स्तनी वर्गातील नरवानर गणात आधुनिक मानवाचा समावेश होतो. नरवानर गणातील आता अस्तित्वात नसलेल्या पूर्वजांपासून आधुनिक मानवाची उत्क्रांती झाली आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या या दीर्घ प्रक्रियेला सु. ६० लाख वर्षांचा कालावधी लागलेला आहे. दोन पायांवर उभे राहून चालणे – हे मानवाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण मानले जाते आणि सु. ४० लाख वर्षांपूर्वी मानवामध्ये ते लक्षण उत्क्रांत झाले. त्यानंतर, आकारमानाने व गुंतागुंतीची संरचना असलेला मेंदू, अवजारांची निर्मिती व वापर, भाषेची क्षमता इ. इतर मानवी वैशिष्ट्ये विकसित झाली. यांखेरीज जटिल सांकेतिक अभिव्यक्ती, कला आणि सांस्कृतिक विविधता इ. प्रगत वैशिष्ट्ये मागील एक लाख वर्षांत विकसित झालेली आहेत.

नरवानर गणातील अगदी प्रारंभिक प्राण्यांपासून आधुनिक मानव (होमो सेपिएन्स) उत्क्रांत होण्याचे टप्पे यांचा बव्हंशी क्रम पुढीलप्रमाणे आहे; नरवानर गणाच्या एका टप्प्यावर होमोनायडिया अधिकुलातील प्राणी कपि (एप) उत्क्रांत झाले. पुढे या अधिकुलाच्या दोन शाखा झाल्या. त्यांपैकी एका शाखेमध्ये गिबन या एकाच प्राण्याचा समावेश होतो. त्यांना लहान कपि म्हटले जाते. दुसऱ्या शाखेच्या प्राण्यांना मोठे कपि (होमिनिडी कुल) म्हटले जाते. पुढे होमिनिडी कुलाची उपकुले झाली. त्यांपैकी अस्तित्वात असलेल्या एका उपकुलात ओरँगउटानांचा (पाँजिडी उपकुल) समावेश होतो आणि दुसऱ्या उपकुलात गोरिलीनी व होमिनीनी या दोन जमाती आहेत. गोरिलिनी जमातीत गोरिला या एकाच प्रजातीचा समावेश होतो, तर होमिनिनी जमातीत चिंपँझी (पॅन प्रजाती) आणि ज्यांना आदिमानव म्हणता येईल अशा उपजमाती येतात. या उपजमातींमध्ये सहेलँथ्रोपस, ऑस्ट्रॅलोपिथेकस, पॅरँथ्रोपस, आर्डिपिथेकस अशा विलुप्त प्रजाती आणि होमो प्रजाती येते. होमो  प्रजातीत सात जाती ओळखल्या गेल्या आहेत. त्यांपैकी होमो सेपिएन्स  ही जाती म्हणजेच आधुनिक मानव आहे.

मानव आणि चिंपँझी यांच्या डीएनएची तुलना केली असता त्यांत ९८·८% सारखेपणा दिसून आला आहे. याचा अर्थ मानव आणि चिंपँझी एकाच पूर्वजांपासून उद्‌भवले असावेत. साधारणपणे ८०–६० लाख वर्षांपूर्वी होमिनिडी कुलातील प्राण्यांची विभागणी चिंपँझी आणि आदिमानव अशा दोन गटांमध्ये झाली. ही उत्क्रांती बव्हंशी आफ्रिका खंडात घडून आली. ६०–२० लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या आदिमानवाचे जीवाश्म आफ्रिकेत सापडले आहेत.

लाखो वर्षांपूर्वीचे सापडलेले मानवसदृश जीवाश्म आणि इतर माहितीच्या आधारे वैज्ञानिकांनी मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे केलेले आहेत. तसेच हे जीवाश्म ज्या काळातील आहेत, त्यानुसार मानवाच्या जातींना नावे देऊन मानवाच्या उत्क्रांतीमधील सलगता शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे टप्पे अंतिम नाहीत. भविष्यातील संशोधनानुसार त्यात बदल होऊ शकतात.

आदिमानवाच्या १५–२० जाती असाव्यात, हे बहुतेक वैज्ञानिकांनी मान्य केले आहे. मात्र या जाती एकमेकांशी कशा संबंधित होत्या व कोणती जाती विलुप्त झाली याबद्दल वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही. आदिमानवाच्या जाती कशा ओळखाव्यात आणि ठराविक जातीचे वर्गीकरण कसे करावे, प्रत्येक जातीच्या उत्क्रांतीमध्ये कोणते घटक कारणीभूत झाले व ती विलुप्त कशी झाली, यासंबंधी वैज्ञानिकांमध्ये चर्चा चालू आहे.

१. सहेलँथ्रोपस प्रजाती : सहेलँथ्रोपस कॅडेन्सिस  ही होमिनिडी कुलातील विलुप्त झालेली जाती असून ती सु. ७० लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. ही मानवाची पहिली जाती असावी अशी दाट शक्यता आहे. २००१ साली पुराजीववैज्ञानिकांना आफ्रिकेच्या जुराब वाळवंटात एक कवटी सापडली. ही कवटी मानवाच्या कवटीसारखी होती. मायोसीन कालखंडात (२ कोटी ३० लाख वर्षे – ५३ लाख वर्षे) जेव्हा चिंपॅंझी आणि मानव हे प्राणी एकमेकांपासून वेगळे झाले तेव्हा ही जाती अस्तित्वात होती. ही ओरोरीन प्रजातीची पूर्वज असावी, असेही एक मत आहे.

२. ओरोरीन प्रजाती : ओरोरीन ट्युजेन्सिस ही होमिनीनी उपकुलातील सुरुवातीची जाती असावी, असे मानतात. ६१–५७ लाख वर्षांपूर्वी ही जाती अस्तित्वात असावी. २००० साली या जातीचे काही जीवाश्म सापडले असून ती मानवाशी कशा प्रकारे संबंधित होती, हे मात्र अजून निश्चित झालेले नाही.

३. आर्डिपिथेकस  प्रजाती : ईथिओपियामध्ये मायोसीन कालखंडाच्या उत्तरार्धात आणि प्लायोसीन कालखंडाच्या (५३ लाख वर्षे –२५ लाख वर्षे) सुरुवातीला विलुप्त झालेल्या होमिनिडी कुलाच्या होमिनीनी उपकुलातील ही प्रजाती अस्तित्वात होती. कपीच्या मुख्य वंशावळीपासून वेगळी झाल्यानंतर मानवाचे ते सर्वांत आधीचे पूर्वज असावेत असे त्यांचे वर्णन असले, तरी या प्रजातीचा मानवाच्या पूर्वजांशी संबंध होता का आणि तो होमिनीन होता का, यावर अजूनही वाद आहेत. यांच्या दोन जाती मानल्या जातात; १) आर्डिपिथेकस रॅमिडस : ही जाती प्लायोसीन कालखंडाच्या पूर्वार्धात सु. ४४ लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. २) आ. कडाब्बा : ही जाती मायोसीन कालखंडाच्या उत्तरार्धात सु. ५६ लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. वर्तनविषयक विश्लेषणातून असे आढळले आहे की, आर्डिपिथेकस हे चिंपँझीसारखे असावेत. या आदिमानवाच्या केवळ कवटीच्या मागची हाडे व दातांचे संच मिळालेले आहेत. आ. कडाब्बा हे द्विपाद असून त्यांचे शरीर व मेंदू आधुनिक चिंपँझीसारखा आणि सुळे तोंडातून पुढे डोकावणारे होते. पायाच्या अंगठ्याचे हाड पसरट व दणकट असल्यामुळे ही जाती रेटा देऊन चालत असावी, असे दिसते.

४. ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रजाती : (४२–३० लाख वर्षांपूर्वी) अनेक वैज्ञानिकांनी या प्रजातीची विभागणी आकारमान, जबडा व दात यांचा आकार आणि आकारमान, मेंदूचे आकारमान या बाबींनुसार चार जातींमध्ये केलेली आहे.

१) ऑस्ट्रॅलोपिथेकस ॲनामन्सिस : ही जाती सर्वांत आधीची मानली जाते. या जातीमध्ये कपी आणि मानव या दोघांच्या लक्षणांचे मिश्रण होते. पोटरीच्या हाडाचा वरचा भाग पसरट आणि घोट्याच्या सांध्याची मानवासारखी रचना यांवरून ही जाती द्विपाद होती. तसेच बाहूचे लांब हाड व मनगटाचे हाड यांवरून हे दिसते की ही जाती झाडावर चढू शकत होती.

केनियांथ्रोपस प्लॅटिऑप्सचे ३५–३२ लाख वर्षापूर्वीचे जीवाश्म केनियातील तुर्काना सरोवर येथे सापडले आहे, काही वैज्ञानिकांच्या मते, ही नवीन व वेगळी प्रजाती आणि जाती आहे, तर इतरांच्या मते ती ऑस्ट्रॅलोपिथेकसची एक जाती आहे.

२) ऑ. ॲफेरियानसिस : ही आदिमानवाची सर्वपरिचित व दीर्घकाळ जगलेली जाती असावी. या जातीचे सु. ३०० पेक्षा अधिक जीवाश्म शोधून काढले आहेत. या जातीची पूर्ण कल्पना येईल असा या जातीच्या मादीचा अर्धवट सांगाडा ईथिओपियामध्ये सापडला आहे. त्याला ‘ल्यूसी’ असे नाव दिले असून सांगाड्याची उंची सु. १०० सेंमी. व वजन सु. २७ किग्रॅ. आढळले आहे. ३८·५–२९·५ लाख वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेतील ईथिओपिया, केनिया, टांझानिया येथे अस्तित्वात असलेली ही जाती सु. नऊ लाख वर्षांहून अधिक काळ टिकून होती, जो कालावधी आधुनिक मानवाच्या कालावधीच्या चार पट आहे. चिंपँझीप्रमाणे ऑ. ॲफेरियानसिस  जातीच्या बालकांची वाढ जन्मानंतर मानवांपेक्षा वेगाने होत असे आणि ते लवकर प्रौढ होत. त्यामुळे बालपणात मातापित्यांचे मार्गदर्शन आणि सामाजिकीकरणासाठी त्यांना कमी कालावधी उपलब्ध झाला. या जातीच्या सदस्यांमध्ये कपीसदृश चेहरा (बसके नाक, पुढे आलेला खालचा जबडा), मेंदूची लहान कवटी (मानवापेक्षा आकारमानाने लहान असलेला सु. ५०० ग्रॅ. वजनाचा मेंदू) आणि झाडावर चढण्यासाठी अनुकूलीत बोटे व मजबूत बाहू ही लक्षणे दिसून आली. इतर आदिमानवांप्रमाणे त्यांचे सुळ्यांचे दात लहान होते, शरीर दोन पायांवर आधारलेले होते आणि ते ताठ चालत असत. झाडांवर व जमिनीवर असे दोन्ही ठिकाणी वावरण्यासाठी अनुकूलन झाल्यामुळे ती पर्यावरणात बदल होऊनही दीर्घकाळ (नऊ लाख वर्षे) टिकून राहिले होते.

३) ऑ.गऱ्ही : ही जाती ३०–२० लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असावी. या जातीचे दस्तावेज कमी उपलब्ध आहेत. कवटीचे एक जीवाश्म, वेगळ्या एका कवटीचे चार तुकडे आणि त्याच स्तरापासून जवळच आढळलेला अपूर्ण सांगाडा या माहितीनुसार हे अवशेष या जातीचे असावेत, असे मानतात. सांगाड्याच्या मांडीचे हाड लांब, बाहू लांब व मजबूत असल्याचे आढळले असून ते दोन पायांवर चालताना लांब टांगा टाकून चालत असावेत, असा अंदाज आहे.

