फार प्राचीन काळापासून शून्य ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शून्याच्या संगतीमुळे संख्येच्या किमतीत होणारा बदल हा नेहमीच आनंददायी असतो. शून्य हा बेरीज क्रियेचा ‘अविकारक घटक’ आहे. म्हणजेच शून्यामध्ये कोणतीही संख्या मिळवली किंवा कोणत्याही संख्येत शून्य मिळविले तर येणारी बेरीज ही तीच संख्या असते. एखाद्या संख्येत उजव्या बाजूला शून्य आल्यास त्या संख्येची किंमत बदलते, तसेच डाव्या बाजूला आल्यास त्याची किंमत बदलत नाही.

प्राचीन काळी शून्य होते का? अगदी अलिकडे पर्यंत अशी मान्यता होती की, ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील ईशान्य दिशेला एक हेमाडपंथी भग्न चतुर्भुज मंदिर आहे. या मंदिरात एक शिलालेख असून तो पाहण्यासाठी विशेषतः विदेशातील गणित प्रेमी आवर्जून येतात. मंदिराच्या जवळ आता भारतीय पुरातत्त्व खात्याने हिंदी व इंग्रजी भाषेत एक कोनशिला बसविलेली आहे. तसेच “झिरो- ग्वालियर क्षेत्रमे शून्य का प्राचीनतम शिलालेख” असे दिशादर्शक फलकावरही कोरलेले आहे. हे मंदिर संवत्सर 933 (म्हणजे इसवी सन 876 मध्ये) माघ वद्य द्वितीयेला बांधून पूर्ण झाले. कोणी एका अला नावाच्या व्यक्तीने चतुर्भुज मंदिरातील देवाला दररोज 50  पुष्पहार मिळावेत म्हणून जवळच एक 270 हात लांब आणि 187 हात रूंद जमीन देवस्थानला दान म्हणून दिलेली आहे. इथे 0 या अंकचिन्हाचा वापर केला आहे.

पाकिस्तानातील पेशावर पासून 40 किमी. अंतरावर ‘बक्षाली’ नावाचे गाव आहे. हे गाव तक्षशिलेपासून सुमारे 100 किमी. आहे. तेथे मिया-अन्वान-उद्दिम या माणसाला एक पेटी सापडली. त्या पेटीमध्ये जीर्ण अवस्थेतील  लिहिलेली काही हस्तलिखिते आढळली. कार्बन डेटिंग मध्ये बक्षाली हस्तलिखिताचा काळ हा इ.स. 224-383, 680-779 व 889-993 अशी वेगवेगळी वर्षे सांगितली होती.

म्हणून ‘शून्य ‘ ही वेदकाळापासून अस्तित्वात असलेली संख्या-संकल्पना, अंकचिन्ह (0) या स्वरूपात आली ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकाच्या पूर्वीपासूनच.

आर्यभट, ब्रह्मगुप्त, वराहमिहिर, श्रीधराचार्य, आचार्य विजयानंद, आचार्य वटेश्वर, भास्कराचार्य  यांनी आपल्या ग्रंथात शून्य या शब्दांकाचा उल्लेख केलेला असला तरी शून्याचे अंकचिन्ह त्यांच्या पूर्वी अस्तित्वात होते. शून्याच्या संकल्पनेचा उल्लेख यजुर्वेद, अर्थववेद, संहिताग्रंथ, सिद्धांत शिरोमणी या ग्रंथांत ‘शब्दांक’ रूपात आहे.

समीक्षक – शशिकांत कात्रे