आ. १. अंकीय व्होल्टमीटर

अंकीय व्होल्टमीटर हे एक विद्युत दाब मोजण्याचे महत्त्वाचे वीज मापक आहे . या उपकरणाचा शोध अँड्रयू के यांनी १९५४ मध्ये लावला. हे उपकरण एक अष्टपैलू व तंतोतंत मोजणी करणारे उपकरण आहे. हे उपकरण अज्ञात विद्युत दाब मोजून तो अंकांमध्ये दर्शकपटावर (display) दाखविते. या उपकरणाचा उपयोग करून आपण ए.सी.व डी.सी. असे दोन्ही विद्युत दाब मोजू शकतो.

अंकीय व्होल्टमीटरचे मापन हे अंकांमध्ये असल्यामुळे निरीक्षणातील त्रुटी आपोआप कमी होऊन मापनाची गती वाढते. या उपकरणाचा आकार लहान असून किंमत थोडी जास्त आहे.

 

 

आ. २. अंकीय व्होल्टमीटर ठोकळाकृती : (१) आदान तुलनक (input comparator), (२) तार्किक नियंत्रण (Logic control), (३) दुय्यम तुलनक (second comparator), (४) द्वार (gate), (५) स्थानिक दोलनदर्शक (local oscillator), (६) गणक (counter), (७) अंकीय बहिर्वाचन (digital readout).

कार्यपध्दती : अंकीय व्होल्टमीटरची कार्यपध्दती आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे असते. यामध्ये तरल विद्युत दाबाची (ramp voltage) सतत अज्ञात विद्युत दाबाशी (unknown voltage) तुलना होत असते. जेव्हा तरल विद्युत दाब व अज्ञात विद्युत दाब समान होतात, तेव्हा आदान तुलनकाचे (input comparator) प्रदान (output) जास्त असते व द्वार (gate) उघडले जातात. त्यामुळे घड्याळी आंदोलकाद्वारे (clock oscillator) तयार होणारे स्पंद (pulses) गणकाद्वारे (counter) मोजले जातात. तरल विद्युत दाब कमी किंवा शून्य होताच दोन्ही आदान समान झाल्यामुळे दुय्यम तुलनक (second comparator) त्याची अवस्था बदलते. सदरच्या अवस्थेमध्ये द्वार बंद होतात व त्याचवेळी गणकाद्वारे स्पंद मोजण्याची क्रियाही थांबते. जरी घड्याळी आंदोलकाद्वारे स्पंद तयार होत असले तरी ते गणकापर्यंत पोहोचत नाहीत. द्वार उघडे असेपर्यंत गणकाने मोजलेल्या स्पंदांची संख्या दर्शकपटाद्वारे दाखविली जाते. ही संख्या म्हणजेच अज्ञात विद्युत दाबाची किंमत असते.

प्रकार :

१. तरल अंकीय व्होल्टमीटर (ramp digital voltmeter)

२. समाकलित अंकीय व्होल्टमीटर (integrated digital voltmeter)

३. अनुक्रमी अंकीय व्होल्टमीटर (successive digital voltmeter)

४. संतत अंकीय व्होल्टमीटर (continuous digital voltmeter)

 सामान्य वर्णन:

१. आदान परिमाण (input measurement) : ±१.०००००० ते ±१०००.००० व्होल्ट (स्वयंचलित श्रेणी निवड आणि अतिभार संकेतांसोबत )

२.परिपूर्ण अचूकता (absolute accuracy) : ±०.००५%

३.स्थिरता (stability) : लघुसंज्ञा (short term) : ०.००२% (२४ तासांसाठी )

दीर्घ संज्ञा : ०.००८% (६ महिन्यांसाठी)

४. बिंदुघनता (resolution) :१µV व (१ व्होल्ट आदान श्रेणीसाठी )

६. आदान रोधक (input resistance) : R = 10 MΩ ; C = 10 pF

७. प्रदान संदेश (output signal) : संगणक, मुद्रक किंवा रेकॉर्डरसाठी सुसंगत.

 

 संदर्भ :

  • Sawhney, A. K. Electrical Measurements.

समीक्षक – योगेश मांडके