पाणकणीस ही टायफेसी कुलातील एकदलिकित वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव टायफा अँग्युस्टिफोलिया आहे. ती टायफा अँग्युस्टॅटा या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. ती उत्तर आशिया, उत्तर आफ्रिका व भारतात दलदलीच्या ठिकाणी आढळते.
पाणकणीस ही गवतासारखी दिसणारी व बहुवर्षायू वनस्पती असून ती १·५–३ मी. उंच वाढते. खोडाप्रमाणेच पाने उभी व ताठ वाढतात. पाने साधी, एकाआड एक, बिनदेठाची, जाड, अरुंद व लांब असून पर्णाधार (पानांचा खालचा भाग) गव्हाच्या पर्णाधाराप्रमाणे खोडाला वेढलेला असतो. मूलस्तंभ म्हणजे जमिनीखाली आडवे वाढणारे खोड जाडजूड असून त्यावर बहुतेक पाने दोन रांगांत असतात. या खोडावर ऑगस्ट महिन्यात लांब, सरळ, दंडगोलाकार व बाजरीच्या कणसासारखा फुलोरा येतो. फुले लहान व एकलिंगी असून ती एकाच उभ्या अक्षावर येतात. या फुलोऱ्यात नर-फुले वर, तर मादी-फुले खाली असतात. कधीकधी नर-फुले तसेच मादी-फुले वेगवेगळ्या झाडांवर येतात. परागकण गळून गेल्यानंतर नर-फुलांच्या जागी काही पुंकेसर आणि लोम मागे राहतात. दाटीदाटीने वाढलेल्या मादी-फुलांपासून कणिश तयार होते. यालाच सामान्यपणे पाणकणीस म्हणतात. फळ शुष्क व लहान असते.
पाणकणसाच्या खोडाचा व पानांचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करतात. त्यांपासून चटया, दोर, टोपल्या, चाळणी आणि छप्पर बनवितात. जमिनीतील खोड, कोवळ्या पानांमधील सुरळी आणि मुळी यांचा वापर खाण्यासाठी करतात. वाळलेली फुले उष्णतारोधक असतात. ती वजनाने हलकी असल्यामुळे त्यांचा वापर गाद्या व उश्या भरण्यासाठी करतात. पिकलेल्या कणसातील मऊ भाग जखमेवर लावल्यास जखम भरून निघण्यास मदत होते. झाडांची मुळे नदीकाठची जमीन एकत्र धरून ठेवतात आणि जमिनीची धूप थांबवितात. खोड स्तंभक व मूत्रल असून कांजण्या व हगवण यांवर उपयुक्त असते.