कीटकविज्ञान ही प्राणिविज्ञानाची एक शाखा आहे. या शाखेत कीटकांची शरीररचना, निरनिराळ्या अवयवांचे कार्य, त्यांच्या सवयी, त्यांचे परस्परसंबंध, त्यांचे पर्यावरणाशी असणारे संबंध, पर्यावरणाचा त्यांच्यावर होणारा परिणाम, शरीराची वाढ, प्रजनन, जीवनचक्र, कीटकांचा प्रसार, त्यांची उपयुक्तता, त्यांचा उपद्रव, त्यांचे नियंत्रण इ. अनेक बाबींचा अभ्यास करण्यात येतो.
कीटकविज्ञानाची सुरुवात इ.स.पू. चौथ्या शतकाच्या दरम्यान अ‍ॅरिस्टॉटल या तत्त्ववेत्त्यांनी केली; तथापि सतराव्या शतकापर्यंत कीटकविज्ञान अविकसितच होते. १७५० मध्ये स्वीडिश वैज्ञानिक कार्ल लिनीअस यांनी कीटकांचा सांगोपांग विचार केला. त्यांनी कीटकांच्या सु. २,००० जातींना द्विनाम पद्धतीने शास्त्रीय नावे दिली. कीटकांची १३ गणांमध्ये विभागणी केली. तेव्हापासून कीटकविज्ञानाच्या सुसंगत अभ्यासाला सुरुवात झाली.

कीटकविज्ञानामध्ये कीटकांच्या सर्वसाधारण रचना किंवा कार्याचा अभ्यास करणार्‍या कृषी कीटकविज्ञान, वैद्यकीय कीटकविज्ञान, पशुवैद्यकीय कीटकविज्ञान, औद्योगिक कीटकविज्ञान, वन कीटकविज्ञान, न्यायवैद्यकीय , आहार इत्यादीविषयक उपशाखा आहेत. उपयुक्त आणि अपायकारक कीटकांचा अभ्यास आर्थिक कीटकविज्ञान या उपशाखेत केला जातो. तसेच विशिष्ट जातीच्या कीटकांच्या अभ्यासाच्या उपशाखाही आहेत. उदा., माशीविज्ञान, मधमाशीविज्ञान, भुंगेराविज्ञान, रेशीमकिडाविज्ञान, नाकतोडाविज्ञान, रातकिडाविज्ञान इत्यादी.

कीटकविज्ञानाच्या विविध उपशाखांत मधमाशी, रेशमाचा किडा, लाखेचा किडा, वाळवी, भुंगेरे, टोळ, डास, माश्या, उवा, पिसवा, खोडकिडा, फुलपाखरे इ. कीटकांची उपयुक्तता आणि उपद्रव यांच्या दृष्टीने अभ्यास करतात. विसाव्या शतकात कीटकनाशकांचा शोध लागल्यामुळे कीटकविज्ञानात मोठी क्रांती घडून आली. कीटनाशके वापरून व इतर उपाय योजून उपद्रवी कीटकांचा नायनाट करता येतो आणि उपयुक्त कीटकांची योग्य जोपासना करून फायदे मिळविता येतात. या दोन्ही बाबी कीटकविज्ञानामुळे शक्य झाल्या आहेत. जैवतंत्रज्ञानात कीटकविज्ञानाला कृषिपूरकविज्ञान म्हणून महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

भारत सरकारने देशाच्या विविध भागांत कीटक संशोधन केंद्रे स्थापन केली आहेत. म्हैसूर आणि श्रीनगर येथे असलेल्या सेरीकल्चर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थांमध्ये रेशमाच्या किड्यासंबंधी संशोधन करण्यात येते. महाराष्ट्रात वाई व पांचगणी येथे रेशीम संशोधन केंद्रे आहेत. तसेच मधमाश्यांसंबंधी संशोधन करणार्‍या संस्था सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (पुणे) आणि बी रिसर्च स्टेशन (नागरोटा, हिमाचल प्रदेश) या आहेत. महाबळेश्वर येथेही मधुमक्षिका संशोधन केंद्र आहे.