भासाचे एकांकी नाटक. व्यायोग ह्या रूपकप्रकारात याचा समावेश होतो. महाभारत हा ह्या नाटकाचा उपजीव्य ग्रंथ होय. श्रीकृष्ण दूत म्हणून कौरवांकडे येतो, येथून या नाटकाला सुरुवात होते. उत्तरा आणि अभिमन्यू यांच्या विवाहानंतर पांडवांकडून कौरव आणि पांडव यांच्यात समेट घडवण्याचा प्रयत्न झाला; पण त्याला काही यश आले नाही. तेव्हा दुर्योधनाला समजावण्याची व पांडवांना त्यांच्या हक्काचे राज्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती युधिष्ठिराने श्रीकृष्णाला केली. श्रीकृष्ण ह्या दूतकर्मासाठी हस्तिनापुराला आला. या एकांकिकेचे सर्व कथानक हस्तिनापुरातील दुर्योधनाच्या राजसभेत घडते. दुर्योधन राजसभेत येतो.कंचुकी त्याला पुरुषोत्तम नारायण आला असल्याची बातमी देतो. कृष्णाला पुरुषोत्तम नारायण असे संबोधल्यामुळे दुर्योधन चिडतो व शेवटी कृष्णाला केशव संबोधावे, ह्यावर तो शांत होतो. तसेच केशव सभेत उपस्थित झाल्यावर त्याला आदर देण्यासाठी कोणीही आपल्या आसनावरून उठू नये, अन्यथा त्याला १२ सुवर्णभार दंड केला जाईल, असे सांगतो. कृष्णाला बंदी बनवावे म्हणजे पांडवही ताब्यात येतील, असे तो दरबाऱ्यांना बजावतो. यानंतर तो द्रौपदीवस्त्रहरणाचे चित्र मागवून घेतो व ते बघण्यात तल्लीन होतो.अशाप्रकारे कृष्णाचा अपमान होईल अशासाठी हरप्रकारची तयारी दुर्योधन करतो.
दरबारात प्रवेश करण्यापूर्वी कृष्णाच्या मनात विचार येतात की, दुर्योधन दुराग्रही आहे, अल्पज्ञ आहे, कटुभाषी आहे, गुणद्वेषी आहे, सज्जनांबाबत निर्दयी आहे; तो पांडवांबरोबर संधी करण्यासाठी कधीही तयार होणार नाही.असा विचार करत कृष्ण दरबारात प्रवेश करतो आणि दरबारातील सर्वजण स्वतःच्याही नकळत उठून उभे राहतात. दुर्योधन त्यांना दंडाची आठवण करून देतो. परंतु कृष्णाच्या प्रभावाने तो आपल्या आसनावरून पडतो. कृष्णाच्या आज्ञेने सर्वजण आसनावर बसतात. द्रौपदीवस्त्रहरणाचे चित्र बघत असल्यावरून कृष्ण दुर्योधनाला बोलतो व ते चित्र दूर करण्यास सांगतो.
त्या दोघांच्या संभाषणाला सुरुवात होते ती पांडवांबद्दलच्या कुशल प्रश्नांनी. दुर्योधन प्रत्येकाला त्यांच्या वडिलांच्या नावावरून उल्लेखतो. धर्मपुत्र युधिष्ठिर, वायुपुत्र भीम, इंद्रपुत्र अर्जुन आणि अश्विनीकुमारपुत्र नकुल-सहदेव कुशल आहेत का? ह्या प्रश्नावर कृष्णही त्याला गान्धारीपुत्र म्हणतो. पांडवांना त्यांच्या हक्काचे राज्य देण्याची मागणी करतो. त्यावर “ते मुळात पण्डुपुत्रच नसल्यामुळे त्यांना दायाद्य (राज्य) देण्याचा काही प्रश्नच येत नाही, त्यांना तो अधिकारच नाही”, असे दुर्योधन म्हणतो. त्यावर कृष्ण म्हणतो की, “विचित्रवीर्याचा त्याच्या अतिविषयासक्तीमुळे क्षयाने मृत्यू झाल्यावर व्यासांनी अंबिकेच्या पोटी तुझ्या वडिलांचा म्हणजे धृतराष्ट्राचा जन्म घडवला. त्यामुळे तेही ह्या वंशाचे ठरत नाहीत. त्यांना जसा हा अधिकार मिळाला, त्याच न्यायाने पांडवांनाही तो अधिकार प्राप्त होतो. तुला आपल्या आप्तांबद्दल प्रेम वाटायला हवे”, असे कृष्णाने म्हटल्यावर दुर्योधन त्याला प्रत्युत्तर करतो की, “मग तुला कंसाबद्दल तसे प्रेम का वाटले नाही?” कृष्ण व दुर्योधन यांची ही शाब्दिक चकमक चालू राहते. त्याचे पर्यवसान म्हणून कृष्ण दुर्योधनाला कठोर शब्दांत बोलतो व तेथून निघून जाऊ लागतो.
दुर्योधन कृष्णाला पकडण्याची आज्ञा देतो परंतु; कोणीही पुढे येत नाही. तेव्हा तो स्वतःच त्याला पकडण्यासाठी उठतो. या वेळी कृष्ण दुर्योधनाला आपले विश्वरूपदर्शन घडवतो. तरीही दुर्योधन शांत होत नाही, हे बघितल्यावर कृष्ण दरबारातील इतरांना मोहित करतो व संतापून सुदर्शनचक्राला बोलावतो आणि त्याला दुर्योधनाचा वध करण्यास सांगतो. त्यावर सुदर्शनचक्र त्याला म्हणते की, “प्रभू, तुम्ही ह्या पृथ्वीवरील भार कमी करण्यासाठी आला आहात. आत्ता जर दुर्योधनाला मारले तर इतर कोणीच क्षत्रिय युद्ध करणार नाहीत व तुमचे कार्य सफल होणार नाही”. हे ऐकून कृष्ण शांत होतो. त्याच वेळी गदा, शार्ङ्ग, धनुष्य इत्यादी आयुधे प्रकट होतात. परंतु सुदर्शनचक्र त्यांना परत पाठवते. यानंतर कृष्ण पांडवांच्या शिबिरात जाण्यास निघतो, तेव्हा धृतराष्ट्र त्याची काहीतरी करून समजूत काढतो.
श्रीकृष्णाचे कौरवांकडे दूत म्हणून जाणे आणि तेथे झालेले त्याचे बोलणे हा नाटकाचा मुख्य विषय असल्यामुळे नाटकाचे दूतवाक्य हे नाव सार्थ आहे.आपल्या इतर रूपकांप्रमाणेच भासाने या रूपकातही काही प्रयोग केले आहेत. श्रीकृष्णाच्या आयुधांना मानवी स्वरूपात रंगमंचावर आणून एक अद्भुत वातावरण तयार केले आहे. तर प्रत्यक्षात केवळ एक मध्यवर्ती पात्र आणि इतर दोन-तीन साहाय्यक पात्रे एवढ्या मर्यादित पात्रांतून कौरवसभेचा आभास निर्माण करण्यात नाटककार यशस्वी झाला आहे. तसेच या रूपकात नाटककाराने संवादरचना केवळ संस्कृत भाषेतच केली आहे.
संदर्भ :
- मिश्र, पं. श्रीरामजी, दूतवाक्य, वाराणसी, विद्याभवन संस्कृत ग्रन्थमाला, चौखम्बा विद्याभवन, १९९५.
समीक्षक – शिल्पा सुमंत