कोल्हा

कोल्हा हा स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील कॅनिडी कुलामधील प्राणी आहे. कुत्रे, लांडगे, खोकड इ. प्राणी याच कुलात येतात. कोल्ह्याच्या सर्वसामान्यपणे आढळणार्‍या जातीचे शास्त्रीय नाव कॅनिस ऑरियस आहे. पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत आढळणार्‍याकॅनिस मेझोमेलिस या जातीच्या कोल्ह्याची पाठ काळी असते आणि त्यावरील फर मूल्यवान समजली जाते. कोल्ह्याची कॅनिस अडस्टस ही जात आफ्रिकेत आढळते. यांच्या अंगाच्या दोन्ही बाजूंना पट्टे असतात. कोल्हे आशिया व आफ्रिका खंडांत तसेच यूरोपात आढळतात. भारतात कोल्हे हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र आढळतात.

भारतीय कोल्ह्याची उंची ३८-४३ सेंमी. असते. डोक्यासकट शरीराची लांबी ६०-७५ सेंमी. असून शेपूट २०-२७ सेंमी. लांब असते. त्याचे वजन ८-१५ किग्रॅ. असते. मादीच्या तुलनेत नराचे वजन जास्त असते. कोल्ह्याचा रंग भुरकट तपकिरी काळसर असतो. रंग भोवतालच्या पर्यावरणानुसार बदलतो. खांदे व कान यांच्याजवळील आणि पायांचा रंग काळा, पांढरा व पुसट पिवळसर यांचे मिश्रण असलेला असतो. हिमालयातील कोल्ह्याचा रंग जास्त पिवळसर परंतु कानांवर व पायांवर पिवळा रंग जास्त गडद आणि काळपट असतो. त्यांचे लांब पाय आणि तोंडात वळलेले सुळे छोटे सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी यांच्या शिकारीसाठी अनुकुलित झालेले आहेत. पायांतील जुळलेली हाडे आणि मोठी पावले यांच्या साहाय्याने ते बराच काळ १६ किमी. प्रतितास इतका वेग राखू शकतात.

कोल्ह्याला कोणतेही हवामान (दमट वने, मोकळी मैदाने, वाळवंट) मानवते. १,२०० ते २,१०० मी. उंचीवरील गिरिस्थानांच्या आजूबाजूला कोल्हे आढळतात, तर हिमालयात ३,६०० मी. उंचीवरदेखील ते सापडतात. मुख्यत: शहर व खेडेगावाच्या आसपास राहणे त्याला पसंत पडते. शेतजमिनीत बिळे करून किंवा दाट गवतात आणि पडक्या जागी घर करून ते राहतात. कोल्हे हे नर-मादीच्या जोडीने राहतात आणि त्यांच्या जोडीचा वावरण्याचा प्रदेश निश्चित ठरलेला असतो. त्यांचा वावर जेवढ्या भागात असतो त्याची सीमा ठरविण्यासाठी ते हद्दीवर मल-मूत्राचा वापर करतात. सहसा ते आपल्या हद्दीत  दुसर्‍या जोडीला येऊ देत नाहीत.

कोल्हा निशाचर असून भक्ष्य मिळविण्यासाठी रात्री बाहेर पडतो. शेळ्यामेंढ्यांची करडे वगैरे लहान सस्तन प्राण्यांवर तो हल्ला करतो. कोंबड्यांना यांच्यापासून फार मोठा धोका असतो. तो मेलेली जनावरेदेखील खातो. वाघ व सिंह यांच्या शिकारीतले उरलेले मांस हा खातो. सिंहाला आपल्या भक्ष्याजवळ तरस व गिधाडे आलेली खपत नाहीत पण कोल्हा आलेला चालतो. जनावरांची मढी खाताना कोल्हे छोट्या गटात जरी एकत्र येत असले तरी शिकार मात्र ते जोडीने करतात.

ढगाळ थंड हवा असली तर कोल्हा दिवसादेखील बाहेर पडतो. ऊष्मा फार असल्यास पाणी पिण्यास तो दुपारी बाहेर पडतो. कोल्हे एक एकटे किंवा एके ठिकाणी दोन-तीन असतात. संध्याकाळी किंवा पहाटे बरेच कोल्हे एकदम ओरडतात. त्यांच्या ओरडण्याला कोल्हेकुई म्हणतात. कोल्ह्याच्या शेपटीखालच्या गंधग्रंथीतून वाहणार्‍या स्रावामुळे त्याच्या अंगाला उग्र दर्प येतो. उसाच्या पिकाचे कोल्ह्यामुळे बरेच नुकसान होते.

कोल्ह्याच्या मादीला फेब्रुवारी ते मार्च-एप्रिलमध्ये चार पिले होतात. पिले बाळगली तर ती चांगली माणसाळतात.