अन्नातून विषारी द्रव्ये शरीरात गेली असता जी विकृती उत्पन्न होते तिला अन्नविषबाधा म्हणतात. विषाणू जीवाणू, आदिजीव असे सूक्ष्मजीव व परजीवी यांचा संसर्ग तसेच रासायनिक पदार्थांचे सेवन यांमुळे जठर आणि आतड्याचा दाह होतो व परिणामी उलट्या व जुलाब होतात. आफ्रिका व आशिया खंडांत दर दिवशी सु. १२,६०० लोकांचा मृत्यू अन्नविषबाधेमुळे होतो, असे आढळले आहे. संसर्गकारकांच्या संख्येनुसार आणि माध्यमानुसार अन्नविषबाधेची तीव्रता ठरते.अन्नविषबाधा ही बहुतांशी सूक्ष्मजीवांच्या संसर्गाने होते. काही जीवाणूंची वाढ अन्नात होते. ते विष तयार करतात. स्टॅफिलोकॉकस व कॅम्पीलोबॅक्टर हे जीवाणू जठर आणि आतड्याच्या श्लेष्मल पटलावर चिकटतात व वाढतात. ते आतड्यात पेशी व चेतातंतूंवर परिणाम करणारे विष निर्माण करतात. त्यामुळे शौचावाटे पाणी व क्षार जातात. मज्जातंतूंवर परिणाम होऊन थकल्यासारखे वाटते. विषामुळे श्लेष्मल पेशींचा नाश होऊन शौचावाटे रक्तही जाते. विषाणूंमुळे यकृत विकार होतो. विषाणूबाधित अन्न आणि पाणी घेतल्यामुळे हा रोग होतो. क्रिप्टोस्पोरीडियम, जिआर्डीआ व एन्टामीबा या आदिजीवांमुळे अन्नविषबाधा होते. उपरोक्त आदिजीवी असलेले अन्न आणि भाज्या व्यवस्थित न शिजविल्यामुळे असे अन्न विषारी होते. घरातील पाल, उंदराच्या लेंडया अन्नात पडल्याने विषबाधा होते.

काही वेळा रसायनांमुळे विषबाधा होते. सामान्यपणे पारा, तांबे व आर्सेनिक हे रासायनिक पदार्थ अन्नावाटे शरीरात गेल्यास अन्नविषबाधा होते. कल्हई न लावलेल्या तांब्याच्या भांड्यात आमटी व दही यांसारखे आम्लयुक्त पदार्थ ठेवल्यास कॉपर सल्फेट निर्माण होऊन विषबाधा होते. धान्याला कीड लागू नये म्हणून पार्‍याच्या गोळ्या ठेवतात. धान्याबरोबर त्याही दळल्या जाऊन पारा शरीरात जाऊन विषबाधा होते. आर्सेनिकाची भुकटी औषधाच्या रूपात खाल्ली जाऊन शौचास पातळ व हिरवट होते.

विषयुक्त अन्नामुळे होणारी विषबाधा होऊ नये अशी काळजी घेणे हे विषबाधेनंतर करण्यात येणार्‍या उपायांहून अधिक महत्त्वाचे असते. प्रतिजैविके अंतक्षेपणाद्वारे घ्यावी लागतात. त्यानंतर ती तोंडावाटे देतात. रासायनिक पदार्थांमुळे झालेल्या विषबाधेवर उतारा म्हणजे विषारी पदार्थ ज्यामुळे दुष्प्रभ होईल असा पदार्थ देतात.

अन्न शिजविणार्‍या व वाढणार्‍या व्यक्तींनी नेहमी स्वच्छ रहावे. नखात घाण साठू देऊ नये. अन्न हाताळ्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे. शिळे  अन्न खाऊ नये. हातावर काही जखम, व्रण व त्वचारोग असेल तर योग्य काळजी घ्यावी. मांजर, कुत्री, उंदीर, घूस, घरमाश्या व झुरळे यांसारख्या प्राण्यांपासून अन्न सुरक्षित ठेवावे. अन्नपदार्थ उघड्यावर न ठेवता झाकून ठेवावेत. अन्नपदार्थ शीतपेटीत ठेवावेत. अन्न डबाबंद करण्यापूर्वी सूक्ष्मजीवांपासून मुक्त असावे. लोणच्यांतील मोहरी, मीठ व तेल यांचे आणि मुरंब्यातील साखरेचे प्रमाण योग्य ठेऊन सूक्ष्मजीवांची वाढ होऊ देऊ नये. काही अन्नपदार्थ गोठवून ठेवावेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा