उद्योगांत कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार केला जातो. अशा निर्मिती व प्रक्रिया उद्योगातून मालांची निर्मिती होत असताना काही अपायकारक अपशिष्टे व प्रदूषके बाहेर पडतात. या अपशिष्टे व प्रदूषकांमुळे हवा, पाणी, ध्वनी व जमीन यांचे प्रदूषण होते. अशा प्रदूषणाला औद्योगिक प्रदूषण म्हणतात.
कारखान्यांतून बाहेर पडणारे विविध दूषित वायू व वाहितमल तसेच यंत्रांचे मोठे आवाज ही प्रमुख औद्योगिक प्रदूषके आहेत. कारखान्यांच्या धुराड्यातून कार्बन डाय-ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड यांसारखे अपायकारक वायू वातावरणात सोडले जातात. त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. अशी दूषित हवा सजीव सृष्टीला अपायकारक ठरते. कारखान्यांतील उत्सर्जित वायू व उष्णता यांमुळे वातावरणाचे तापमान वाढते. कारखान्यांतून बाहेर पडणार्या विविध प्रकारच्या आम्लांमुळे आम्लवर्षण होते. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, पिके, ऐतिहासिक वास्तू किंवा शिल्पे यांच्यावर दुष्परिणाम होतात. उद्योगांमध्ये वापरण्यात येणार्या क्लोरोफ्लुओरोकार्बनमुळे उच्च वातावरणस्तरातील ओझोन थराचा क्षय होत आहे. औद्योगिक प्रदूषणांमुळे हरितगृह परिणाम ( सूर्याकडून आलेली उष्णता पृथ्वीवरील वातावरणात स्थानबंधन झाल्यामुळे होणारा परिणाम) जाणवू लागले आहेत.
अणुऊर्जा प्रकल्पामधून होणारे किरणोत्सर्जन सजीव सृष्टीला हानीकारक ठरत आहे. उदा., रशियातील चेर्नोबील येतील अणुऊर्जा केंद्रातून २८ एप्रिल १९८६ रोजी झालेले किरणोत्सर्जन. रसायन उद्योगातील तांत्रिक बिघाड किंवा मानवाचा निष्काळजीपणा यामुळे विषारी वायुगळती होऊन सजीव सृष्टीवर गंभीर परिणाम होतात. उदा., डिसेंबर १९८४ मध्ये भोपाळ येथील युनियन कार्बोइडच्या कारखान्यातून मिथिल आयसोसायनाइड या विषारी वायूची गळती होऊन त्याच्या प्रादुर्भांवामुळे तेथील हजारो लोक मृत्युमुखी पडले. अनेकांना कायमचे अंधत्व किवा अपंगत्व आले. औद्योगिक प्रदूषकांमुळे ऑक्सिजन चक्र, कार्बन चक्र, जलचक्र व पर्यावरण यांच्यात असंतुलन निर्माण झाले आहे. औद्योगिक प्रदूषणाचे वैशिष्ट्य असे की, ही समस्या केवळ औद्योगिक परिसरापुरतीच सीमित रहात नाही, तर संपूर्ण पृथ्वीला व्यापते. औद्योगिक प्रगत देशांत ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.
कारखान्यांतील वाहितमल नद्या, नाले, सरोवरे, खाड्या, समुद्र इ. जलाशयांत सोडल्याने त्यातील पाणी प्रदूषित होते. प्रदूषित पाणी मानवी आरोग्यास तसेच परिसंस्थांना अपायकारक ठऱते. गंगा नदीच्या काठावर उभारण्यात आलेले कारखाने व त्यामुळे निर्माण झालेली नागरी केंद्रे यांमुळ गंगा नदीचे पाणी खूप दूषित झाले आहे. जगातील तेलशुद्धीकरण कारखाने प्रामुख्याने समुद्रकिनार्यावर स्थापन झालेले आहेत. त्यांतील तेलगळतीमुळे तेथील सागरी पाण्याचे प्रदूषण होते. उद्योगांतील द्रवरूप प्रदूषके उघड्यावर पडलेली असतात किंवा जमिनीत गाडली गेलेली असतात. अशी प्रदूषके जमिनीत झिरपत जाऊन भूमिजलाचे प्रदूषण होते.
कारखान्यांतून बाहेर पडणार्या काही अपशिष्टांचे ( टाकाऊ पदार्थांचे) अपघटन होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटते. तसेच त्यामुळे रोगांचाही प्रादुर्भाव होते. औद्योगिक वाहितमल व अपायकारक घन अपशिष्टामुळे भूप्रदूषण होते. कारखान्यांतील यंत्रांचे मोठे आवाज, भोंगे यांमुळे ध्वनिप्रदूषण होते. परिणामत: तेथील कामगारांना बहिरेपणा. निद्रानाश, चिडचिडेपणा यांसारख्या व्याधी जडतात. औद्योगिक विकासामुळे अस्तित्वात आलेल्या नागरी केंद्रांच्या ठिकाणी अति-नागरिकरणाच्या पर्यावरण विषयक गंभीर समस्या निर्माण झालेल्या आढळतात.
औद्योगिक प्रदूषकांमुळे निर्माण झालेल्या पर्यावरण व प्रदूषणविषयक समस्यांबाबत आज जागतिक पातळीवर गांभीर्याने विचार केला जात आहे. उद्योगाचे स्थान निश्चित करताना स्थानिकीकरणाच्या परंपरागत घटकांबरोबरच परिस्थितिकीय घटकांचाही विचार केला जात आहे. कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी व्यवस्थापनाने होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी व्यवस्थापनाने आपल्या कारखान्यातील वाहितमल, अपायकारक अपशिष्टे व प्रदूषकांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. इंधनाची बचत करणार्या वाहनांची व यंत्रसामग्रीची निर्मिती केली पाहिजे. प्रदूषण नियंत्रण, नैसर्गिक संसाधनांचे संधारण, पर्यावरणीय व्यवस्थापन योजना इ. घटक विचारात घेणे आवश्यक आहे.
भारतात औद्योगिक प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर काही कायदे व नियम केले आहेत. उदा., जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण व संधारण कायदा. भारत शासनाचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषणाविषयक कामकाज पाहते. या संदर्भातील कायद्यांचे उल्लंघन करणार्या कारखान्याच्या व्यवस्थापनास जबाबदार व शिक्षेस पात्र ठरविले जाते.