नीलगाय गोकुलातील प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव बॅसिलॅफस ट्रेगोकॅमेलस आहे. प्रौढ नराचा रंग निळसर राखाडी (निळसर करडा) असल्यामुळे त्याला ‘नीलगाय’ नाव पडले आहे. त्याच्या नावात जरी ‘गाय’ असले, तरी हा प्राणी आशियातील सर्वांत मोठ्या आकारमानाचे हरिण आहे. त्याचे मूळ वसतिस्थान भारत व पाकिस्तान आहे. भारतात हिमालयाचा पायथा ते मैदानी प्रदेशापासून दक्षिणेस कर्नाटकापर्यंत तसेच पश्चिमेस गीर अभयारण्य व राजस्थानला लागून असलेल्या भारत-पाक सीमा प्रदेशापासून पूर्वेकडे आसाम व पश्चिम बंगालपर्यंत हा प्राणी आढळतो. भारतात सु. १ लाख नीलगायी असल्याचा अंदाज आहे.

नीलगायीची शरीररचना जवळपास घोड्यासारखी असते. लांब मान, मानेवरील आखूड व ताठ आयाळ, लांबट व निमुळते मस्तक, फुगीर छाती, लांब आणि मजबूत पाय व शेपटीकडे निमुळता होत जाणारा शरीराचा आकार ही त्याच्या शरीररचनेची वैशिष्ट्ये आहेत. शेपूट मात्र गायीसारखे असून टोकाला काळ्या केसांचा झुपका असतो. नर व मादी दोघांच्याही शरीरावर सारख्याच प्रकारच्या खुणा आढळतात. उदा., प्रत्येक गालावर दोन पांढरे ठिपके असतात आणि ओठ, हनुवटी, गळा, कानांची आतील बाजू व शेपटीची आतील बाजू पांढरी असते. घोट्यावर काळ्या पांढऱ्या रंगाची वलये असतात. तसेच नर-मादीच्या गळ्यावर केसांचा झुपका असतो. वजन १२०–१४० किग्रॅ. असते. खांद्याजवळ उंची १.२–१.५ मी. आणि डोक्यासह लांबी १.८–२ मी. असते. शेपूट ४०–४५ सेंमी. लांब असते. फक्त नरांना शिंगे असतात. नराची शिंगे सु. २५ सेंमी. लांब असतात. मादीचा रंग पिंगट असून ती नरापेक्षा आकारमानाने लहान असते.
नीलगायींचे वास्तव्य सहसा विरळ झाडे असणाऱ्या टेकड्या, सपाट अथवा उताराचे गवताळ प्रदेश तसेच लहान झुडपे असलेल्या मैदानात असते. ते दाट वने टाळतात. गवत आणि वनस्पतींची पाने, फुले, फळे, बिया, फांद्यांचे शेंडे इत्यादींवर नीलगायी उपजीविका करतात. चारा कमी पडल्यास ते पिकांची प्रचंड नासाडी करतात. ते दिवसा सक्रिय असतात व कडक उन्हात देखील फारच थोडा वेळ सावलीत विश्रांती घेतात. उन्हाळ्यात नियमित पाणी पिणारे हे प्राणी थंडीच्या दिवसात २–३ दिवस पाण्याशिवाय राहू शकतात. त्यांचे वास्तव्य मात्र पाणवठ्याजवळच असते. नीलगायींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपली विष्ठा टाकण्यासाठी एका ठराविक जागीच येतात.
नीलगायी कळपाने राहतात. एका कळपात साधारणपणे १०–२० प्राणी असतात. विणीचा हंगाम सोडल्यास नर व मादी वेगवेगळे कळप करून राहतात. लहान वासरे मादयांच्या कळपात असतात. वाघ व सिंह हे नीलगायीचे मुख्य भक्षक आहेत. नीलगायींची दृष्टी व घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात. वेळ पडल्यास घोड्यापेक्षा जास्त वेगाने ते पळू शकतात.
सप्टेंबर ते नोव्हेंबर हा नीलगायींचा प्रजननकाळ असून गर्भावधी सु. २४५ दिवसांचा असतो. त्याच्या वासराचे जन्माच्या वेळचे वजन १३–१६ किग्रॅ. असते व सु. ६०% जुळी वासरे जन्माला येतात. नीलगायीचे आयुष्य २०–३० वर्षे असते. नीलगायींची सहसा शिकार केली जात नाही. नीलगायीची प्रजाती विलुप्ततेबाबत ‘कमी धोका’ असलेल्या प्रवर्गात मोडते.