पडवळ ही वनस्पती कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ट्रायकोसँथस अँग्विना आहे. ही वर्षायू वेल भारतात सर्वत्र तिच्या फळांसाठी लागवडीखाली आहे. कलिंगड, काकडी या वनस्पतीही कुकर्बिटेसी कुलातील आहेत.
पडवळाची वेल आधाराने वर चढते किंवा आधारासाठी मांडवावर चढविली जाते. खोड लांब असून त्यावर खाचा असतात. खोडाच्या टोकाला २–३ प्रताने असतात. पाने साधी, खंडित व पातळ असतात. फुले पांढरी, एकलिंगी असून नर-फुले गुच्छाने येतात तर मादी-फुले एकेकटी येतात. परागण कीटकांद्वारे होते. फळे १–१.५ मी. लांब सु. ७ सेंमी. व्यासाची व दोन्ही टोकांना निमुळती असतात. कोवळेपणी ती हिरवी असून त्यावर पांढरे पट्टे असतात आणि पिकल्यावर फिकट केशरी होतात. फळे सापासारखी दिसतात म्हणून त्यांना इंग्रजीत स्नेक गोर्ड हे नाव पडले आहे. फळात चिकट, गुळगुळीत श्लेष्मासारखा मगज असतो. मगजात अनेक लहान व मऊ बिया असतात. बी शीतल (थंडावा देणारे) असून फळात कृमिनाशक, रेचक व वांतिकारक हे गुण असतात.
हिरवी पाने व कोवळ्या फांद्या पालेभाजीसाठी वापरतात. फळांची भाजी करतात. इन्शुलिनावर अवलंबून नसणाऱ्या (टाइप-२) मधुमेही रुग्णांकरिता रक्तातील साखर कमी करण्यासाठी फळे उपयुक्त असतात.