पर्यावरणीय बदलाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण सागरी प्रवाह. स्पॅनिश भाषेत एल् निनो याचा अर्थ मूल. ख्रिसमसच्या सुमारास दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि एक्वादोर किनार्‍यालगत पॅसिफिक महासागरी उष्ण प्रवाह वाहत असल्याने स्थानिक मत्स्य व्यावसायिकांनी त्यास बाल येशू असे नाव दिले.

सामान्य परिस्थितीत पॅसिफिक महासागराचा पृष्ठभाग उबदार असतो, हवेत आर्द्रता असते आणि पूर्वीय व्यापारी वारे वाहत असतात. ही हवा वातावरणातील वरच्या थरात जाते. पॅसिफिक महासागराच्या पूर्व भागात ही हवा खाली येण्याऐवजी पूर्वेकडे वाहू लागते. हवेच्या या अभिसरणास वॉकर अभिसरण म्हणतात. ही स्थिती दरवर्षी बदलत असते. ह्या स्थितीत दक्षिणी आंदोलन असेही म्हणतात; परंतु एल् निनो प्रसंगी वॉकर अभिसरण कमकुवत होते; कारण मध्य पॅसिफिक महासागरावर निम्न दाब विकसित झाल्याने पूर्वीय व्यापारी वार्‍याऐवजी पश्चिमी वारे वाहू लागतात. उबदार पाणी आणि तेथील आर्द्र हवा दक्षिण अमेरिकेकडे ढकलली जाते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया व आशिया या खंडांकडे वाहणार्‍या हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते. त्याचा परिणाम म्हणून ऑस्ट्रेलिया व आशिया खंडांवर अवर्षणस्थिती निर्माण होते, तर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी प्रदेशात अतिवृष्टी, पूर, वादळे, मृदाधूप, भूमिपात इ. पर्यावरणीय आपत्ती ओढवतात.

एल् निनो हा एक पर्यावरणीय दृक‍्चमत्कार आहे. या घटनेची पुनरावृत्ती होत असते. त्यामुळे प्रभावित प्रदेशातील परिसंस्थांना वारंवार धोका निर्माण होतो. परिसंस्थेतील सजीवांचा समतोल ढासळतो. महासागरी तापमान वाढल्याने मूळ अन्नशृंखलेचे पुनर्वितरण होते. जागतिक हवामान स्थितीतील बदलामुळे  अन्नशृंखलेचे विस्थापन होते. एल् निनो घटनेमुळे पॅसिफिक महासागराच्या किनार्‍यालगतच्या थंड पाण्यातील पौष्टिक पदार्थ जलपृष्ठावर येऊ शकत नाहीत. प्लवकांचे प्रमाण घटते. त्यामुळे असंख्य मासे व सागरी पक्षी मरतात. मात्र एल् निनोचे चक्र पूर्ण झाल्यावर अन्नशृंखला पूर्ववत होते आणि प्राणी जीवन सामान्य स्थितीत येते.

एल् निनो या घटनेचे ‘एल् निनो सदर्न ऑस्किलेशन’ (ENSO) असे उचित नाव आहे. एल् निनो घटना साधारणपणे दर चार ते सात वर्षांनंतर घडते. गेल्या शतकात २३ वर्षे एल् निनो घटनेची होतील. एल् निनोचा परिणाम हिंदी महासागरावरील वायुदाब स्थितीवर होत असल्याने मॉन्सूनचा अंदाज करताना तो घटक विचारात घेतला जातो.

एल् निनो घटनेच्या प्रभावाच्या अगदी उलट हवेची स्थिती निर्माण होते तेव्हा तिला ‘ला निना’ असे म्हणतात. एल् निनो यामुळे निर्माण झालेला वातावरणातील असमतोल नैसर्गिक रीत्या ला निनामुळे संतुलित होतो. डिसेंबर ते मार्च महिन्यांत ला निनाचा प्रभाव अधिक असतो. गेल्या शतकात ला निना घटना १५ वेळा घडली आहे.