कुळीथ

कुळीथ (हुलगा) ही फॅबेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव डॉलिकॉस बायफ्लोरस असे आहे. ही शिंबावंत (शेंगा येणारी) वेल असून सामान्यपणे उष्ण कटिबंधात आढळते. अनेक शारीरिक लक्षणांत हिचे पावट्याच्या वेलीशी साम्य असले, तरी काही फरक आहेत. भारतात सर्वत्र कुळिथाची लागवड करतात. आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांत कुळिथाचे पीक मोठ्या प्रमाणात काढतात.

अनेक शाखायुक्त असणारी ही वर्षायू वेल सरपटत वाढते. पाने त्रिपर्णी असून पर्णके भालाकृती किंवा लांबट असतात. फुले पिवळी व पतंगरूप असतात. शिंबा (शेंगा) ५ सेंमी. पर्यंत लांब, तलवारीप्रमाणे वाकड्या व चपट्या असतात. त्यात ५ ते ६ पिंगट, तांबूस किंवा काळ्या वृक्काकार बिया असतात.

स्त्रियांना मासिक स्रावाच्या दोषांवर कुळिथाच्या बियांचा काढा देतात. उचकी, मूळव्याध व यकृताचे दोष यांवरही हे गुणकारी आहे. लठ्ठपणा कमी होण्यास व मूतखडा निचरून जाण्यास हे उपयुक्त असते.

लोह आणि मॉलिब्डेनम यांसाठी कुळीथ हे एक उत्तम स्रोत आहे. दाण्यांच्या पिठाचे पिठले वा गूळ घालून खाद्यपदार्थ बनवितात. दाणे भरडून, भिजवून अगर शिजवून दुभत्या आणि कष्टाळू जनावरांना पौष्टिक खाद्य (खुराक) म्हणून चारतात. पालाही गुरांना चारतात.