त्वचेचा एक संसर्गजन्य रोग. या रोगामुळे त्वचेला खाज सुटते. संधिपाद (आर्थ्रोपोडा) संघाच्या अष्टपाद वर्गातील सूक्ष्म परजीवी किडीमुळे हा रोग होतो. या प्राण्याचे शास्त्रीय नाव सारकॉप्टिस स्केबिआय होमोनिस आहे. नुसत्या डोळ्यांनी हा प्राणी सहज दिसत नाही. याचा आकार पिशवीसारखा आहे. संधिपाद संघातील इतर प्राण्यांप्रमाणे त्याच्या शरीराचे भाग आणि खंड दिसत नाहीत. शरीर फिकट रंगाचे असून त्यावर आडव्या लंबगोलाकार पट्ट्या असतात. मुखांगे नखरिका आणि स्पर्शपाद स्वरूपात असतात. त्यांचा उपयोग त्वचा पोखरण्यासाठी होतो. पायांच्या चार जोड्या असतात. नराच्या पायाच्या तिसर्‍या जोडीवर आणि मादीच्या तिसर्‍या व चौथ्या जोडीच्या टोकाला लांब शुक असतात. सर्व शरीरावर काटे असतात. मादी ०.३-०.५ मिमी. लांब असून तिच्या अर्ध्या आकाराचा नर असतो. इटालियन वैज्ञानिक डायसिंटो सिस्टोनी यांनी अठराव्या शतकात हा परजीवी शोधून काढला. खरुज हा रोग सु. २५०० वर्षांपासून ज्ञात आहे. रोमन काळातील वैद्यक ऑलस कॉर्नीलिअस सेल्सस यांनी स्केबिज हे नाव या रोगाला दिले आणि त्याची लक्षणे प्रथम सांगितली, असे मानले जाते.
त्वचेवर मादी व नर यांचे मिलन झाल्यानंतर मादी त्वचेत घुसते आणि त्वचा पोखरत आत जाते. नर त्वचेवरच मरून जातो. मादी एका वेळेस सु. ३० अंडी घालते. अंड्यांतून ३-१० दिवसांत डिंभक बाहेर पडतात. ते कात टाकतात आणि त्यांचे रूपांतर अर्भकात होते. अर्भकाचे नंतर प्रौढ परजीवीत रूपांतर होते. हे जीवनचक्र ३-४ आठवड्यांचे असते. हे परजीवी त्वचा पोखरत आत जात असताना त्वचेला खाज सुटते आणि खरजेची लागण होते. प्रथम खाज हाताच्या बोटांत अथवा कुल्ल्यांवर किंवा बाह्यजननेंद्रियावर उठते. नंतर खाज सर्व शरीरभर होते. शरीरावर टाचणीच्या डोक्याएवढ्या आकाराच्या पिवळसर पुटकुळ्या येतात. खाजविल्यामुळे त्वचेवर जखमा होतात. नंतर त्यावर खपल्या धरल्या जातात. परजीवींची विष्ठा आणि अंडी त्वचेत असताना अधिहृषता (अ‍ॅलर्जी) होते. त्वचा खाजविल्यानंतर इतर जीवाणू त्वचेत शिरतात. त्यामुळेही त्वचेवर फोड येतात. खाजविल्यामुळे हे परजीवी नखात जातात आणि शरीरावर पसरतात. खरूज झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास इतरांनाही त्याची लागण होते. लैंगिक संबंधानेसुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. सारखे खाजविल्यामुळे असह्य वेदना होतात. मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवतो. मादीने पोखरलेल्या मार्गिकेच्या टोकाला ती आढळते. तसेच त्वचेवर मार्गिकाही स्पष्ट दिसते. त्यावरून खरजेचे निदान करता येते.
खरूज संसर्गजन्य असल्यामुळे त्याबाबत योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. वैयक्तिक स्वच्छता पाळावी. मॅलॅथिऑन व परमेथ्रिन ही औषधी द्रव्ये त्वचेवर लावल्यास रोग बरा होतो. याचा उपयोग न झाल्यास लिंडेन मलम वापरतात. काही वेळा तोंडावाटे आयव्हरमोक्टिन देतात. कडू लिंबाचे तेलही परिणामकारक आहे. रुग्णाचे कपडे, पांघरुणे इ. गरम पाण्यात धुवावीत अथवा कडक उन्हात वाळवावीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा