अ‍ॅस्टरेसी कुलातील फुलांच्या एका जातिसमूहाला डेझी म्हणतात. बेलिस पेरेनिस असे शास्त्रीय नाव असलेली ही जाती यूरोपीय डेझीची सामान्य जाती आहे. ही जाती डेझीची मूळ जाती आहे, असे मानतात. हिची फुले दिवस उजाडतो तेव्हा उमलतात. म्हणून या फुलांना इंग्रजी भाषेत ‘डेज आय’ म्हणतात. डेझी हा शब्द ‘डेज आय’ या शब्दांचा अपभ्रंश होऊन तयार झाला आहे. अंटार्क्टिका वगळता ही फुले जगभर आढळतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ती पुष्पविन्यासात येतात आणि स्तबक स्वरूपात असल्यामुळे तारकांप्रमाणे दिसतात. परिसंस्था आणि आर्थिक दृष्टीने अ‍ॅस्टरेसी कुल महत्त्वाचे आहे.

डेझी वनस्पती व फुले

डेझीचे क्षुप १५ सेंमी. उंचीपर्यंत वाढते. पाने साधी, लांब व एकाआड एक असून जमिनीलगत वाढतात. पानांचा आकार चमच्याप्रमाणे असून ती २—५ सेंमी. लांब असतात. कुलाच्या वैशिष्ट्याप्रमाणे स्तबकात बिंब-पुष्पके व किरण-पुष्पके असतात. बिंब-पुष्पके पिवळ्या रंगाची तर किरण-पुष्पके पांढरी, जांभळी किंवा गुलाबी असतात. किरण-पुष्पकातील प्रत्येक पाकळी स्वतंत्र फुलाप्रमाणे कार्य करते. डबलडेझी (बे. पेरेनिस फ्लोरेप्लेनो) या प्रकारात स्तबकातील किरण-पुष्पकांची दोन मंडले असतात. फुलांचे विविध रंग आणि स्वरूप यांच्या एकत्रित परिणामामुळे त्यांच्याकडे कीटक आकर्षित होतात. पुष्परचनेसाठी तसेच शोभेसाठी डेझीचा जास्त उपयोग होतो. कोवळी पाने सॅलडसारखी आणि शिजवूनही खातात. कळ्या व फुले सँडविच, सूप व सॅलडमध्ये वापरतात. किरण-पुष्पकांचा चहा करतात. तसेच पूरक जीवनसत्त्वासाठी त्यांचा वापर होतो. फुलातील रसाचा उपयोग जखमांवर औषधी उपचारासाठी होतो. यूरोपात कित्येक ठिकाणी या वनस्पतीचे जमिनीवर आच्छादन केले जाते व नको असलेली तणे त्यामुळे नष्ट होतात. काही ठिकाणी ते स्वत:च नैसर्गिक तण म्हणून वाढते.