नीळ (इंडिगोफेरा टिंक्टोरिया): फुले व पानांसह‍ित वनस्पती

नीळ हा रंग ज्या झुडपापासून काढतात ती वनस्पतीही नीळ याच नावाने ओळखली जाते. नीळ वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव इंडिगोफेरा टिंक्टोरिया आहे. ती मूळची आशियातील आहे, परंतु आफ्रिकेत आणि मध्य अमेरिकेतही आढळते. इंडिगोफेरा या प्रजातीत सु. ७०० वनस्पतींचा समावेश होत असून भारतात सु. ५४ जाती आढळून येतात. गेली अनेक शतके ही वनस्पती तिच्यापासून मिळविल्या जाणाऱ्या निळ्या रंगासाठी लागवडीखाली आहे.

नीळ (इंडिगोफेरा टिंक्टोरिया): फुले

निळीचे झुडूप १–२ मी. उंच वाढते. ते वर्षायू तसेच बहुवर्षायू असते. पाने संयुक्त, पिच्छाकृती व एकाआड एक असून पर्णिका ७–११ असतात. पर्णिका आयताकार, समोरासमोर, पातळ असतात. त्या वाळविल्यावर काळसर होतात. फुलोरा अनेक गुलाबी फुलांचा असतो. फुलांची रचना पतंगाकृती असते. निदलपुंज लहान, हिरवे व पाच संयुक्त दलांचे असते. दलपुंजात पाच पाकळ्या असून एक मोठी, बाजूच्या दोन लहान व पंखाप्रमाणे आणि आतील दोन एका बाजूने जुळलेल्या असतात. शेंगा २–३ सेंमी. लांब, बारीक व किंचित वाकड्या असून त्यात ८–१२ बिया असतात. मुळावर नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या गाठी असल्यामुळे जमिनीचा कस वाढण्यासाठी निळीची मुद्दाम लागवड करतात.

निळीच्या पानापासून नीळ मिळवितात. पाने पाण्यात भिजवून ठेवतात. त्यामुळे त्यातील इंडिकान नावाच्या ग्लायकोसाइडाचे किण्वण होऊन निळ्या रंगाचे इंडिगोटिन अवक्षेपाच्या रूपात तळाशी बसते. हे इंडिगोटिन सोडियम हायड्रॉक्साइडमध्ये (अल्कली) मिसळतात. ते मिश्रण सुकवितात आणि त्याची भुकटी तयार करतात. जेव्हा सुती कपड्याला रंग द्यावयाचा असतो तेव्हा ती भुकटी पाण्यात मिसळून त्याचे द्रावण तयार करतात. अशा द्रावणात कापड भिजवून त्याचा हवेशी संपर्क आणल्यास कपड्याला निळा रंग येतो.

तेराव्या शतकानंतर नीळ रंगाचा वापर यूरोपमध्ये वाढला होता. भारताकडे येण्याचा जलमार्ग माहीत झाल्यानंतर भारतातून मोठ्या प्रमाणावर नीळ निर्यात होऊ लागली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत ही निर्यात होत होती. मात्र, १८८३ सालानंतर रासायनिक प्रक्रियेने अनेक रंग तयार करण्यात येऊ लागल्यापासून नीळ वनस्पतीची लागवड, रंगाचे उत्पादन व निर्यात याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. विकसनशील देशांमध्ये भारत हा एकटाच नैसर्गिक व कृत्रिम नीळ रंग बनविणारा देश आहे. जीन्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाटलोणीचे कापड (ब्ल्यू डेनिम) रंगविण्यात नीळ मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यामुळे निळीच्या निर्यातीला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे.