पालक ही वर्षायू वनस्पती ॲमरॅंटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव स्पिनॅशिया ओलेरॅशिया आहे. बीट व चंदनबटवा या वनस्पतीदेखील याच कुलात समाविष्ट आहेत. पालक वनस्पती मूळची मध्य आणि नैर्ऋत्य आशियातील असून तिचा प्रसार जगात सर्वत्र झालेला आहे. भारतात निरनिराळ्या हवामानांत पालक भाजीपाला म्हणून लागवडीखाली आहे.

पालक (स्पिनॅशिया ओलेरॅशिया) : (१) रोप, (२) फुलोरा, (३)पानांची जुडी

पालक वनस्पती  ३०–९० सेंमी. उंच वाढते. खोड लहान व गुळगुळीत असते. पाने साधी व एकाआड एक असून ती विविध आकारांची आणि आकारमानांची असतात. पाने २–१८ सेंमी. लांब असतात. खालच्या भागातील पाने मोठी व निमुळती असून त्यांच्या देठापाशी गोलसर भाग असतात. फुले सहज लक्षात न येणारी, हिरवी-पिवळी व ३-४ मिमी. व्यासाची असून त्यांचे रूपांतर लहान, कठीण व शुष्क फळांत होते. फळांत अनेक बिया असतात. परागण हवेमार्फत होते.

पालक वनस्पती ही खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचा उत्तम स्रोत आहे. १०० ग्रॅ. पालकाच्या सेवनातून ४६९ मिग्रॅ. जीवनसत्त्व, २८ मिग्रॅ. जीवनसत्त्व आणि २·७१ मिग्रॅ. लोह मिळते. तसेच या वनस्पतीपासून मॅग्नेशियमयुक्त आणि कॅल्शियमयुक्त खनिजे मिळतात. मात्र तिच्यात ऑक्झॅलेटाचे प्रमाण अधिक असल्याने मुतखडा होण्याची शक्यता असते. सूप आणि सॅलड यांमध्ये पालकाचा वापर करतात. ती वनस्पती सौम्य विरेचक आहे. आहारात अधूनमधून तिचा समावेश करावा, असे पोषणतज्ज्ञ सांगतात. पालकात असलेल्या उच्च पोषणमूल्यांमुळे आणि प्रतिऑक्सिडीकारकांमुळे या पालेभाजीची लागवड आणि तिचे सेवन जगात सर्वत्र केले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा