मासे पकडणारा एक पाणपक्षी. पक्षिवर्गाच्या पेलिकॅनीफॉर्मिस गणाच्या पेलिकॅनिडी कुलात पाणकोळी या पक्ष्याचा समावेश होतो. जगात सर्वत्र त्याच्या ७­८ जाती आहेत. भारतात सामान्यपणे भुरकट पाणकोळी आढळतो. त्याचे शास्त्रीय नाव पेलिकॅनस फिलिपेन्सिस आहे. सायबीरियातील पेलिकॅनस रुफेसन्स  या जातीच्या पाणकोळ्याची पाठ गुलाबी असते, ईशान्य आफ्रिकेतील पेलिकॅनस ओनोक्रोटॅलस  हा सर्वांत मोठा पाणकोळी आहे. या दोन्ही जाती स्थलांतर करून भारतात येतात. प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू, गुजरात व ओडिशा या राज्यांतील मनुष्यवस्तीजवळ असलेल्या पाणथळ जागी या पक्ष्यांच्या वसाहती दिसून येतात. त्यांची चोच मोठी असून तिचा वरचा भाग चपटा असतो आणि चोचीच्या खालच्या भागास एक मोठी झोळीसारखी कातडी पिशवी असते. म्हणून या पक्ष्यांना ‘झोळीवाले’ असेही म्हणतात.

पाणकोळी (पेलिकॅनस फिलिपेन्सिस)

भुरकट पाणकोळी गिधाडापेक्षा मोठा असतो. त्याच्या शरीराची लांबी  १२५–१५२ सेंमी. व वजन ४–६ किग्रॅ. असते. रंग प्रामुख्याने पांढरा असून शरीरावर राखाडी पिसे असतात. पाय आखूड व बळकट असून बोटे पातळ पडद्यांनी जोडलेली असतात. या पायांनी ते उत्तम पोहू शकतात. उड्डाण पिसे काळसर तपकिरी आणि भुरकट तपकिरी असून शेपटीत २०–४० पिसे असतात. चोच मोठी, चपटी आणि पिवळसर असते. वरच्या चोचीच्या अर्ध्या भागावर निळसर काळसर ठिपके आणि टोकाला आकडी असते. खालच्या चोचीच्या तळाशी पिवळ्या किंवा जांभळ्या रंगाची झोळी लोंबत असते. या झोळीमुळेच पाणकोळी सहज ओळखता येतो. नर आणि मादी दिसायला सारखे असले, तरी नर आकाराने मोठा असतो.

पाणकोळी समूहप्रिय पक्षी असून तलाव, नदीमुखाचा प्रदेश, त्रिभुज प्रदेश व खाजण अशा ठिकाणी राहतात. मासे हे त्यांचे प्रमुख अन्न असले, तरी ते लहान उभयचर प्राणी, कवचधारी प्राणी व क्वचित प्रसंगी लहान पक्षीसुद्धा खातात. पाणकोळी समूहाने मासे पकडतात. पाण्यावर अर्धगोल करून पंख आपटत ते माशांना उथळ पाण्याकडे हाकलतात आणि सर्वजण मान खाली घालून चोचीखालील पिशवीमध्ये मासे भरून घेतात. पाण्याबाहेर येऊन चोचीतून पाणी बाहेर टाकतात आणि मासे गिळतात.

पाणकोळ्यांचा विणीचा हंगाम ऑक्टोबर–मे असा असतो. मादी एका वेळी २-३ पांढरी अंडी घालते. साधारणपणे ३०–३३ दिवसांत अंड्यांतून पिले बाहेर येतात. ३–५ महिने पिले घरट्याजवळ राहतात आणि ३-४ वर्षांनी प्रौढ होतात. पाणकोळ्याचा आयु:काल १०–२५ वर्षे असतो.

पूर्वी पाणकोळ्यांच्या शिकारीवर बंधने नव्हती. त्यामुळे त्यांची श‍िकार माेठ्या प्रमाणावर हाेत असे. तसेच डीडीटीच्या वापरामुळे पाणी प्रदूषित होऊन पाणकोळ्यांची अंडी फुटून नष्ट होत होती. सध्या पाणकोळ्यांच्या  शिकारीवर बंदी आहे, तसेच डीडीटीचा वापर थांबविण्यात आला आहे. त्यामुळे पाणकोळी पक्ष्यांची संख्या वाढत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा