मुचकुंद हा सदाहरित वृक्ष स्टर्क्युलिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टेरोस्पर्मम ॲसरिफोलियम आहे. टेरोस्पर्मम सुबरिफोलियम या शास्त्रीय नावानेही तो ओळखला जातो. मुचकुंद हा वृक्ष मूळचा दक्षिण आशियातील भारत ते म्यानमार या भागातील आहे. श्रीलंकेत आणि भारतात कोकण, कर्नाटक, तमिळनाडू, ओडिशा अशा अनेक ठिकाणी नदीकाठी तो दिसून येतो.

मुचकुंद (टेरोस्पर्मम ॲसरिफोलियम) : (१) वृक्ष, (२) पाने व फुल, (३) तडकलेली फळे

मुचकुंद वृक्ष १०-२० मी. उंच वाढतो. त्याचे खोड रुंद व तांबूस-तपकिरी रंगाचे असते. लहान व नवीन फांद्या पिसांसारख्या दिसतात. पाने साधी, मोठी व हस्ताकृती शिराविन्यासाची असून त्यांची कडा दंतूर असते. पानांची वरची बाजू गडद हिरवी व चकचकीत असून खालची बाजू चंदेरी ते तांबूस-तपकिरी असते. पाने आकाराने मोठी, लोंबती, सु. ३० सेंमी. लांब आणि तेवढीच रुंद असतात. फुले मोठी, पांढरी व सुगंधी असून उन्हाळ्याच्या सुरुवातीला येतात. फुलाची कळी मोठी असून फूल उमलताना त्याच्या निदलपुंजाची पाच दले एकमेकांपासून सुटी होतात. प्रत्येक दल जाड, ८-१२ सेंमी. लांब आणि आतून पांढरे, तर बाहेरून तपकिरी असते. दलपुंज संयुक्त, पाच दलांचे, पांढरे आणि सुगंधी असते. फुलात अनेक पुंकेसर असून ते तळाशी जुळलेले असतात. फुले रात्री उमलतात. फळ बोंड प्रकारचे, लंबगोल, दोन्ही बाजूंना निमुळते व ४-५ शकलांचे असून त्यातील प्रत्येक कप्प्यात २-४ बिया असतात. प्रत्येक बी तिरपे, अंडाकृती असून त्याच्या टोकाला पातळ पंख असतो. पिकल्यावर बोंड तडकते आणि त्यातील पंखधारी बिया हवेवर तरंगत चोहीकडे पसरतात. परागण पतंगांमार्फत होते.

मुचकुंद वृक्षाची वाढ जलद होते. सुगंधी फुलांसाठी, मोठ्या पानांसाठी, बागांमध्ये शोभेसाठी आणि रस्त्याच्या कडेला तो लावतात. पत्रावळ्या म्हणून किंवा अन्नपदार्थ गुंडाळून ठेवण्यासाठी त्याच्या पानांचा वापर करतात. जखमेतून वाहणारे रक्त थांबविण्यासाठी पानांच्या खालच्या केसाळ भागाचा उपयोग करतात. फुलांपासून औषधी रस काढतात आणि त्याचा वापर दाह कमी करण्यासाठी तसेच जखमा साफ करण्यासाठी करतात. मुचकुंदाचे लाकूड मऊ असते. त्याच्या खोडापासून तयार केलेल्या फळ्यांपासून पेट्या बनवितात. गुरांना कंदरोग झाल्यास (कंदरोगात गुरे सुक्या लेंड्या टाकतात, अशक्त होतात व त्यांचे दात हलू लागतात.) त्यांना मुचकुंदाच्या सालीचा रस व गूळ एकत्र करून देतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा