कोलेस्टेरॉल हा प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळणारा एक रासायनिक घटक आहे. तो पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात, मात्र वनस्पतींत अभावानेच आढळतो. जैविक दृष्ट्या महत्त्वाच्या मेदी अल्कोहॉलांच्या (स्टेरॉल) गटातील हा पदार्थ असून याचे वर्गीकरण सामान्यपणे स्टेरॉइड गटात करतात. या गटात मोडणार्‍या सर्व संयुगांप्रमाणे कोलेस्टेरॉल रेणूतही कार्बनची तीन षट्कोनी वलये आणि एक पंचकोनी वलय असते. रासायनिक सूत्र C27H45OH.

उच्च प्राण्यांच्या पेशींमध्ये पेशीद्रव्य पटलाचा संरचनात्मक घटक म्हणून कोलेस्टेरॉल आढळते. कोलेस्टेरॉल आणि लिपीड यांच्यातील गुणोत्तरामुळे पटलाची स्थिरता, पारता आणि प्रथिनांची चलता यांवर परिणाम होतो. चेतापेशींच्या पटलातील हे गुणोत्तर उच्च असते. त्यामुळे त्यांची स्थिरता अधिक आणि पारता कमी असते. पेशीद्रव्यातील अंगकांच्या पटलातील हे गुणोत्तर कमी असते. त्यामुळे त्यांची पारता आणि तरलता अधिक असते. त्यामुळे पेशीमधील विविध पदार्थांचे संश्र्ले , त्यांची विल्हेवाट आणि एटीपी (अ‍ॅडिनोसीन ट्रायफॉस्फेट) निर्मिती अशी अंगकाद्वारे होणारी कार्ये सहज घडून येतात. कोलेस्टेरॉल हे अधिवृक्क, वृषण आणि अंडाशयात साठविले जाते. त्याचे लैंगिक संप्रेरकात रूपांतर होते. यकृतात तयार होणारी पित्ताम्लेही कोलेस्टेरॉलपासून बनवितात.

रक्तात कोलेस्टेरॉल दोन कारणांमुळे आलेले असते : (१) आपल्या आहारातून शरीरात येते आणि (२) इतर पदार्थांपासून आपल्या शरीरात यकृताद्वारे ते तयार होते. सामान्यपणे, दोन्ही स्रोतांपासून मिळणार्‍या  एकूण कोलेस्टेरॉलचे प्रमाण स्थिर असते. आहारातील प्रमाणानुसार यकृतात कोलेस्टेरॉलची निर्मिती कमी-अधिक होते.

शरीरातील कोलेस्टेरॉल निर्मितीची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. या निर्मितिघटकांमध्ये जनुके  व्यायाम, भावनिक ताण तसेच आहारातील तंतुमय पदार्थांचे स्वरूप आणि प्रमाण इत्यादींचा समावेश होतो. यकृतात कोलेस्टेरॉलची निर्मिती संपृक्त मेदी पदार्थांपासून होते. कोलेस्टेरॉल पाण्यात विरघळत नाही, तर ते मेदांत विरघळते. स्वाभाविकच ते शरीरात साठत जाते.

आपल्या शरीरात रक्तातून पेशींपर्यंत कोलेस्टेरॉल वाहून नेण्यासाठी त्याचे मेद-प्रथिन (लायपोप्रोटीन) यामध्ये रूपांतर होते. प्रथिने, कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड (प्राणिजन्य मेदाचा आणि वनस्पतिजन्य तेलाचा एक महत्त्वाचा घटक; ही मेदाम्लांची ग्लिसराइडे असतात) यांच्या वेगवेगळ्या प्रमाणांनुसार वेगवेगळी मेद प्रथिने बनतात. त्यांच्या घनतेनुसार पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते. : (१) कमी घनतेची मेद-प्रथिने (लो डेन्सिटी लायपोप्रोटीन; एलडीएल), (२) उच्च घनतेची मेद-प्रथिने (हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन; एचडीएल), (३) अतिकमी घनतेची मेद-प्रथिने (व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन; व्हीएलडीएल). कोलेस्टेरॉलचा प्रभाव ते ज्या मेद-प्रथिनामध्ये समाविष्ट आहे, त्याच्या घनतेवर अवलंबून असतो. एचडीएलमध्ये ५०% प्रथिने, १७% ट्रायग्लिसराइडे व १३% कोलेस्टेरॉल असते. एचडीएल हे धमन्यांच्या (रोहिण्यांच्या) भित्तिकेवर जमा झालेले कोलेस्टेरॉल यकृतात वाहून नेते व तेथे त्याची विल्हेवाट लागते. यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होत असल्यामुळे याला ‘चांगले कोलेस्टेरॉल’ म्हणतात. याउलट एलडीएल आणि व्हीएलडीएल यांमुळे धमन्यांत कोलेस्टेरॉल साठत जाते. आतील बाजूस कोलेस्टेरॉल जमा झाल्याने धमन्या अरुंद होतात. कधीकधी या थराचा तुकडा रक्तवाहिनीत गुठळीसारखा अडकतो. मेंदूच्या रक्तवाहिनीत असे झाल्यास पक्षाघात होतो, तर हृदयाच्या रक्तवाहिनीत असे झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. म्हणून याला ‘वाईट कोलेस्टेरॉल’ म्हणतात.

हृदरोहिणी विकारासाठी संपूर्ण कोलेस्टेरॉल हा दर्शक मानला जातो. रक्तातील मेदाचा आलेख (लिपीड प्रोफाईल) पुढीलप्रमाणे असतो. संपूर्ण कोलेस्टेरॉल २०० मिग्रॅ./डेसीलि. पेक्षा कमी एलडीएल १३० मिग्रॅ./डेसीलि. पेक्षा कमी आणि एचडीएल ४० मिग्रॅ./डेसीलि. पेक्षा जास्त. संपूर्ण कोलेस्टेरॉल २०० मिग्रॅ. पेक्षा जास्त असल्यास पुढील दर ५० मिग्रॅ.ला हृदयविकाराच्या झटक्याच्या संभाव्यतेचे प्रमाण दुप्पट होते. संपूर्ण कोलेस्टेरॉल/एचडीएल हे प्रमाण ४ पेक्षा जास्त असू नये, असे मानतात. ट्रायग्लिसराइड १० ते १९० मिग्रॅ./डेसीलि. या दरम्यान असावीत.

स्टेरॉलसमृद्ध अन्नघटकांचा आहारात समावेश टाळून  कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित करता येते. अंड्याच्या पिवळ्या बलकात सर्वाधिक कोलेस्टेरॉल असते, तर त्यातील पांढरा बलक, मलई काढलेले दूध इत्यादींमध्ये त्याचे प्रमाण कमी असते. कोलेस्टेरॉल फक्त प्राण्यांच्याच पेशींमध्ये आढळत असल्याने सर्व फळे, फळभाज्या आणि वनस्पतिजन्य तेले कोलेस्टेरॉलमुक्त असतात.

मांसजन्य पदार्थांच्या अतिरिक्त सेवनातून शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. प्राण्यांच्या मेदापासून दोन धोके संभवतात. हे पदार्थ यकृताद्वारे कोलेस्टेरॉलच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात, तसेच या पदार्थांमध्ये मुळातच कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असते.

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीचे आवश्यक उपाय व्यायाम, आहार व औषधे या क्रमाने आहेत. रोज ४० मिनिटे चालावे; आहारात मेदी पदार्थ व संपृक्त मेद, तसेच कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ कमी करात, फळांच्या रसाऐवजी शक्यतो फळे खावीत, असा वैद्यकीय सल्ला दिला जातो. तरीही कोलेस्टेरॉल कमी झाले नाही तर औषधे घ्यावी लागतात.