(गार्डन लिझार्ड). एक सरपटणारा प्राणी. सरीसृप वर्गातील स्क्वॅमेटा गणाच्या ॲगॅमिडी कुलात सरड्याचा समावेश केला जातो. इराण, अफगाणिस्तान, चीन, भारत, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, मलेशिया इ. देशांत सरडा आढळतो. भारतात आढळणाऱ्या सरड्याचे शास्त्रीय नाव कॅलोटीस व्हर्सिकलर आहे. भारतात वायव्येकडील काही भाग वगळता तो सर्वत्र आढळतो. त्याला काही वेळा चुकीने सरडगुहिरा देखील म्हटले जाते. परंतु सरडा आणि सरडगुहिरा हे दोन्ही प्राणी वेगवेगळे आहेत. सरड्याला ओळखण्याची खूण म्हणजे त्याच्या पाठीवर असलेले उभे व काटेरी खवले. सरडगुहिऱ्याच्या पाठीवरचे खवले उभे नसतात.

सरडा (कॅलोटीस व्हर्सिकलर)

सरड्याच्या शरीराचे शीर्ष, मान, धड आणि शेपटी असे भाग असतात. शरीराची लांबी सु. ३७ सेंमी. असून फक्त शेपटीची लांबी सु. २७ सेंमी. असते. शेपटीची लांबी साधारणत: संपूर्ण शरीराच्या लांबीच्या दोन-तृतीयांश असते. शरीरावरील खवले परस्परांपासून वेगळे असतात. शीर्षावरील काटेरी खवले तुऱ्यासारखे असून कर्णपटलावरील खवले सपाट असतात. पृष्ठावरील खवले शेपटीकडे लहानलहान होत गेलेले असतात. पूर्ण वाढ झालेल्या सरड्याच्या शेपटीवर खवले असतात; वयाने लहान असलेल्या सरड्याच्या शेपटीवर खवले नसतात. खालच्या जबड्याच्या मागील बाजूस असणारे खवले लहान असल्याने वेगळे भासतात. मागच्या पायांची टाचेपासून बोटापर्यंतची लांबी डोक्याच्या लांबीहून अधिक असते. नर मादीपेक्षा आकाराने लहान असतो.

सरड्याच्या शरीराच्या त्वचेच्या रंगात बरीच विविधता असते. त्यांचा रंग एकसमान तपकिरी, राखाडी किंवा पिवळसर असू शकतो. पाठीवर रुंद करड्या रंगाचे पट्टे असून अधूनमधून पिवळे पट्टे दिसतात. पोटाकडील भाग फिकट पांढरा किंवा पिवळसर असतो. शेपटीवर फिकट तपकिरी वलये आढळतात. नराच्या गळ्याखाली काळसर, आडवा, दांड्यासारखा पट्टा असतो. पूर्ण वाढ न झालेल्या सरड्यांच्या चेहऱ्याच्या भागावर गडद काळे पट्टे असतात. प्रजननकाळात नरामध्ये डोक्याच्या व मानेच्या खालचा भाग भडक लालसर रंगाचा होतो, तर मादीच्या शरीराच्या वरच्या प्रत्येक बाजूस एक फिकट पिवळा पट्टा आढळतो.

सरडे बहुधा सकाळच्या वेळी ऊन खाण्यासाठी कुंपणावर येऊन बसतात. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान विशिष्ट पातळीपर्यंत वाढते व दिवसभर त्यांना सहजपणे हालचाली करता येतात. सरडा वृक्षवासी आणि कीटकभक्षी आहे. त्याचे मुख्य अन्न कीटक असून अधूनमधून तो लहान सरपटणारे प्राणी आणि स्वत:पेक्षा आकारमानाने लहान असलेले सरडेही खातो. त्याच्या जबड्यात दात असतात, परंतु त्याला दातांनी भक्ष्य फाडता येत नाही. त्यामुळे बहुतेक वेळा तो भक्ष्य गिळतो.

प्रजननकाळात नर सरडा आपल्या अधिवासाबद्दल अधिक जागरूक बनतो. प्रत्येक नर घशाखालील त्वचा फुगवून किंवा लालभडक डोके दाखवून मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. या काळात तो दुसऱ्या नराला आपल्या क्षेत्रात प्रवेश देत नाही. क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या नरांना तो आपले लालभडक डोके दाखवून किंवा जोर काढल्याचा आविर्भाव करून पळवून लावतो.

नर सरड्याच्या अवस्करात दोन अर्धशिस्न असतात. मैथुनाच्या वेळी दोन्ही अर्धशिस्ने एकत्र येऊन शिस्न मादीच्या अवस्करामध्ये प्रवेशते. मैथुनानंतर मादी ओलसर मातीत सु. १०–२० अंडी घालते. सहा ते सात आठवड्यात अंड्यातून पिले बाहेर येतात. पिलांची काळजी घ्यावी लागत नाही. पिले एक वर्षात प्रजननक्षम होतात. सरड्याचा सांभाळ केल्यास तो सु. ५ वर्षे जगतो. नैसर्गिक परिस्थितीत तो ९–१२ महिने जगतो.