मानवी व्यवहारात निर्माण झालेल्या टाकाऊ घन पदार्थांना घन कचरा म्हणतात. व्यवहारात मात्र काहीशा मर्यादित अर्थाने घरगुती कचऱ्याला घन कचरा म्हटले जाते आणि अशा कचऱ्याचा उल्लेख नगरपालिकीय घन कचरा असा केला जातो. प्रामुख्याने मानवी कृतींमुळे घन कचऱ्याची निर्मिती होते. व्यापार, निवासस्थाने, उपाहारगृहे, रुग्णालये, व्यापारी संस्था, कारखाने, खाणकाम, शेती, बांधकाम व्यवसाय हे घन कचऱ्याचे मुख्य स्रोत आहेत. विविध जैविक (सेंद्रिय), अजैविक पदार्थांपासून घन कचरा बनलेला असतो. यात टाकाऊ अन्नपदार्थ, वेगवेगळ्या उदयोगांतील कचरा, प्लॅस्टिकच्या वस्तू, पॉलिथीन पिशव्या, डबे, बाटल्या, कागदी वस्तू, वेष्टने, राख, रबर, काच, धातू, चामड्याच्या वस्तू, वाहित मलातील साका (अवक्षेप) इत्यादींचा समावेश होतो.
घन कचरा व्यवस्थापन प्रक्रिया

ग्रामीण भागात गायी, बैल, म्हशी, शेळ्या – मेंढ्या इ. पाळीव प्राण्यांपासून घन कचऱ्यात भर पडत असते. ग्रामीण भागात असा कचरा उकिरडयात टाकून त्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते. ग्रामीण भागापेक्षा नागरी भागात घन कचऱ्याची निर्मिती अधिक प्रमाणात होते. उदा., मुंबई शहरात प्रतिदिनी सु. ६००० मे. टन घन कचरा तयार होतो. विकसित देशांत ‘वापरा आणि फेकून द्या’ या संस्कृतीमुळे घन कचरा प्रचंड प्रमाणात होतो. घरातील कचरा नगरपालिकेच्या कामगारांकडून गोळा करून कचराकुंडीत टाकला जातो. तसेच घंटागाडीतून तो विल्हेवाटीसाठी वाहून नेला जातो. वेगवेगळ्या उद्योगांमधून औद्योगिक कचरा तयार होतो.

शेती हा घन कचऱ्याचा प्रमुख स्रोत आहे. यात प्रामुख्याने पिकांचे टाकून दिलेले भाग, फळ-प्रक्रिया, साखर उदयोग, भाताची गिरणी इत्यादी कृषी उत्पादनांवरील प्रक्रिया उदयोगातील टाकाऊ पदार्थ, जनावरांचे मलमूत्र, मृत प्राणी यांचा समावेश होतो. बांधकाम व्यवसायातील निरुपयोगी लाकूड, वाळू, दगड, विटा, माती, काँक्रीट इत्यादी घन कचऱ्याचे ढीग मोकळ्या जमिनीवर पडलेले दिसतात. विविध रुग्णालयांमधून वैदयकीय अपशिष्टाची निर्मिती होते. वाढत्या लोकसंख्येमुळे वस्तू व सेवांचा वापर वाढला आहे. घन कचऱ्यातही सतत वाढ होऊन हवा, पाणी व भूमी यांचे प्रदूषण होते. घन कचरा उघडयावर पडून राहिल्यास त्या ठिकाणच्या सौंदर्याचा ऱ्हास होतो. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटते आणि परिसरातील स्थिती अस्वच्छ होऊन रोगराई पसरते.

घन कचऱ्याची नियोजनबद्ध विल्हेवाट लावणे ही काळाची गरज आहे. घन कचऱ्याचे संकलन, साठवण, वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट किंवा पुनर्वापर इ. बाबी घन कचरा व्यवस्थापनात येतात. हे करीत असताना परिसराचे सौंदर्य व स्वास्थ्य टिकेल आणि आर्थिक दृष्टया परवडेल अशा पद्धती अवलंबतात. निर्माण झालेल्या घन कचऱ्यातील घटकांचा पुनर्वापर, भस्मीकरण, कचरा जमिनीत गाडणे, खोल समुद्रात लोटून देणे इत्यादी घन कचरा विल्हेवाटीचे मार्ग आहेत. मुळात घन कचरा जास्त निर्माण होणार नाही, ही काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पर्यायी वस्तू वापरता येतात. उदा., प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशवी वापरणे. विघटनशील कचऱ्यापासून कंपोस्ट खत, गांडूळ खत, तसेच जैविक वायू आणि ऊर्जानिर्मिती करता येते. काच, कागद, धातू, प्लॅस्टिक यांसारख्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो. ज्याच्यावर कोणतीही प्रक्रिया करता येत नाही, असा घन कचरा जमिनीत खोलवर गाडून किंवा समुद्रात लोटून त्याची विल्हेवाट लावता येते. समुद्रात लोटलेल्या घन कचऱ्याचे काही फायदे तर काही तोटे संभवतात. अनेक देशांत समुद्रात कचरा फेकण्यावर बंदी घातली आहे.

रोग पसरविणारी जैविके, स्फोटके, किरणोत्सारी कचरा यांवर रासायनिक प्रक्रिया करून काळजीपूर्वक विल्हेवाट लावणे गरजेचे असते. कारण हा कचरा मानवी आरोग्य व नैसर्गिक परिसंस्थांना धोकादायक ठरतो. हा घन कचरा जमिनीत गाडून विल्हेवाट लावण्याचा पर्याय वापरला जात असला, तरी त्यातील अपायकारक द्रव्ये पावसाच्या पाण्यात विरघळून जमिनीत झिरपून भूपृष्ठाखालील तसेच भूपृष्ठावरील पाणी प्रदूषित होण्याचा धोका असतो. उच्च तापमानाने घन कचऱ्याचे भस्मीकरण हा विल्हेवाटीचा एक मार्ग आहे. मात्र या ज्वलनातून विषारी द्रव्ये उत्सर्जित होऊन हवेचे प्रदूषण होऊ शकते. तेव्हा घन कचऱ्याचे स्वरूप लक्षात घेऊन त्याच्या विल्हेवाटीचा योग्य तो पर्याय स्वीकारला जातो.