वनस्पती असून प्रतानांच्या साहाय्याने आधारावर चढते. प्रताने टोकाला दुभंगलेली असतात. खोडावर साधी, एकाआड एक, हस्ताकृती पाने असून ती कमी-अधिक ३–५ खंडांत विभागलेली असतात. पानांची वरची बाजू विरलरोमी असून खालची बाजू राखाडी व घनरोमी असते. फुले लहान, हिरवी व पानांच्या बगलेत येतात. मृदुफळे गोलसर, रसाळ आणि हिरवी, जांभळी किंवा लालसर अशा वेगवेगळ्या रंगांची असून ती गुच्छाने येतात. एका फळात २–४ बिया असतात.

द्राक्षांचा घड

द्राक्षफळे चवीला गोड असून ती शीतल, सारक, मूत्रल, पाचक व हृदयासाठी पौष्टिक असतात. फळांमध्ये सरासरीने पाणी सु. ८०%, कर्बोदके १८.२%, प्रथिने ०.८%, तंतू १% असून कर्बोदकांमध्ये फ्रुक्टोज व ग्लुकोज या दोन शर्करा सारख्या प्रमाणात असतात. याखेरीज क आणि ब-समूह जीवनसत्त्वे असतात. वाइन बनविण्यासाठी व्हा. व्हिनिफ़ेरा जातीच्या खास प्रकारांची पैदास केली जाते. अशा फळांमधील शर्करेचे प्रमाण साधारणपणे २४% च्या जवळपास झाल्यानंतर फळे काढून ती वाइनसाठी वापरतात. खाण्यासाठी द्राक्षांच्या बिनबियांच्या प्रकारांची पैदास केली गेली आहे. अशा फळांमध्ये सु. १५% शर्करा असते.

दरवर्षी जगभरात द्राक्षाचे सु. ७,००० लाख क्विं. एवढे उत्पादन होते. त्यांपैकी सु. ८०% उत्पादन वाइन बनविण्यासाठी वापरले जाते, १२% द्राक्षे ही खाण्यासाठी विकली जातात आणि उरलेल्या फळांपासून मनुके, रस किंवा जॅम तयार करतात. जगभर केल्या जाणाऱ्या द्राक्षाच्या उत्पादनामध्ये इटली, फ्रान्स, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्पेन आणि चीन हे देश अग्रेसर असून एकूण उत्पादनापैकी अर्धे उत्पादन या पाच देशांत होते.

भारतात द्राक्षांचे सु.२० प्रकार लागवडीखाली आहेत. त्यात थॉम्पसन सीडलेस, सोनाका सीडलेस, ब्लॅक सीडलेस व फ्लेम सीडलेस यांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. जागतिक उत्पादनाच्या क्रमवारीत भारत १२ व्या स्थानावर असून देशामध्ये महाराष्ट्र राज्यात द्राक्षाची लागवड सर्वाधिक होते. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पंजाब व हरयाणा या राज्यांत द्राक्षाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात नाशिक, सांगली, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, जळगाव, औरंगाबाद, बीड व परभणी इ. जिल्ह्यांत द्राक्षाची लागवड केली जाते.