४) ऑ. आफ्रिकॅनस : ही जाती ३३–२१ लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत अस्तित्वात होती. शारीरिक दृष्ट्या ही जाती ऑ. ॲफेरियानसिस  जातीसारखी  होती.

५. पॅरँथ्रोपस प्रजाती : आदिमानवाच्या या गटाचे तीन जीवाश्म उपलब्ध आहेत. मोठे दात व बळकट जबडे यांमुळे या गटातील सदस्यांना विविध प्रकारचे अन्न खाणे शक्य झाले.

१) पॅरँथ्रोपस इथिओपिकस : ही जाती २७ लाख–२३ लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. या जातीचे कमी अवशेष सापडले आहेत. त्यामुळे वैज्ञानिकांना या जातीबद्दल गूढ आहे. १९८५ साली २५ लाख वर्षे जुनी असलेली काळी कवटी (ब्लॅक स्कल) सापडल्यामुळे ‘रोबस्टस ऑस्ट्रॅलोपिथेसिन’ ही जाती ओळखणे शक्य झाले. पॅ. इथिओपिकस जातीचा चेहरा पुढे आलेला असून दात मोठे, जबडा बळकट व कवटीवर मोठी उंचवटा असलेली रेषा होती.

२) पॅ. बोईसेई : या जातीचे वैशिष्ट्य असे की, चर्वणासाठी या जातीची कवटी अनुकूलित झालेली होती. कवटीच्या वरच्या भागातून जबड्याकडे खाली आलेले स्नायू जास्त विकसित व बळकट असल्यामुळे जबड्याची वरखाली हालचाल चांगली करता येत असे. दाढा आणि उपदाढा यांची वाढ चांगली असून हे दात बळकट होते. गालाची हाडे रुंद असल्यामुळे या जातीचा चेहरा बशीसारखा पसरट होता. दातांवरचे एनॅमलचे कवच आधीच्या आदिमानवांच्या दातांच्या तुलनेत जाड होते. तसेच दात पॅ. रोबस्टस  जातीच्या दातांपेक्षा जाड होते. यांच्या मेंदूच्या आकारमानात किंचित वाढ (सु. १० लाख वर्षांत सु. १०० ग्रॅ. एवढी) झाली होती.

३) पॅ.रोबस्टस : या जातीचा चेहरा रुंद व बशीसारख्या पसरट होता. गालाच्या भागातील दात मोठे असून त्यांवर एनॅमेलचे जाड आवरण होते आणि चर्वण जबड्याच्या मागच्या भागात होत असे. चर्वण स्नायू कवटीला जुळलेले असल्यामुळे या जातीची कठीण व तंतुमय अन्न चर्वण करण्याची क्षमता होती. दातांमुळे आणि चेहऱ्यामुळे या जातीला पॅ. रोबस्टस  असे नाव देण्यात आले.

६. होमो प्रजाती  : या प्रजातीतील सदस्यांचा मेंदू आकारमानाने मोठा असून त्यांनी अवजारे तयार करून वापरली. आफ्रिकेच्या बाहेरदेखील या गटातील सदस्यांनी स्थलांतर केले.

१) होमो हॅबिलीस : ही जाती होमो प्रजातीतील सर्वांत पहिली मानली जाते. ऑस्ट्रॅलोपिथेकस  जातीपेक्षा या जातीची मेंदूची करोटी किंचित मोठी, तर चेहरा व दात लहान होते. या जातीमध्ये हात लांब व पुढे आलेला जबडा अशी कपींची वैशिष्ट्ये टिकून होती. या जातीने दगडापासून प्रथम अवजारे बनवली. म्हणून या जातीला १९६४ साली ‘हॅन्डी मॅन’ असे नाव दिले गेले.

