बहुपेशीय सजीवांमधील एकाच प्रकारची संरचना आणि कार्य करणार्या पेशींचा समूह म्हणजे ऊती. एकपेशीय सजीवांच्या ज्या विविध क्षमता असतात त्या बहुपेशीय सजीवांमध्ये निरनिराळ्या ऊतींद्वारा घडून येतात. ऊतिनिर्मिती प्रक्रिया ही पेशीविभेदनाच्या प्रक्रियेची पुढची पायरी आहे. एकपेशीय फलित अंड्याचे विभाजन होऊन पेशींचा एकच थर असलेले कोरक गोल (ब्लास्ट्युला) तयार होतात, या अवस्थेत ऊती अजून बनलेल्या नसतात. कोरक गोलापासून आद्यभ्रूणन प्रक्रियेत बाह्यस्तर, मध्यस्तर आणि अंत:स्तर असे तीन जननस्तर तयार होतात. या प्रक्रियेतील पेशीविभेदनातून ऊतिनिर्मिती सुरू होते आणि इंद्रिये वा अंगे पूर्ण तयार होईपर्यंत चालू राहते. एकाच प्रकारच्या ऊतीतील पेशी या कमीजास्त प्रमाणात एकसारख्याच असतात आणि एकाच प्रकारचे कार्य करतात.
प्राणी ऊती
प्राणी ऊतींचे पाच प्रकार आहेत. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करतात :
अपिस्तरीय ऊती : प्राण्यांच्या शरीरातील पृष्ठभागावरील आवरण; तसेच शरीरातील पचन, श्वसन, अभिसरण, उत्सर्जन आणि प्रजनन संस्था इत्यादींच्या नलिकांच्या अस्तरांमधील पेशींचे थर अपिस्तरीय ऊतींनी बनलेले असतात. शरीरात शोषल्या जाणार्या आणि शरीरातून बाहेर टाकल्या जाणार्या घटकांवर या स्तराचे नियंत्रण असते. एकमेकांशेजारी असलेल्या पेशींच्या सलग पापुद्र्यांपासून हा स्तर बनलेला असतो. अपिस्तराच्या बाहेरील आणि आतील वाढीमुळे ज्ञानेंद्रियांचे संवेदक पृष्ठभाग, ग्रंथी, केस आणि नखे इत्यादी बनतात.
स्नायू ऊती : आकुंचन होणे, शिथिल होणे आणि शरीराच्या हालचाली घडवून आणणे हे स्नायू ऊतींचे वैशिष्ट्य आहे. या ऊतींचे सामान्यपणे आंतरांग ऊती (मऊ ऊती), कंकाल ऊती आणि हृदीय ऊती असे दोन प्रकार आहेत. आंतरांग ऊतींचे नियंत्रण स्वायत्त चेतासंस्थेद्वारे होते. शरीरातील विविध इंद्रियांच्या आतील अस्तरावर या ऊती असतात. कंकाल ऊतींचे नियंत्रण मध्यवर्ती चेतासंस्थेद्वारे होते. काही प्रमाणात या ऊतींच्या हालचाली ऐच्छिक असतात. हे स्नायू हाडांना जोडलेले असतात. हृदीय ऊती हृदयात असतात. हृदीय ऊतींमध्ये विशिष्ट लयानुसार आंकुचन व प्रसरण पावण्याची क्षमता असते.
चेता ऊती : चेतापेशींपासून चेता ऊती बनलेल्या असतात. चेतापेशींची रचना अतिशय गुंतागुंतीची असते. वेगवेगळ्या संवेदनांना या ऊती विशिष्ट प्रकारे प्रतिसाद देतात; त्यामुळे शरीराच्या एका भागाकडून दुसर्या भागाकडे माहितीचे वहन घडून येते. मेंदू, चेतारज्जू आणि चेतातंतूत या ऊती असतात.
प्राण्यांच्या काही ऊती
संयोजी ऊती : संयोजी ऊतींचे कार्य संपूर्ण शरीराला आधार देणे आणि शरीराचे भाग जोडणे, हे आहे. म्हणून या ऊतींच्या संरचनेत विविधता आढळते. या ऊतींमध्ये मोठ्या प्रमाणावर पेशीबाह्य पदार्थ असून या पदार्थांचे वेगवेगळ्या प्रकारे परिवर्तन झालेले दिसते. कंडरा आणि अस्थिरज्जूंमध्ये तंतुमय ऊती आढळतात. पाठीचा कणा, धमनी भित्तिका आणि श्वासनलिका यांच्या दरम्यान असलेल्या अस्थिरज्जूंमध्ये लवचिक ऊती असतात. सांध्यामधील कास्थी या संयोजी ऊतीच आहेत. हाडे विकसित होत असताना सुरुवातीला त्या कास्थिस्वरूप असतात. मेद साठविणार्या मेद ऊती महत्त्वाच्या भागांचे संरक्षण करतात. या भागांना त्यांचा उशीसारखा उपयोग होतो. तसेच या अतिरिक्त अन्न साठवितात.
प्रवाही ऊती : रक्त आणि लसिका या प्रवाही ऊती आहेत. शरीरातील इतर ऊतींना अन्न व ऑक्सिजन पुरविणे, शरीरातील टाकाऊ पदार्थ वृक्काकडे (मूत्रपिंडाकडे) व फुफ्फुसाकडे वाहून नेणे आणि रोग निर्माण करणार्या जंतूंचा नायनाट करण्यासाठी संरक्षक पेशी व इतर घटकांचे वहन करणे हे या ऊतीचे महत्त्वाचे कार्य आहे.
वनस्पती ऊती
वनस्पती ऊतींचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत : साध्या ऊती व संयुक्त ऊती. साध्या ऊती- मधील पेशी एकाच प्रकारच्या असतात; संयुक्त ऊती विविध प्रकारच्या ऊतींनी बनलेल्या असतात.
साध्या ऊती : या ऊतींचे मूलोती, स्थूलकोनोती आणि दृढोती असे तीन प्रकार आहेत :
मूलोती (मूलभूत ऊती) : यांमधील पेशी जिवंत, पेशीभित्तिका पातळ असलेल्या असून पेशीरसाने भरलेल्या असतात. पेशींमध्ये रिक्तिका असतात. पेशी एकमेकांना चिकटून असल्या तरी पेशींच्या दरम्यान जागा असते. पाणी, अन्न साठविणे, तसेच आधार देणे असे यांचे कार्य आहे.
स्थूलकोनोति : या ऊती मूलोतीप्रमाणेच जिवंत पेशींच्या बनलेल्या असतात, मात्र पेशींच्या दरम्यान पेशीभित्तिका जाड झाल्यामुळे जागा नसते. त्यामुळे जिथे या ऊती असतात त्या भागाला आधार देणे हे यांचे कार्य आहे. त्या पाणी, अन्नसुद्धा साठवितात.
दृढोती : या ऊतींमधील पेशी मृत असतात. त्यांच्या पेशीभित्तिकावर आतील बाजूस लिग्नेनचा थर असल्यामुळे भिंती जाड असतात. यांचे मुख्य कार्य आधार देणे आहे.
संयुक्त ऊती : एकापेक्षा जास्त प्रकारच्या साध्या ऊती एकत्र येऊन संयुक्त ऊती बनतात. त्यांचे कार्य अन्नरस, पाणी यांचे वहन करणे. संयुक्त ऊतीचे काष्ठ व रसवाहिनी असे दोन प्रकार आहेत.
काष्ठ : या संयुक्त ऊतीमध्ये काष्ठमूलोती, काष्ठदृढोती, वाहिका, वाहिनी अशा पेशी असतात मुळांनी शोषिलेले पाणी खोडातून इतर अवयवांकडे वाहून नेणे हे कार्य काष्ठ करते.
रसवाहिनी : ही संयुक्त ऊती रसमूलोती, रसदृढोती, चाळणी नलिका, चाळणी पेशी यांपासून बनलेली असते. पानांनी तयार केलेले अन्न वनस्पतीच्या इतर भागांकडे वाहून नेणे हे यांचे कार्य आहे.