आपट्याची फांदी

आपटा फॅबेसी कुलामधील बौहीनिया  प्रजातीतील शेंगा देणारे, भरपूर व लोंबत्या फांद्यांचे, वेडेवाकडे वाढणारे लहान झाड आहे. याचे शास्त्रीय नाव बौहीनिया रॅसिमोजा आहे. हे भारत, श्रीलंका, चीन इ. देशांतील पानझडी वनांत आढळते. शोभेसाठी बागेतही हे झाड लावतात.

आपट्याची पाने साधी, अर्धवट विभागलेली आणि रुंदीला अधिक असून वरून हिरवी तर खालून पांढरट असतात. फुले लहान, पांढरी किंवा पिवळसर असून फेब्रुवारी ते मे मध्ये येतात. पाकळ्या पाच व सुट्या असून पुंकेसर दहा असतात. शेंगा १५ ते २५ सेंमी. लांब आमि १.८ ते २.५ सेंमी. रुंद असून साधारण चपट्या व वाकड्या असतात. शेंगांतील बिया १२ ते २०, चपट्या व लंबगोल असतात. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या शेंगा पिकतात आणि नंतर काही महिने तशाच झाडाला धरून राहतात. उन्हाळा संपताना या शेंगा गळून पडतात.

हिंदू लोक ‘दसर्‍याचे सोने’ म्हणून आपट्याची पाने वाटतात. बौहीनिया प्रजातीतील अनेक जातींच्या झाडांची पाने सारखीच दिसतात. आपट्याचे झाड औषधी आहे. हगवण, जुलाब यांसारख्या पचनसंस्थेच्या रोगांवर आपट्याच्या सालीचा रस गुणकारी ठरतो. तसेच स्तंभक म्हणूनही या वनस्पतीचा उपयोग होतो. आपट्याच्या सालीपासून टॅनीन, धागे व डिंक मिळवितात. विड्या तयार करण्यासाठीही आपट्याची पाने वापरतात. बौहीनिया या प्रजातीखाली २०० हून अधिक वनस्पती येतात. झां आणि गास्पार बौहीन या दोन वनस्पतिशास्त्रज्ञ बंधूंच्या नावावरून बौहीनिया हे प्रजातिवाचक नाव पडले आहे. या प्रजातीतील बौहीनिया टोमेंटोजा ही वनस्पतीही आपटा याच नावाने ओळखली जाते. बागेत व वनात दिसणार्‍या या झाडाला ‘पिवळा कांचन’ असेही म्हणतात.