२) हो. रुडॉल्फेन्सिस : ही जाती १९ लाख–१८ लाख वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेतील उत्तर केनिया, उत्तर टांझानिया आणि मालावी येथे अस्तित्वात होती. या जातीचे केवळ एकच जीवाश्म सुस्थितीत मिळाले असून त्याचे एक लक्षणीय वैशिष्ट्य आहे. या जीवाश्माची मेंदूची करोटी सु. ७७५ घ.सेंमी. आहे.

३) हो. इरेक्टस : आफ्रिकेतील हो. इरेक्टस चे (हो. इरगॅस्टर) जीवाश्म हे सर्वांत आधीच्या आदिमानवाचे असावे, असे मानतात. कारण जीवाश्माचे पाय आधुनिक मानवाप्रमाणे लांब व बाहू आखूड होते. ही वैशिष्ट्ये जमिनीवर वावरण्यासाठी अनुकूलित झाली असावीत. याचा अर्थ झाडावर वावरण्याची त्यांची क्षमता लोपली जाऊन जमिनीवर ते चालत असावेत आणि लांब अंतर ते पळत असावेत. तसेच मेंदूची करोटी चेहऱ्याच्या तुलनेत विस्तारलेली होती. या पूर्ण जीवाश्माला ‘तुर्काना बॉय’ असे नाव असून ते सु.१६ लाख वर्षांपूर्वीचे आहे. जीवाश्मांवरून हे लक्षात येते की, ही जाती वृद्धांची व दुबळ्यांची काळजी घेत असावी. या जीवाश्मांसोबत हातांनी चालविता येतील अशी दगडी अवजारे आढळली आहेत, जे तंत्रज्ञान पहिले व नाविन्यपूर्ण मानले जाते.

४) हो. हायडेल्बर्गेन्सिस : ही जाती ७ लाख–२ लाख वर्षांपूर्वी यूरोप, चीन, पूर्व आफ्रिका व दक्षिण आफ्रिका येथे अस्तित्वात होती. या आदिमानवाचे पूर्वीच्या आदिमानवाच्या तुलनेत डोळ्यांच्या खोबणीचे वरचे हाड मोठे, मेंदूची करोटी मोठी आणि चेहरा पसरट होता. त्यांचा देह आखूड व पसरट असून उष्णता साठवून ठेवण्यासाठी अनुकूलित होता. थंड वातावरणात राहणारी ही आदिमानवाची पहिली जाती असावी. अग्निचा नियंत्रित वापर आणि अवजारांसाठी लाकडाचा वापर ज्या काळात झाला, त्या काळात ही जाती राहत होती. या जातीने स्वत:च्या निवाऱ्यासाठी दगड व लाकूड यांपासून सर्वप्रथम संरचना तयार केली. मोठ्या जनावरांची शिकार करणारी ही पहिली आदिमानवाची जाती होती.

५) हो. फ्लोरेसिन्सिस : मागील काही दशकांत या आदिमानवाचे अवशेष इंडोनेशियामध्ये सापडले आहेत. ते १ लाख–६० हजार वर्षांपूर्वीच्या काळातील असून त्यांनी बनविलेली दगडी अवजारे १ लाख ९० हजार– ५० हजार वर्षे जुनी आहेत. उंची सु. १०० सेंमी., मेंदू लहान, दात मोठे, खांदे पुढे झुकलेले, हनुवटीचा अभाव, कपाळ मागे झुकलेले, लहान पाय परंतु मोठी पावले अशी त्यांची वैशिष्ट्ये दिसून आली आहेत. शरीर व मेंदू लहान असून त्यांनी लहान हत्ती व मोठे कृंतक यांची शिकार केली असावी, असे दिसते.

