पपनस (सिट्रस मॅक्झिमा): फळांसहित वनस्पती

पपनस ही लिंबाच्या प्रजातीतील एक वनस्पती आहे. रूटेसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सिट्रस मॅक्झिमा आहे. पपनसाचे फळ आकाराने नासपतीसारखे असून सिट्रस प्रजातीत सर्वांत मोठे आहे. ही वनस्पती मूळची मलेशिया आणि पॉलिनीशिया येथील आहे. चीन, जपान, भारत, मलेशिया, फिजी आणि थायलंड या देशांत तिची लागवड फळांसाठी करतात. भारतात पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू इत्यादी राज्यांत पपनसाची लागवड होते.

पपनसाचे फळ

पपनसाचे झाड ५–१५ मी. उंच असते. त्याच्या शाखा अनियमित असून उपशाखांवर अनेक काटे असतात. पाने गडद हिरवी, फांद्यांसमोर देठाची, मोठी व एकाआड एक असतात. पाने दिसायला साधी असली तरी ती संयुक्त असून अंडाकृती असतात. ती ५–१२ सेंमी. लांब, २–१२ सेंमी. रुंद आणि वरून चमकदार व खालून लवदार असतात. फुले सुंगधी, एकेकटी किंवा गुच्छात व पानांच्या कक्षेत येतात. फळे झाडांच्या फांद्यांवर एकेकटी लागलेली असतात. ती गोल आणि  १०–३० सेंमी. व्यासाची असून त्यांचे वजन १–२ किग्रॅ. भरते. फळांची साल जाड असते. फळात पांढरा किंवा पिवळट पांढरा, गुलाबी किंवा लाल रंगाचा घट्ट मगज असतो. फळात संत्र्याप्रमाणे ११–१८ फोडी असतात. फोडीत रस भरपूर असतो. रसाची चव गोड व किंचित कडवट असते. मगजात बिया मोठ्या असून कमी संख्येने असतात. त्या बाहेरून पिवळसर पांढऱ्या असून आत पांढऱ्या असतात. काही जातींच्या फळांमध्ये बिया भरपूर असतात. फळे सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यांत येतात.

भारतात पपनसाचा मगज साखर घालून खातात. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि जीवनसत्त्व भरपूर असते. तो पौष्टिक तसाच ज्वरनाशी आहे. त्यापासून मुरंबे, मार्मालेड असे पदार्थ बनवितात. फुलांपासून अत्तर तयार करतात. लाकूड थोडेसे कठीण असते. त्यापासून अवजारांच्या मुठी तयार करतात. महाराष्ट्रातील पपनस पातळ सालींसाठी प्रसिद्ध आहेत.