(हॉर्न्स). निरनिराळ्या प्राण्यांच्या डोक्यावरील टोकदार प्रवर्धाला (वाढलेल्या भागाला) शिंग म्हणतात. शिंगावर केराटीन आणि इतर प्रथिनांचे आवरण असून त्याच्या आत हाडांचा गाभा असतो. सस्तन वर्गातील रवंथ करणाऱ्या (रोमंथी) प्राण्यांच्या समखुरी गणातील (आर्टिओडॅक्टिला) बोव्हिडी (गोकुल) आणि अँटिलोकॅप्रिडी या कुलांतील प्राण्यांत शिंगे आढळून येतात. बोव्हिडी कुलात गाय, म्हैस, शेळी, मेंढी इ. प्राणी येतात, तर अँटिलोकॅप्रिडी कुलात अमेरिकेत आढळणारा प्राँगहॉर्न हा प्राणी येतो. सामान्यपणे ज्या प्राण्यांना शिंगे येतात त्यांना शिंगांची एक जोडी असते, परंतु काही वन्य जातींमध्ये आणि मेंढ्यांच्या पाळीव संकरित जातींमध्ये (उदा., हेब्रिडियन, आईसलँडिक, जेकब इ.) शिंगांच्या दोन किंवा अधिक जोड्या असू शकतात. शिंग आकाराने वाकडे किंवा पिळीव असून बहुधा त्यांवर वलये किंवा खाचा असतात. अनेक जातींमध्ये केवळ नराला शिंगे असतात, तर काही जातींमध्ये मात्र नर आणि मादी दोघांनाही शिंगे असतात. शिंगे जन्मापासून आयुष्यभर वाढत राहतात आणि त्यातील शृंगद्रव्याचे आवरण कधीही गळून पडत नाहीत. प्राँगहॉर्न या प्राण्यांत शिंगांवरचे आवरण गळून पडले, तरी आतील हाडांचा गाभा तसाच राहतो.

शिंगे : (१) रेनडियर, (२) ओकापी, (३) हॉर्न्ड स्क्रीमर, (४) जॅक्सन शॅमेलियन.

शिंगांची संरचना : शिंगांचा गाभा हाडाचा असून त्यावर त्वचा असते. त्वचेच्या बाहेरच्या स्तराचे केराटिनीभवन झाल्यामुळे शिंगांना संरक्षण मिळते. शिंगांना शाखा फुटत नाहीत. शिंगांचे बाहेरचे केराटीनमय आवरण सोडले तर आतला भाग जिवंत असतो आणि त्याची वाढ आयुष्यभर होत राहते. बाहेरचा स्तर शिंगाच्या तळापासून उत्पन्न होतो आणि आतल्या गाभ्याचे हाड जसजसे वाढून लांब होते त्यानुसार बाहेरचा स्तर वाढत राहतो. हाडाचा गाभा आणि केराटीनचे आवरण यांमध्ये पोकळी असू शकते.

बोव्हिडी कुलातील हरिण, काळवीट यांसारख्या प्राण्यांची शिंगे लांब, कमीअधिक दंडगोलाकार तसेच भरीव असतात आणि त्यांवर वलये असतात; त्यांच्या माद्यांना शिंगे असतातच असे नाही. बैल, शेळ्या, मेंढ्या यांची शिंगे पोकळ असतात. प्राँगहॉर्न हा एकच समखुरी सस्तन प्राणी उत्तर अमेरिकेत आढळतो. या प्राण्याच्या नर-मादी दोघांनाही शिंगे असून त्यावर फरचे आवरण असते.

