एक रसाळ फळ. भारतीय स्थानिक भाषेत या फळाला नासपती म्हणत असले तरी भारताबाहेर ते पेअर या इंग्रजी नावाने अधिक परिचित आहे. ही फळे ज्या वृक्षापासून मिळतात त्यांचा समावेश रोझेसी कुलातील पायरस प्रजातीत होतो. गुलाब, सफरचंद या वनस्पतीही रोझेसी कुलातील आहेत. सामान्यपणे पायरस प्रजातीच्या वनस्पतींना पेअर म्हणतात. या प्रजातीत सु. २० जाती असून विशेषेकरून त्या समशीतोष्ण प्रदेशात आढळतात. पायरस कॉम्युनिस म्हणजे सामान्य पेअर. ही वनस्पती मूळची पूर्व यूरोप आणि पश्चिम आशियातील असून त्यापासून आजचे रसाळ आणि लुसलुशीत प्रकार विकसित झाले आहेत. आशियातील आजचे प्रकार चिनी सँडपेअर (पा. पायरिफोलिया) या जातींपासून तयार झाले आहेत. या प्रकारातील फळांचा गर काहीसा चरबरीत आणि रवाळ असतो. भारतात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि निलगिरी टेकड्या येथे काही ठिकाणी नासपतीची लागवड करतात.

पाने व फळांसहित नासपतीची फांदी

नासपती वृक्ष डेरेदार व पानझडी असून १०–१५ मी. उंच व सरळ वाढतात. पाने साधी, एकाआड एक, २–२.५ सेंमी. लांब, वर्तुळाकार, चिवट व तळाशी पाचरीसारखी असतात. फुले पांढरी, २–२.५ सेंमी. व्यासाची असून ती पानांच्या अक्षामध्ये येतात. बहुतेक जातींमध्ये मधमाश्यांमार्फत परागण होते. झाडे लावल्यापासून ४ ते ७ वर्षांमध्ये फलधारणा होते. फळे आकाराने पेरूसारखी, देठाजवळ निमुळती व दुसऱ्या टोकास गोलाकार, नरम व चवीला गोड असतात. एका फळात बिया सु. १०, परंतु कमीजास्त असतात. फळांच्या गरामध्ये १५% कर्बोदके असून ०.४% प्रथिने असतात. याखेरीज कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, अन्य खनिजे, तसेच -समूह आणि जीवनसत्त्वे असतात. ही फळे सफरचंदापेक्षा अधिक नरम व गोड असतात. पाणी व ऊष्मांक दोन्ही फळांमध्ये सारखी असतात.

नासपतीची ताजी व पिकलेली फळे तशीच खातात. त्यांच्या रसापासून सरबते तसेच मद्ययुक्त पेये बनवितात. फळे तशीच किंवा हवाबंद करून विक्रीसाठी ठेवतात. त्यांपासून मुरांबे करतात. फळात शर्करा कमी असल्याने ती मधुमेही लोकांना खाण्यास उपयोगी असतात. फळे स्तंभक, शामक व ज्वरनाशी आहेत.