जलसिंचन, जलविद्युतनिर्मिती , पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, करमणुकीच्या स्थळांची निर्मिती आणि पर्यावरणाच्या स्वरूपात विशिष्ट सुधारणा घडवून आणणे इत्यादी उद्देशांनी नद्यांवर धरणे बांधली जातात. धरणांमुळे जलाशयाची निर्मिती होते. जगातील पाण्याच्या आणि उर्जेच्या वाढत्या मागणीबरोबर जलाशयांची संख्या व त्यांचा आकार सतत वाढत आहे.

आज पृथ्वीवरील सु. ४,००,००० चौ.किमी. पेक्षा अधिक क्षेत्र जलाशयाखाली गेले आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक वाढले असून हरितगृह वायूचे उत्सर्जन वाढले आहे. धरणे अनेक दृष्ट्या उपयोगी असली तरी धरण निर्मितीमुळे पर्यावरणीय बदल झालेले आहेत. धरण व त्यांचे जलाशय हे पर्यावरण आणि त्यातील राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने हितकारक की अहितकारक, याबाबत प्रामुख्याने १९६० च्या दशकापासून किंवा त्याआधीपासूनही मतभेद निर्माण झाले आहेत. धरण व त्यांचे जलाशय हे पर्यावरण आणि त्यातील राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने हितकारक की अहितकारक, याबाबत प्रामुख्याने १९६० च्या दशकापासून किंवा त्याआधीपासूनही मतभेद निर्माण झाले आहेत. इंग्लंडमध्ये १९६० मध्ये सिल्यीन धरण व कॅपेल सिल्यीनमधील पूर यांमुळे तेथील जनमानसांत प्रक्षोभ उसळला होता. अलीकडच्या काळात चीनमधील थ्री गॉर्जेस धरणाची आणि तशाच प्रकारच्या आशिया, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील धरणांची उभारणी यांमुळे अनेक पर्यावरणीय समस्या तसेच राजकीय विवाद निर्माण झाले आहेत. भारतातील नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पाबाबत मतमतांतरे आहेत.

धरणामुळे सभोवतालच्या प्रदेशात पाणी पसरते. तेथे अस्तित्वात असलेली जीवसृष्टी पाण्याखाली जाते. सुरुवातीला साठविण्यात आलेल्या पाण्यामुळे तेथील कार्बनसंपन्न वनस्पतींचा नाश होतो. या वनस्पतिजन्य सेंद्रिय द्रव्यांच्या विघटनाच्या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात कार्बन वातावरणात मुक्त होतो. कुजलेल्या वनस्पती ऑॅक्सिजनाचा अभाव असलेल्या जलाशयाच्या तळाशी साचतात. परिणामी मिथेनाचे द्रावण तयार होते. त्याचा परिणाम तेथील परिसंस्थेवर होतो. वाहत्या पाण्यातून वेगवेगळ्या जलचरांचे स्थलांतर होत असते. धरणांमुळे हे स्थलांतर थांबते. धरणाच्या खालच्या भागातील जलचर धरणाच्या वरच्या भागात स्थलांतर करू शकत नाही. परिणामी त्यांच्या प्रजननात अडथळा होऊन त्यांची संख्या घटते. हा परिणाम लक्षात घेऊन अनेक ठिकाणी नवीन धरणांचे बांधकाम करताना माशांना स्थलांतर करता यावे, यासाठी कृत्रिम मत्स्यशिडी ठेवली जाते. काही वेळा पडावांद्वारे माशांचे स्थलांतर घडवून आणले जाते.

धरणविरहित वाहत्या नद्यांच्या काठावरील प्रदेशात समृद्ध जैवविविधता असते. नदीला येणारे नैसर्गिक पूर त्यासाठी पोषक ठरतात. धरणाच्या पाण्यामुळे सातत्याने सभोवतालचा प्रदेश जलमय होऊन नदीभोवतालची आर्द्रभूमी परिसंस्था, वनांच्या प्रदेशातील परिसंस्था आणि इतर परिसंस्था विस्कळीत होतात. धरणामुळे जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम होतो. धरणाच्या जलाशयातील पाणी सामान्यपणे हिवाळ्यात उबदार तर उन्हाळ्यात थंड असते. हे पाणी जेव्हा नदीच्या पात्रात येते तेव्हा नदीतील पाण्याच्या तापमानातही फरक पडतो. याचा परिणाम जलाशयात तसेच नदीत अस्तित्वात असलेल्या वनस्पती व प्राणी यांच्या जीवनावर होत असतो. अनेक ठिकाणी पूरमैदानातील परिसंस्था नद्यांना ऋतूंनुसार येणाऱ्या पुरावर अवलंबून असतात. परंतु धरणांमुळे पूरनियंत्रण होऊन तेथील परिसंस्थेवर तसेच शेतीवर परिणाम झालेले दिसून येतात.

धरण मानवाला जसे फायदेशीर ठरते तसे त्रासदायकही ठरते. मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या कीटक व प्राण्यांची अशा जलाशयांत मोठ्या प्रमाणावर पैदास होते. मुख्यत: उष्ण प्रदेशातील जलाशयांत डासांची पैदास होऊन मलेरियासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. तसेच अशा जलाशयांत वाढणाऱ्या काही गोगलगायींमुळे रोगाचा प्रसार होतो. काही गोगलगायी विषारी असतात. त्यांचा उपद्रव तेथील मानवासह इतर सजीवांना होतो. जलाशयांखाली फार मोठे क्षेत्र जात असेल तर तेथील लोकांचे पुनर्वसन करावे लागते. तसेच त्यामुळे आर्थिक आपत्ती, मानसिक त्रास व सामाजिक समस्या निर्माण होतात.