मृगशृंगे : सर्व्हिडी कुलातील (सामान्यपणे मृगांचे कूल) प्राण्यांच्या कवटीपासून उत्पन्न झालेल्या उपांगांना ‘मृगशृंगे’ म्हणतात. ती ‘खरी हाडे’ असतात. मृगशृंगे सामान्यपणे नरांमध्ये आढळतात. मात्र रेनडियर या मृगात नर आणि मादी दोघांनाही मृगशृंगे असतात. प्राणिसृष्टीत मृगशृंगे ही नरांच्या लैंगिक लक्षणासंबंधी महत्त्वपूर्ण समजतात आणि मृगांच्या वर्गीकरणात मृगशृंगाच्या संरचनेला महत्त्व असते. काहींमध्ये एकच शृंग असून त्याला शाखा फुटलेल्या असतात, काहींमध्ये शृंगांना जेथे शाखा फुटतात तेथे समान जाडीच्या दोन शाखा फुटलेल्या असतात. मृगशृंगांचा उगम कपाळाच्या हाडात म्हणजे ललाटास्थी भागात होतो. मृगशृंगे भरीव असून ती वेगाने वाढतात; सस्तन प्राण्यांच्या हाडांपेक्षाही त्यांची वाढ वेगाने होते. यात कवटीवर प्रथम हाडाचा एक उंचवटा तयार होतो आणि देठासारखी रचना तयार होऊन त्यावर मृगशृंग आधारले जाते. जेव्हा मृगशृंगाची वाढ होत असते, तेव्हा तो मलमलीसारख्या त्वचेने झाकलेला असतो. या त्वचेद्वारे आतील हाडाला ऑक्सिजन आणि पोषकघटक यांचा पुरवठा होत असतो. मृगशृंग सुरुवातीला कास्थिमय असल्याने मऊ आणि नाजूक असते. रक्तावाटे त्याला कॅल्शियम प्राप्त होते. कालांतराने ते अस्थिमय होते आणि तेथील रक्तपुरवठा हळूहळू कमी होत जाऊन थांबतो. त्यामुळे मृगशृंगावरची त्वचा वाळते आणि गळून पडते. या भागात रक्तपुरवठा होत नसल्याने ते गळून पडताना रक्तस्राव होत नाही, तसेच मृगाला वेदनाही होत नाहीत. याच दरम्यान कवटीवरच्या देठावर पुन्हा नवीन त्वचा येण्यास सुरुवात होते आणि जुने शृंग गळून पडून नवीन शृंग वाढू लागते. मृगाची शिंगे दरवर्षी गळून पडतात. नवीन आलेल्या शृंगाला पूर्वीपेक्षा अधिक शाखा असतात. पूर्ण वाढ झालेल्या मृगाच्या शृंगांचा विकास पूर्णपणे झालेला असतो. मात्र वाढत्या वयानुसार मृगशृंगांचाही ऱ्हास होऊ लागतो. शृंगांच्या मुळाशी असलेल्या अस्थि-ऊती कमी होऊ लागल्या की ते गळण्याची प्रक्रिया सुरू होते. अशा वेळी मृग प्रक्षोभक बनतो आणि झाडाच्या बुंध्यावर किंवा इतर कठीण जागी शृंगे घासू लागतो. त्यामुळे त्यांवरील मखमली त्वचा निघून जाते आणि कालांतराने शृंगे हलू लागून ती गळून पडतात. मृगशृंगांची वाढ त्यांना अन्नातून मिळणारे पोषक घटक (जीवनसत्त्वे, खनिजे) आणि शरीरात तयार होणारी लिंग-संप्रेरके यांवर अवलंबून असते. खच्ची केलेल्या मृगात शृंगांची वाढ नीट होत नाही.

