एक तैलयुक्त गवत. रोहिश वनस्पतीला रोजा गवत अथवा रोशा गवत असेही म्हणतात. पोएसी कुलातील या गवताचे शास्त्रीय नाव सिंबोपोगॉन मार्टिनाय आहे. वाळा व गवती चहा या वनस्पतीही सिंबोपोगॉन प्रजातीतील आहेत. रोहिश ही मूळची भारत व चीन या देशांतील असून तिचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे. सुगंधी तेलासाठी ती सर्वत्र लागवडीखाली आहे.
रोहिश या बहुवर्षायू व झुबक्यासारख्या वाढणाऱ्या गवताची उंची १.५–२ मी. असते. त्याची मुळे जमिनीत फार खोलवर नसतात. आगंतुक मुळे जमिनीलगत पसरलेली असतात. खोड २–४ सेंमी. जाड असून जमिनीलगत पसरलेले असते. पाने सुगंधी असून ती सु. ०.५ मी. लांब, अरुंद व तलवारीसारखी असतात. फुलोरा लांब, झुबकेदार आणि जमिनीतील खोडापासून वर आलेल्या उभ्या फांदीवर असतो. फुलोऱ्यावर लहान कणिशके जोडीने येतात. काही बिनदेठाची कणिशके स्त्रीलिंगी किंवा उभयलिंगी असतात. नर-फुले आणि मादी-फुले एकाच झाडावर व फुलोऱ्यात असतात. एका कणिशकात एकच फूल असते आणि ते नर-फूल, मादी-फूल किंवा द्विलिंगी असते. परागण वाऱ्यामार्फत होते. फळ तृण प्रकारचे असून ते एकबीजधारी असते.
रोहिशच्या पानांमध्ये सुगंधी तेल असते. या तेलाला पामरोजा तेल अथवा रोशेल तेल म्हणतात. तेलामध्ये जिरॅनिऑल हा मुख्य घटक असून त्याचा उपयोग पारंपरिक औषधांत तसेच घरगुती वापरात होतो. पामरोजा तेल कीटकांना दूर पळवून लावते, म्हणून धान्याच्या साठ्यात ते वापरतात. तसेच बुरशीनाशक व कृमिनाशक म्हणूनही तेलाचा वापर होतो. पामरोजा तेलाचा गंध गुलाबासारखा असल्यामुळे ते साबणामध्ये तसेच इतर सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरतात.