प्राचीन काळी मुद्रणकला विकसित झालेली नव्हती. भूर्जपत्रांवरही लेखन करण्याची कला फारशी परिचित नव्हती. सर्व वैज्ञानिक आणि गणिती संकल्पना शब्दबद्ध आणि श्लोकबद्ध करण्यात येत होत्या. अध्ययन अनुभूतींचे संक्रमण मौखिकपणे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे होत होते. त्यासाठी श्लोकांना गेयता असणे गरजेचे असते. श्लोकांना गेयता प्राप्त व्हावी यासाठी पूर्वी छंदांचा आणि अक्षरगण वृत्तांचा उपयोग केला जात असे. त्यासाठी प्रत्येक ओळीतील मात्रांचे गणन निर्धारित असे. म्हणून अंकांसाठी किंवा संख्यांसाठी वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग केला जात असे. अशा अंक किंवा संख्या दर्शक शब्दांना ‘शब्दांक’ असे म्हटले जाते.
वेद, वेदांगे, संहिता ग्रंथ, ब्राह्मण ग्रंथ, शुल्बसूत्रे यामध्ये अनेक ठिकाणी अंक किंवा संख्या लेखनासाठी शब्दांकांचा उपयोग केलेला असल्याचे आढळून येते. इ. स. 1340 ते 1425 या काळात होऊन गेलेल्या माधवाचार्य या गणितीने (पाय म्हणजे वर्तुळच्या परिघाचे त्याच वर्तुळाच्या व्यासाशी असलेले गुणोत्तर) ची जास्तीत जास्त अचूक किंमत सांगणारा पुढील श्लोक दिलेला आहे.
विबुध नेत्र मज अहि हुताशन: ।
त्रि गुण वेद भ वारण बाहवा: ॥
नव निखर्व मिते वृत्तविस्तरे।
परिघि मानम् इदं जगदु बुधा ॥
या श्लोकातील शब्दांक पुढीलप्रमाणे आहेत.
विबुध = 33 (देव); नेत्र = 2 (डोळे); गज = 8 (हत्ती); अहि = 8 (सर्प); हुताशन = 3 (अग्नि); त्रीगुण = 3 (तीन गुण); वेद = 4 (वेद); भ = 27 (नक्षत्रे); वारण = 8 (हत्ती); बाहवा = 2 (हात); नव निखर्व = 900,000,000,000. अंकांना वामतो गति:। या नियमानुसार वरील किंमती उजीवकडून डावीकडे लिहाव्या लागतील.
परिघ = 2872433388233, व्यास =900,000,000,000
प्राचीन भारतीय गणित ग्रंथांनुसार काही ‘शब्दांक’ पुढीलप्रमाणे आहेत.
शून्य : शून्य, ख, गगन, अंबर, आकाश, व्योम, अंतरिक्ष, नभ, पूर्ण, पूर्णरंध्र.
एक : आदि, शशि, इंदू, चंद्र, शशांक, शशधर, भूमी, धरा, क्षिति, मही, पृथ्वी.
दोन : यम, अश्विन, लोचन, नेत्र, चक्षु, नयन, बाहू, कर, कर्ण, द्वे (द्वि, द्वय), युशुल, युग्म, बाहवा, हस्त, पाद.
तीन : राम, गुण, लोक, भवन, काल, त्रि, त्रिनेत्र, हरनेत्र, अग्नि, हूताशन, त्रिगुण, वैश्वानर.
चार : चतूर, वेद, श्रुति, समुद्र, जलधि, वर्ण, आश्रम, पुरुषार्थ.
पाच : पंच, बाण, शर, शास्त्र, पर्व, भूत, प्राण, पांडव, अर्थ, महाभूत, तत्त्व, इंद्रिय.
सहा : रस, अंग, काय, ऋतू, दर्शन, तर्क, द्रव्य, खर, षण्मुख, षष्ठ.
सात : पर्वत, शैल, अचल, गिरी, ऋषि, मुनि, यति, अत्रि, धातु, आसव, मातृका, सप्त.
आठ : वसु, अहि, नाग, गज, दंति, द्विरद, मातंग, द्विप, सिंधूर, अनुष्टुभ, वारण, सर्प, अष्ट.
नऊ : अंक, नंद, निधि, ग्रह, रंध्र, छिद्र, द्वार, केशव, पदार्थ, दुर्गा, नवम्.
दहा : दिश, दिशा, दशम, पंक्ति, रावण शीर्ष, दशक.
अकरा : रूद्र, ईश्वर, मृड, हर, भाव, भर्ग, महादेव, एकादश.
बारा : रवि, सूर्य, अर्क, मार्तण्ड, भानु, आदित्य, मास, राशि, व्यय, द्वादश, हिरण्यगर्भ, भास्कर.
तेरा : विश्वदेवा, विश्व, काम, अघोष, त्रयोदश.
चौदा : मनु, विद्या, इंद्र, चतुर्दशी.
पंधरा : तिथि, पक्ष, पंचादश, पंचदशो:.
सोळा : नृप, भूप, भूपति, कला, षोडश.
सतरा : अत्यष्टि, सप्तदश.
अठरा : धृति, अष्टादश.
एकोणीस : अतिधृति.
वीस : नख, कृति, विशति:.
चोविस : गायत्री, जिन, अर्हत्त, सिद्ध.
सत्तावीस : नक्षत्र, भ.
तेहतीस : देव, अमर, सुर, विबुध.
हे ‘शब्दांक’ वेदकालापासून चौदाव्या शतकापर्यंत उपयोगात आणले जात होते. ‘खहर’ या शब्दांकाचा अर्थ ‘अनंत’ असा होतो. कारण ‘ख’ म्हणजे शून्य आणि ‘हर’ म्हणजे भागणे. म्हणून कोणत्याही शून्येतर संख्येला शून्याने भागले तर ‘अनंत’ ही संख्या मिळते.
समीक्षक : उल्हास दीक्षित