पाणथळ जागी आढळणारा एक पक्षी. पाणकोंबडीचा समावेश ग्रुईफॉर्मिस गणाच्या रॅलिडी कुलात होतो. ध्रुवीय प्रदेश किंवा उष्ण प्रदेशातील वर्षावने वगळता जगात सर्वत्र आढळणाऱ्या पाणकोंबडीचे शास्त्रीय नाव गॅलिन्यूला क्लोरोपस आहे.
पाणकोंबडी आकाराने तितराएवढी असून तिच्या शरीराची लांबी ३०–३८ सेंमी. व वजन १९०–५०० ग्रॅ. असते. डोके व मान करड्या रंगाची असते; छाती आणि बाजू गडद राखाडी असतात. पंख तपकिरी असून ते मिटलेले असताना पंखांच्या कडांची पांढरी किनार ठळकपणे दिसते. शेपटीखालील पिसे पांढरी असतात. डोळे लाल असतात. चोचीपासून कपाळाचा भाग लाल व चोचीचा टोकाकडील भाग पिवळट रंगाचा असतो. पायांचा रंग हिरवट पिवळा असून बोटे निमुळती व लांबसडक असतात. बोटांना पडदे नसतात आणि मऊ व असमान पृष्ठभागावर चालण्यासाठी ती अनुकूलित झालेली असतात. नर व मादी दिसायला सारखे असले, तरी नर मोठा असतो.
जेथे पाणवनस्पती, वेळूची बने व लव्हाळ्यांची बेटे आहेत आणि पाण्याचा प्रवाह संथ आहे, अशा ठिकाणी पाणकोंबडी आढळते. ती एकटी, जोडीने किंवा टोळक्याने आढळते. विशेषकरून सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या सुमाराला ती संचार करते. पाणवनस्पती, धान्य, क्वचितप्रसंगी कीटक, गोगलगायी व शिंपले यांवर ती गुजराण करते. भित्री असल्याने ती लपून राहते. जराशी चाहूल लागताच दिसेनाशी होते. ढांगा टाकत व शेपूट उभारून चालते किंवा पाण्यात पोहते. चालताना किंवा पोहताना एकसारखे डोके हालविण्याची व झटका देऊन शेपटी वर उडविण्याची सवय तिला असते. संकटकाळी वेगाने पळणे ती पसंत करते. पक्षी असूनही उडणे हे तिला कष्टाचे असते. वेळ आलीच, तर पंख फडफडवत मान पुढे व पाय मागे ताणून ती काही अंतर उडू शकते.
साधारणपणे जून–सप्टेंबर हा पाणकोंबडीच्या विणीचा हंगाम असतो. एरवी शांत असणारे हे पक्षी विणीच्या काळात आक्रमक होतात. नर आपल्या क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या इतर नरांचा पाठलाग करून त्यांना पळवून लावतो. नर हा मादीशी एकनिष्ठ असतो. पाण्याजवळ, झुडपाखाली किंवा जमिनीवर ते मिळून टोपलीच्या आकाराचे घरटे बांधतात. मादी एका वेळी पिवळसर, फिकट तपकिरी व लालसर ठिपके असलेली ५–१२ अंडी घालते. नर व मादी दोघेही अंडी उबवतात. बहुधा नर अंडी उबवतो, तर मादी रक्षकाच्या भूमिकेत असते. या हंगामात ‘क्रो, क्रो, क्रिटीक, क्रिटीक’ असा नराचा आवाज सतत ऐकू येतो. एका हंगामात मादी एकापेक्षा अधिक वेळा अंडी घालते. आधीच्या विणीतील पिले नवजात पिलांची काळजी घेतात. संकटकाळी पिले मादीला बिलगून राहतात. आयु:कालाच्या मानाने पिले जलद प्रौढ होतात आणि स्वत:चे अन्न लवकर मिळवू लागतात.
भारतात पांढऱ्या छातीची पाणकोंबडी (ॲमॉरोमिस फिनीक्युरस) आणि जांभळी पाणकोंबडी (पॉर्फायरीओ पॉर्फायरीओ) या अन्य जातीही आढळतात. त्यांचे कुलही रॅलिडी आहे. पांढऱ्या पाणकोंबडीचे तोंड व छाती पांढरी असून शेपटीखाली तांबडा भडक डाग असतो. तांबट पक्ष्याप्रमाणे ती ‘कूक कूक’ आवाज काढते. जांभळ्या पाणकोंबडीच्या शरीरावरील पिसांचा रंग निळा व हिरवा असतो, तसेच शेपटीखाली पांढरा डाग असतो. हे पक्षी भाताच्या शेतात कोवळी पाने खाण्यासाठी शिरतात, तेव्हा त्यांनी रोपे तुडविल्यामुळे भातशेतीचे नुकसान होते.
कोल्हे, मुंगूस, सरपटणारे मोठे प्राणी आणि शिकारी पाणकोंबडीचे शत्रू आहेत. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे होणारे जलप्रदूषण, कीटकनाशकांचा होणारा वापर आणि नष्ट होत जाणाऱ्या पाणथळ जागा यांमुळे या पक्ष्यांना धोका निर्माण होत आहे.
https://www.youtube.com/watch?v=QQHD0Dqytlk