स्तनी वर्गाच्या नरवानर गणातील प्राण्यांमध्ये हातापायांच्या बोटांवर असलेले बाह्यत्वचेचे उपांग. नखे ही केराटिनयुक्त प्रथिनाने बनलेली असून ती बोटांच्या टोकांना वरच्या बाजूवर असतात.

मानवी नखाची रचना

मानवी नखाचे नखपट्टिका, नख-आधारक आणि नखबैठक असे तीन भाग असतात. नखपट्टिका हा नखाचा दृश्य भाग असून नखाच्या वाढीबरोबर बोटाच्या टोकाकडे सरकत असतो. नखपट्टिका कठीण व आयताकार असून टोकाकडे बहिर्वक्र असते. हा भाग केराटिनयुक्त मृत पेशींच्या स्तरांनी बनलेला असतो. यालाच सामान्यपणे नख म्हणतात. नखपट्टिकेखाली नख-आधारक असते. यात आधारद्रव्य असून या भागात वृद्धिपेशी असतात. या वृद्धिपेशींपासून नखपट्टिका आणि नखबैठकीतील पेशी तयार होतात. नखबैठक ही नखपट्टिकेच्या खाली असून त्यात रक्तवाहिन्या आणि चेतातंतू असतात. या रक्तवाहिन्यांमुळे मूळची रंगहीन आणि पारदर्शक असणारी नखपट्टिका गुलाबी रंगाची दिसते. नखाच्या मूळाशी अर्धचंद्राकृती भाग असून त्याला ‘नखचंद्रक’ म्हणतात. या भागात रक्तवाहिन्या नसल्यामुळे हा भाग फिकट दिसतो. हा भाग अंगठ्यात सर्वांत मोठा तर करंगळीत सर्वांत लहान असतो.

काही कारणांनी बोटाचे नख निघाल्यास, परंतु नख-आधारक चांगल्या स्थितीत असल्यास नखाची पुन्हा वाढ होते. जखमांमुळे व खरचटल्यामुळेदेखील नखांवर पांढरे डाग उमटतात. नखांची जसजशी वाढ होते तसे हे डाग निघून जातात. नखांच्या वाढीसाठी दूध, दुग्धजन्य पदार्थ, प्रथिने आणि ड जीवनसत्त्वाची गरज असते. नखांवरून कावीळ, रक्तक्षय, कॅल्शियम व ऑक्सिजनची कमतरता इ. आजारांचे निदान करता येते. गुदमरणे, पाण्यात बुडणे, विषबाधा होणे, हिमदाह इत्यादी घटनांमध्ये नखाखाली असलेल्या रक्तवाहिन्यांतील रक्त साकळल्यामुळे नखे काळीनिळी पडतात. गजकर्ण हा त्वचारोग ज्या कवकांमुळे होतो त्यांच्या संसर्गाने नखे बाधित होऊ शकतात.