काकाओ (Cocao) या वृक्षाच्या बियांपासून तयार केलेल्या पदार्थाला कोको म्हणतात. त्यापासून कोको पेय, चॉकलेट, कोको बटर इ. खाद्यपदार्थ तयार करतात. काकाओ हा वृक्ष स्टर्क्युलिएसी कुलातील असून याचे शास्त्रीय नाव थिओब्रोमा काकाओ आहे. हा वृक्ष मूळचा दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन आणि ओरिनोको जंगलांतील असून माया व अॅझटेक जमातींतील लोक त्याची लागवड करीत असत. काकाओची लागवड घाना, नायजेरिया, ब्राझील, कॅमेरून, आयव्हरी कोस्ट, श्रीलंका, मलेशिया आणि भारतात मलबार किनारा, निलगिरी व पळणी टेकड्या इ. ठिकाणी केली जाते. जगाच्या एकूण कोको मागणीपैकी ७५% एवढा पुरवठा पश्चिम आफ्रिकेतून होतो.
काकाओ हा ६-८ मी. उंच, शाखायुक्त आणि सदापर्णी वृक्ष आहे. हा वृक्ष समुद्रसपाटीपासून १५ मी. उंचीवरील प्रदेशात आणि योग्य पाऊस व ऊष्ण तापमानात ४५० मी. उंचीवरील प्रदेशातही वाढतो. पाने साधी, गर्द हिरवी, एकाआड एक, १५ सेंमी. लांब, मोठी, लंबगोल, लांबट टोकाची आणि तळाशी गोलसर असतात. फुले पंचभागी, लहान, लालसर पिवळट प्रत्यक्ष खोडावर किंवा फांद्यांवर गुच्छांनी येतात आणि त्यानंतर ५-६ महिन्यांनी फळे येतात. फणसाप्रमाणे याच्या जुन्या फांदीवरही फळे वाढतात.
मृदुफळे पिकल्यावर लाल, पिवळी, जांभळी किंवा तपकिरी आणि आकाराने लंबगोल, टोकदार व पपईसारखी असतात. फळांत मोठ्या बिया २०-४० असून त्या चपट्या, तपकिरी किंवा जांभळ्या तसेच बुळबुळीत पदार्थाने वेढलेल्या असतात. या बियांमध्ये साधारणत: ४०% कर्बोदके, २२% मेद, १८% प्रथिने, ६.३% राख, २.२% थिओब्रोमीन, ०.०१% कॅफिन व काही भाग तंतू आणि पाणी असते.
किण्वन करून वाळविलेल्या काकाओच्या बिया प्रथम स्वच्छ करतात व भाजतात. त्यामुळे टरफले सैल होतात. फुटलेल्या बियांना निब म्हणतात. निब दळल्यावर चॉकलेट लिकर (द्रव) मिळते. जलदाब यंत्राने चॉकलेट लिकरवर दाब देऊन कोको बटर वेगळे करतात. यातून मिळालेला कठिण पदार्थ दळून चूर्ण स्वरूपात कोको मिळते. चांगला रंग व स्वाद येण्यासाठी त्यावर सौम्य अल्कलींची प्रक्रिया करतात. कोको उत्साहवर्धक व खाण्यायोग्य आहे. आईस्क्रिम, विविध प्रकारच्या मिठाया, केक व बिस्किटे यांसारखी बेकरी उत्पादने, पुडिंग, तसेच विविध पेये यांमध्ये कोकोओ त्याचा वापर करतात. औषधे तसेच तंबाखूला स्वाद येण्यासाठीही त्याचा वापर होतो.
चॉकलेट लिकर साखर आणि कोको बटर यांच्या मिश्रणाने तयार होणार्या पदार्थाला चॉकलेट म्हणतात. चॉकलेट लहान मोठ्या वडीच्या आकारात उपलब्ध असते. या चॉकलेटमध्ये उच्च ऊष्मांक आणि पोषणमूल्ये असतात. त्यात कर्बोदके, मेद, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. शारीरिक कष्टाची कामे करणारे, सैनिक, शोधक प्रवासी आणि खेळाडू पटकन ऊर्जा मिळावी म्हणून चॉकलेटचा वापर करतात.