बिबळा हा वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टेरोकार्पस मार्सुपियम आहे. हा वृक्ष मूळचा भारत, श्रीलंका आणि नेपाळ येथील आहे. तो भारतात गुजरात, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार, ओडिशा, कर्नाटक व केरळ या राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये कोकण इ. प्रदेशांत आढळतो. हा एक भव्य वृक्ष असून त्याला इंग्रजी भाषेत ‘गम किनो’ व ‘मलबार किनो’ अशी नावे आहेत. दक्षिण भारतात कॉफीच्या मळ्यांत सावलीसाठी बिबळा वृक्षांची लागवड करतात.

बिबळा (टेरोकार्पस मार्सुपियम): (१) फुलांचे तुरे व पाने असलेली फांदी, (२) जाड पंखासारखी किनार असलेली फळे (शेंगा)

बिबळा वृक्ष १५–२० मी. उंच वाढतो. खोड मजबूत असून त्याची साल पिवळसर करड्या रंगाची व भेगाळलेली असते. पाने संयुक्त व एकाआड एक असून पर्णिका ५–७, लंबगोल, अंडाकृती व टोकदार असतात. तो  पानझडी असला, तरी पानगळ थोड्याच काळापुरती असते. मार्च-एप्रिल महिन्यांत नवीन पालवी फुटते. फुलांचे तुरे पानांच्या बगलेत व फांद्यांच्या टोकांना येतात. ते पानांपेक्षा आखूड असतात. फुले लहान व पिवळी असतात. शेंगा गोल असून तिच्यावर जाडसर पंखासारखी किनार असते. शेंगेत एक, लहान व बहिर्गोल बी असते.

बिबळा वृक्षाच्या खोडाचे लाकूड कठीण, जड आणि टिकाऊ असते. ते मध्यभागी पिवळसर पिंगट असून त्याभोवती फिकट पिवळट रंग असतो. साग व साल वृक्षांप्रमाणे त्याचे लाकूड रेल्वेचे शिळेपाट व इमारतीचे लाकूड यांकरिता वापरले जाते. तसेच ते आगगाडीचे डबे, विजेच्या तारांचे खांब, फर्निचर, बैलगाड्या, बोटी, शेतीची अवजारे व खेळणी तयार करण्यासाठीही वापरतात. खोडाला खाचा पाडून लाल रंगाचा डिंक (गम किनो) मिळवितात. तो स्तंभक असून रंगकाम, कातडी कमाविणे व छपाई यांसाठी उपयुक्त आहे. तसेच लाकडाचा फांट (काढा) रक्तशर्करा कमी करीत असल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content