वायवर्णा (क्रटेव्हा नुर्व्हाला) : (१) वृक्ष, (२) फुले, (३) फळे, (४) लाकूड

(क्रटेव्हा नुर्व्हाला). एक औषधी पानझडी वृक्ष. वायवर्णा हा वृक्ष कॅपॅरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव क्रटेव्हा नुर्व्हाला किंवा क्रटेव्हा रेलिजिओजा आहे. तो भारत, बांगला देश, श्रीलंका, म्यानमार या देशांत वन्य स्थितीत वाढलेला, तसेच बागांमध्ये आणि रस्त्याच्या दुतर्फा लावलेला दिसून येतो. मराठी भाषेत या वृक्षाला हाडवर्णा किंवा वरुण ही नावे आहेत. महाभारत तसेच चरक, सुश्रुत व वाग्भट यांच्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये याचा ‘वरुणक’ असा उल्लेख आहे.

वायवर्णा हा वृक्ष ९ ते १२ मी. पर्यंत उंच वाढतो. पाने संयुक्त, त्रिदली (तीन दले स्वतंत्र असलेली), फांद्यांच्या टोकांशी दाटीवाटीने वाढलेली व लांबट वाटोळी असतात. पानांची दले भाल्यासारखी, अंडाकृती असतात. फुले सर्वसाधारणपणे डिसेंबर–एप्रिल महिन्यांत समशिख (सपाट गुच्छासारखा) फुलोऱ्यात येतात. फुले सुरुवातीला पांढरी, नंतर पिवळसर आणि अखेरीस जांभळट रंगांची होतात. निदले लहान असतात; दले चार आणि पुंकेसर अनेक असतात. मृदुफळ लांबट वाटोळे असून जायांगाच्या खालच्या लांब दांड्यावर तयार होते; ते गर्द शेंदरी असून नंतर कठीण होते. फळामध्ये अनेक बिया असतात.

वायवर्णा वृक्षाचे लाकूड पिवळसर, मध्यम, कठीण व गुळगुळीत असते. ढोल, फण्या, सजावटी सामान, आगकाड्या इत्यादींसाठी ते वापरतात. चुना चिकट व कठीण करण्यासाठी फळातील मगज, तर रंग पक्का करण्यासाठी सालीची पूड वापरतात. फांदीच्या सालीत सेरील अल्कोहॉल, फ्रीडलीन, ल्युपिऑल, बेतुलिनिक आम्ल, डायोसजेनीन इत्यादी संयुगे असतात. आयुर्वेद औषधोपचारपद्धतीत या वृक्षाचा सालीचा काढा मुतखड्यावर व मूत्रमार्गाच्या वेगवेगळ्या विकारांवर देतात. पानांचा रस पायांची सूज, तळव्याची आग यांवर गुणकारी समजला जातो. मात्र पानांच्या रसामुळे आणि मुळांच्या सालीमुळे अधिहर्षता उद्भवून त्वचा लाल होते आणि फोडही येतात.