केळफुलासह लोंगर

केळ ही म्युसेसी कुलातील एकदलिकित व बहुवर्षायू वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव म्युसा पॅरॅडिसियाका असे आहे. या वनस्पतीच्या फळांनाही केळी म्हणतात. या वनस्पतीचे मूलस्थान आशिया खंडाच्या आग्नेय भागात असून शास्त्रज्ञांचे मते ते भारतामध्ये आसामच्या दक्षिण भागात आहे. आशिया खंडाच्या उष्ण कटिबंधातील सर्व प्रदेशांत केळीची लागवड पुरातन काळापासून होत असल्याचे दिसून येते.

केळीची लागवड कंदापासून करतात. कंदापासून निघणार्‍या धुमार्‍यांपासून वातवीय आभासी खोड तयार होते. याची उंची ३-७ मी. असून एकदा फुले येऊन गेली की ते मरून जाते. पाने लांब व खोडापाशी निमुळती मात्र मोठ्या पात्यांची व आयताकृती असतात. लोबंत्या केळफुलाच्या (फुलोर्‍याच्या) तळाशी मादी-फुले तर वरच्या टोकाला नर-फुले असतात. फुलोर्‍याची सहपत्रे सहज दिसून येणारी, तपकिरी रंगाची, एकामागे एक गळून पडणारी असतात. फळांचा घड (गुच्छ) असतो, त्यांतील प्रत्येक फण्यात दाटीने, टोकदार, साधारण गोलसर, लांबट व आखूड देठांची हिरवी केळी असतात. पिकल्यावर केळी पिवळी होतात.

पिकलेली केळी उत्तम पौष्टिक खाद्य असून कच्ची फळे, खोडाचा गाभा व केळफुले भाजीकरिता वापरतात. फळांपासून टिकाऊ पूड (पीठ), मुरांबे, टॉफी, काचर्‍या, जेली इ. पदार्थ बनवितात. पिकलेली फळे कर्बोदकांचा उत्तम स्रोत आहेत. याखेरीज पिकलेल्या फळांमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि अ तसेच  जीवनसत्त्वे असतात. पिकलेली फळे उन्हात वाळवून सुकेळी बनवितात. कच्च्या फळात टॅनीन व स्टार्च अधिक असून फळ पिकताना साखरेचे प्रमाण वाढते व टॅनीन कमी होते. तसेच वास व चव बदलते; रंग बदलतो. सुक्या आवरक पर्णतलाचा उपयोग फुले, फळे, विड्याची पाने, तपकीर वगैरेंसारख्या वस्तू बांधण्याकरिता आवरण व दोर्‍यासारखा करतात. फळ मधुमेह, मूत्रपिंडदाह, संधिवात, मूत्रविषरक्तता व हृदयविकार यांवर गुणकारी आहे. पक्व फळांपासून मद्य व शिर्का ( व्हिनेगार) बनवितात.

केळ्यांच्या उत्पादनात भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात केळांच्या सु. १४ जाती आहेत. अलीकडे ऊतिसंवर्धन पद्धतीने केळीची रोपे तयार केली जातात. केळी तयार होत असताना घडाच्या टोकाला असलेले वांझ केळफूल कापून घेतात. घड पिकत आल्यावर फळांचा गडद हिरवा रंग बदलून फिकट हिरवा होतो. असा घड थोडा लांब दांडा ठेवून कापून घेतात. केळांचे घड बंद गुदामामध्ये (कोठीमध्ये) धूर देऊन पिकवितात. शीतगृहात हळूहळू पिकविलेली केळी धूर देऊन पिकविलेल्या केळ्यांपेक्षा गोड असतात व त्यांना आकर्षक पिवळा रंग येऊन त्यांच्यावर काळे ठिपके येत नाहीत.

भारतामध्ये बसराई, हरी साल, लाल वेलची, सफेत वेलची, मुठेळी, वाल्हा व लाल केळ या जातींची पिकलेली केळी तशीच खाण्यासाठी वापरतात. बनकेळ आणि राजेळी जातींची केळी शिजवून किंवा तळून खातात.