इतर प्राण्यांमधील शिंगे : अन्य प्राण्यांत शिंगे वाढलेली दिसून येतात. त्यांचे स्वरूप वेगवेगळे असते. उदा., जिराफ, ओकापी (वन्य जिराफ) या प्राण्यांच्या डोक्यावर जन्मत:च कास्थींच्या गाठी असून त्यांवर फरयुक्त त्वचेचे आवरण असते. या गाठींची वाढ आयुष्यभर होत राहते. काही काळानंतर त्यांच्या मुळाशी कॅल्शियम जमा होते. अशी शिंगे सुरुवातीला कवटीपासून वेगळी असतात; पुढे ती कवटीचाच भाग बनतात. जिराफाची शिंगे डोळ्यांमागच्या पार्श्विक अस्थीवर असतात, तर ओकापीत ही शिंगे डोळ्यांच्या वरच्या भागात ललाटास्थीवर असतात. जिराफात ललाटास्थीच्या अग्रभागी आणखी एक शिंग असते. विषमखुरी सस्तन प्राण्यांपैकी गेंड्याला शिंगे असतात; त्यांची शिंगे नाकावर असतात. गेंड्यापैकी काहींना एक, तर काहींना दोन शिंगे असतात; दोन शिंगे असली, तर ती एकामागे एक अशी असतात. त्यांचे पूर्ण शिंग केराटीनपासून बनलेले असून त्यात हाडाचा गाभा नसतो. कॅनिडी कुलातील कोल्ह्यासारख्या प्राण्यांमध्ये त्यांच्या कवटीवर शिंगांप्रमाणे वाढ होते. त्याची लांबी १–१.५ सेंमी. असून त्यावर फरचे आवरण असते. दक्षिण अमेरिकेत हॉर्न्ड स्क्रीमर म्हणून ओळखला जाणारा मोरासारखा एक पक्षी असतो. त्याच्या डोक्यावर केराटिनापासून बनलेला काटा असतो. काही सरडगुहिऱ्यांच्या, खासकरून जॅक्सन शॅमेलियनच्या कवटीवर लहानलहान शिंगे असतात आणि त्यांवर केराटीनचे आवरण असते. याशिवाय शिंगधारी सरडे, काही भुंगेरे (ऱ्हिनोसेरॉस बीटल्स) यांच्या डोक्यावर किंवा वक्षावर किंवा दोन्ही भागांवर शिंगांसारखी संरचना असते. ही बाह्यवाढ टोकदार आणि कायटीनयुक्त कठीण पदार्थाची असते.

शिंगांचा उपयोग : प्राण्यांना शिंगे आणि मृगशृंगे यांचा उपयोग भक्षकापासून बचाव करणे, तसेच स्वत:च्या जातीतील इतर सदस्यांबरोबर अधिवास, स्वामित्व आणि समागम यांसाठी प्राधान्य मिळावे म्हणून लढा देणे अशा निरनिराळ्या कारणांसाठी होतो. सामान्यपणे शिंगे नरांत आढळतात. मात्र काही प्राण्यांमध्ये माद्यांनाही शिंगे असतात. एका संशोधनातून असे आढळले आहे की, खुल्या जागेत राहणारे उंच प्राणी लांबून दिसतात. अशा प्राण्यांना त्यांच्या भक्षकापासून संरक्षण मिळण्यासाठी शिंगांचा फायदा होतो. बोव्हिडी कुलातील माद्या त्यांच्या मोठ्या देहामुळे किंवा सॅव्हानासारख्या मोकळ्या अधिवासात लपून राहू शकत नसल्याने त्यांना शिंगे असण्याची शक्यता असते. त्याचबरोबर माती उकरण्यासाठी, झाडांची साल काढण्यासाठी शिंगे वापरली जातात. प्रणयाराधन करण्यासाठीही प्राणी शिंगे वापरतात. काही प्राण्यांना शरीर थंड राहावे म्हणून शिंगांचा उपयोग होतो. अशा प्राण्यांत शिंगातील हाडांच्या गाभ्यातील रक्तवाहिन्या शृंग प्रारीसारखे (रेडिएटर) काम करतात.

पुरातन काळापासून मनुष्याने शिंगांपासून शोभेच्या वस्तू, कंगवे, केसांच्या पिना, पाणी साठविण्याच्या कुप्या, पाणी पिण्यासाठी प्याले, चमचे, गुंड्या इ. वस्तू बनविल्या आहेत. शिंगांपासून फार प्राचीन काळी वाद्ये बनविली जात असत. मुळातले ब्युगूल शिंग हे बैलाच्या शिंगापासून बनविले गेले आहे. शिंगांचा उपयोग चाकू, सुरे, कात्री, इ. कटलरी सामानांच्या मुठी, छत्र्या व काठ्या यांच्या मुठी आणि आकर्षक कलाकुसरयुक्त वस्तू घडविण्यासाठी करतात. भारत, चीन या देशांत मृगशृंगांचा वापर चूर्ण आणि लेप या स्वरूपात चेतासंस्था, श्वसनसंस्था यांच्या विकारांवर करतात.