पृथ्वीवरील अथवा पृथ्वीच्या कोणत्याही प्रदेशातील मानव तसेच इतर सजीव ज्या परिसरात राहतात, त्या परिसरातील सर्व घटकसमूह मिळून तयार झालेली परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.
पर्यावरणात तापमान, सूर्यप्रकाश, जल, वातावरण इत्यादी अजैविक घटकांबरोबरच वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादी जैविक घटकदेखील असतात. पर्यावरणातील घटक उदा., तापमान, सूर्यप्रकाश यांच्यापासून जैविक या घटकांच्या आंतरक्रियेतून सजीवांचे आणि निर्जीवांचे मिळून पर्यावरण बनते.
अजैविक पर्यावरणात मृदा, जल, वातावरण आणि विकिरण (प्रारण) इत्यादींचा समावेश होतो. हे पर्यावरण अनेक वस्तू आणि बलांपासून बनलेले असते. त्यांचा एकमेकांवर परिणाम होतो आणि या सर्वांच्या परिणामातून सजीवांच्या परिसरातील समुदाय बनतो. उदा., नदीचा प्रवाह, तापमान, आर्द्रता, पाण्यातील रासायनिक संघटन इत्यादींमुळे त्या परिसरात कोणत्या वनस्पती व प्राणी यांचे वास्तव्य असते आणि ते कसे जगतात, हेही समजते.
हवामान हादेखील अजैविक पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. हवामानात समाविष्ट असलेले घटक उदा., पाऊस, वारा, हिम, उष्ण किंवा थंड तापमान, पाण्याचे बाष्पीभवन, आर्द्रता आणि अन्य तत्सम घटकांमुळे सजीव आणि निर्जीवांवर परिणाम होतो. हवामानाच्या प्रतिकूल स्थितीत सजीव मृत्युमुखी पडतात. वातावरणातील प्रतिकूल घटकांपासून संरक्षण व्हावे म्हणून मानव घरे बांधतो, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करतो आणि अशा स्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. तसेच अजैविक घटकांमध्ये सजीवांचे अवकाश आणि त्यांना उपलब्ध होणाऱ्या विशिष्ट पोषकद्रव्यांचा समावेश होतो. सजीवांना राहण्यासाठी जशी जागा लागते तसेच त्यांना विशिष्ट प्रकारचा आहार आणि अन्नघटकांची गरज असते.
जैविक पर्यावरणात अन्न, वनस्पती, प्राणी आणि त्यातील आंतरक्रिया तसेच अजैविक पर्यावरण यांचा समावेश होतो. या पर्यावरणात मानव हा अत्यंत महत्त्वाचा व प्रभावी घटक आहे. मानवाचे जगणे व त्याचे आरोग्य हे त्याच्या अन्नपदार्थांवर अवलंबून असते. सामाजिक व सांस्कृतिक परिसर हा व्यक्तीच्या जैविक पर्यावरणाचे महत्त्वाचे अंग आहे. मानवी जीवन अत्यंत प्रगत होत असून बाह्य अवकाशातील पर्यावरणाचे चिकित्सकपणे अन्वेषण करण्यात येत आहे.
मानवाने आर्थिक, धार्मिक, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांत केलेल्या प्रगतीमुळे मानवकृत प्रत्येक घटक हे एक स्वतंत्र पर्यावरण म्हणून प्रस्थापित होत आहे, हे मानवकृत पर्यावरण आहे. मानवी कृतींच्या उद्दिष्टांनुसार मानवी पर्यावरणाचे सामाजिक पर्यावरण, आर्थिक पर्यावरण, औद्योगिक पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरण असे विविध प्रकार केले जातात.