प्राचीन भारतीय ऋषींनी संख्या लेखनासाठी एक युक्ती शोधली. कटपयादि (क, ट, प, य आदि) पद्धती ही एक सांकेतिक भाषा आहे. विशेषत: मोठ्या मोठ्या संख्या श्लोकस्वरूपात लिहिताना अडचण येऊ लागली. काही ऋषींनी संख्या लेखनासाठी शब्दांकांचा (अंकासाठी शब्द) उपयोग केला आणि काही ऋषींनी कटपयादि पद्धतीचा अवलंब केला. या भाषेचे मूलसूत्र पुढीलप्रमाणे आहे.
‘कादिनव, टादिनव, पादिपंचक, याद्यष्टक क्ष: शून्यम् ।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की,
- कादिनव :- क, ख, ग, घ, ङ्, च, छ, ज आणि झ ही (क पासून झ पर्यंतची) नऊ अक्षरे अनुक्रमे १ ते ९ अंक दर्शवितात.
- टादिनव :- ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध ही (ट पासून ध पर्यंतची) नऊ अक्षरे अनुक्रमे १ ते ९ अंक दर्शवितात.
- पादिपंचक :- प, फ, ब, भ आणि म ही (प पासून म पर्यंतची) पाच अक्षरे अनुक्रमे १ ते ५ अंक दर्शवितात
- याद्यष्टक :- य, र, ल, व, श, ष, स आणि ह (य पासून ह पर्यंतची) आठ अक्षरे अनुक्रमे १ ते ८ हे अंक दर्शवितात.
- क्ष: शून्यम :- क्ष हे अक्षर शून्य हा अंक दर्शविते (याशिवाय ञ आणि न ही देवनागरी अक्षरेही शून्य हा अंक दर्शवितात) [नञअक्ष शून्यानी संख्या कटपयादि: ।]
या सांकेतिक भाषेतील अंक लेखनासाठी पुढील नियम आहेत.
- स्वरांसाठी कोणतेही अंकचिन्ह नाही. त्यामुळे प्रत्येक अक्षराच्या बाराखडीतील सर्व अक्षरे पहिल्या अक्षराचीच किंमत घेतात. म्हणजे च, चा, चि, ची, चु, चू, चे, चै, चो, चौ, चं, च: या सर्व अक्षरांची किंमत ‘सहा’ आहे.
- ‘ळ’ या देवनागरी अक्षराला कोणतीही किंमत नाही. तसेच ‘ज्ञ’ ह्या जोडाक्षर व्यंजनालाही किंमत दिलेली नाही.
- जोडाक्षरातील शेवटचे (पूर्ण व्यंजन) अंक दर्शविते. उदा., ‘प्र’ या जोडाक्षरात ‘प्’ हे अपूर्ण व्यंजन असून ‘र’ हे पूर्णव्यंजन आहे. म्हणून ‘प्र’ हे अक्षर दोन हा अंक दर्शविते. तसेच ‘स्व’ या जोडाक्षरात ‘स्’ हे अपूर्ण व्यंजन असून ‘व’ हे पूर्ण व्यंजन आहे. म्हणून ‘स्व’ हे जोडाक्षर चार हा अंक दर्शविते.
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | ० | |
कादिनव | क | ख | ग | घ | ङ | च | छ | ज | झ | ञ |
टादिनव | ट | ठ | ड | ढ | ण | त | थ | द | ध | न |
पादिपंचक | प | फ | ब | भ | म | – | – | – | – | – |
याद्यष्टक | य | र | ल | व | श | ष | स | ह | – | क्ष |
संदर्भ :
समीक्षक – शशिकांत कात्रेे