६) हो. निअँडरथलेन्सिस : मानवाला सर्वांत जवळचा असलेला नातेवाईक. चेहऱ्याचा मध्यभाग मोठा, गालाची हाडे बाकदार, थंड व कोरडी हवा उबदार व ओलसर करण्यासाठी मोठे नाक अशी वैशिष्ट्ये या जातीची होती. त्याचे शरीर लहान असून ते थंड वातावरणात राहात. मेंदू आधुनिक मानवाच्या मेंदूएवढा होता. हो. निअँडरथलेन्सिस जातीने वैविध्यपूर्ण व सुविकसित अवजारे तयार केली व वापरली. तसेच अग्निचा वापर नियंत्रितपणे केला, निवारे तयार करून राहिले, वस्रे वापरली आणि दागिने व शोभनीय वस्तू तयार केल्या. मोठ्या प्राण्यांची कुशलतेने शिकार केली. तसेच वनस्पतींचा अन्नात समावेश केला. असे आढळले आहे की, त्यांच्या जातीतील मृतांना ते पुरून टाकत आणि दफन केलेल्या जागांवर ते फुले वाहत. अन्य कुठल्याही कपीचे किंवा अन्य आदिमानवाचे असे वर्तन अद्याप आढळलेले नाही. अशा डझनभर जीवाश्मांचे डीएनए मिळवले असून मानवाच्या उगमासंबंधी निअँडरथल जीनोम प्रकल्प सध्या चालू आहे.

७) हो. सेपिएन्स : आजच्या घडीला हयात असलेल्या मानवाच्या सर्व जाती होमो सेपिएन्सच्या जाती आहेत. सु. २ लाख वर्षांपूर्वी घडून आलेल्या हवामानातील बदलामुळे होमो सेपिएन्स ही जाती आफ्रिकेत उत्क्रांत झाली. अन्य आदिमानवांप्रमाणे ते एकत्र आले, एकत्रित शिकार करू लागले आणि अस्थिर पर्यावरणात सर्वजण टिकून राहतील अशा तऱ्हेने त्यांच्या वर्तनात बदल झाले. शरीररचनेनुसार आधुनिक मानवाचा सांगाडा आदिमानवाच्या सांगाड्यापेक्षा हलका आहे, मेंदू मोठा असून त्याचे आकारमान जगातील वेगवेगळ्या मानवांमध्ये तसेच स्त्री व पुरुषांमध्ये भिन्न आहे. मात्र मेंदूचे सरासरी आकारमान सु. १,३०० घ.सेंमी. आहे. एवढा मोठा मेंदूचा समावेश होण्यासाठी मानवाच्या करोटीत बदल होऊन ती पातळ आणि कपाळ पसरट झाले आहे. तसेच जबडा लहान झाला असून दात लहान झाले आहेत.

अंगठा व चार बोटे जुळवून वस्तू पकडता येण्याच्या हाताच्या संरचनेमुळे उपकरणे हाताळणारा मानव अशी व्याख्या आधुनिक मानवाची केली गेली. गेल्या दोन लाख वर्षांत मानवाच्या उत्क्रांतीमध्ये अश्मयुगीन हत्यारे, धातूंचा वापर, चाकांचा व अग्नीचा वापर, उपकरणे व यंत्रे वापरून शेती करणे, पर्यावरणात निवाऱ्यासाठी बदल करणे, सामाजिक जाणीव इ. बाबींमुळे मानव इतर प्राण्यांच्या तुलनेत वरचढ आहे.

होमो सेपिएन्ससंबंधी अजूनही काही पुढील प्रश्न अनुत्तरीत आहेत. जसे, वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार आपला थेट पूर्वज हो. हायडेल्बर्गेन्सिस होता की आणखी कोण होता, आपल्या जातींमध्ये आणि होमो निअँडरथलेन्सिस यांच्यात आंतरजनन झाले होते का, उत्क्रांतीच्या दृष्टीने आपल्या जातीचे भविष्य काय आहे इत्यादी प्रश्न अनुत्तरीत असून भविष्यात त्यांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे.

This Post Has One Comment

  1. अतुल गजानन महल्ले

    खूपच सुंदर मांडणी …..

प्रतिक्रिया व्यक्त करा