मुलामुलींचे बालपण संपून तारुण्य सुरू होईपर्यंतच्या संक्रमण कालावधीला सामान्यपणे पौगंडावस्था म्हणतात. किशोरावस्था किंवा कुमारावस्था म्हणून ओळखला जाणारा हा काळ वयाच्या १०–१८ वर्षांदरम्यानचा असतो. वयात येत असताना मुलामुलींच्या जीवनातील हा काळ त्यांच्या भावी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मानसोपचार तज्ज्ञांच्या दृष्टिकोणातून या अवस्थेला विशेष महत्त्व दिले जाते. त्याची दोन प्रमुख कारणे आहेत: (१) पौगंडावस्थेच्या या काळात मुलामुलींमध्ये मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात, (२) या समस्यांकडे योग्य रीतीने लक्ष देऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न न झाल्यास मानसिक आणि पर्यायाने शारीरिक रोगांचे प्रमाण वाढू शकते. मानसिक बदलांप्रमाणे या काळात मुलामुलींची शारीरिक व बौद्धिक वाढ होऊन सामाजिक जाणिवा दृढ होत असतात.

पौगंडावस्थेत जे शारीरिक बदल होतात, त्यांस मुलांमध्ये ‘टेस्टोस्टेरोन’ तर मुलींमध्ये ‘इस्ट्रोजेन’ ही संप्रेरके कारणीभूत असतात. या संप्रेरकांवर अवटू, पियुषिका, अंडाशय व वृषण इत्यादी ग्रंथींचे नियमन असते. मुलांमध्ये वृषणातील लायडिख पेशी टेस्टोस्टेरोन संप्रेरक निर्माण करतात, तर शुक्रजनक पेशीतून तयार होणाऱ्या शुक्रपेशी वीर्यरूपात शिश्‍नावाटे शरीराबाहेर पडतात. मुलांमध्ये वृषण व शिश्‍नाची वाढ वयाच्या १७-१८ व्या वर्षांपर्यंत पूर्ण होते. त्यांची उंची वाढते, स्वररज्जू जाड झाल्यामुळे आवाज घोगरा होतो, मिसरूड फुटून दाढी येते, अंगावर लव वाढून केस राठ होतात आणि काखेत, जांघेत, जननेंद्रियांजवळच्या भागात, छातीवर व क्वचित पाठीवर केस उगवतात.

मुलींमध्ये साधारणपणे वयाच्या १०-११ व्या वर्षापासून अंडाशय व गर्भाशय वाढून अंड (पहा: अंड) पक्व होते, बाह्यजननेंद्रियातून पांढरा स्राव येतो आणि मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. क्वचित प्रसंगी मासिक पाळी सुरू व्हायला वेळ लागतो. स्तनांची वाढ होते, कटिप्रदेश रुंदावतो. दंड, स्तन, ओटीपोट, कटिप्रदेश, नितंब व मांड्या येथे चरबी साठू लागते आणि स्तनांचे व नितंबांचे आकारमान हळूहळू वाढू लागते.

पौगंडावस्थेतील अशा शारीरिक बदलांमुळे मुलींची स्त्रीत्वाकडे तर मुलांची पुरुषत्वाकडे वाटचाल सुरू होऊन ती प्रजननक्षम होतात. शारीरिक व्याधी व संप्रेरकात फेरफार झाल्यास हे बदल पुढेमागे होऊ शकतात. हे बदल घडून येण्यासाठी आनुवंशिकता, आहार, व्यायाम, मैदानी खेळ, घरातील वातावरण व पालकांचा पाठिंबा अशा घटकांचा महत्त्वपूर्ण भाग असतो. या काळात वेगाने होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे मुलामुलींच्या मनाची अवस्था चमत्कारिक होते, तर काही वेळा ती गोंधळून व घाबरून जातात. पालकांशी त्यांची जवळीक कमी होऊन त्यांच्यात समवयीन, समविचारी व भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षण वाढू शकते. स्वत:चे व्यक्तिमत्त्व आकर्षक ठेवण्याकडे कल वाढू लागतो. काही मुलामुलींच्या चेहऱ्यावर विशिष्ट पुळ्या (तारुण्यपीटिका) उठू लागतात. मुलींमध्ये त्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा गंड निर्माण होऊ शकतो. आपल्या आवडीनिवडींवर पालकांनी लादलेली बंधने व शिस्त बहुधा या वयात मुलेमुली झुगारून देऊ शकतात. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व नैतिक अशा विषयांवर चर्चा होऊन मुलेमुली स्वत:ची मते धीटपणे मांडायला लागतात. त्यांची कामाची व अभ्यासाची क्षमता वाढते. मात्र काही वेळा या वयातील मुलामुलींमध्ये भावनिक तणाव, आईवडिलांशी वाद, चिडचिडेपणा व नैराश्य अशी लक्षणेही दिसून येतात. परिणामी काही वेळा नकारात्मक विचारांमुळे उद्धटपणा, हिंसक वृत्ती, व्यसनाधीनता, न्यूनगंड, लैंगिक व्याधी, अस्थिरता इ. परिणाम दिसून येतात.

पौगंडावस्थेत मुलामुलींना पालकांचा सकारात्मक आधार, उपजीविकेसाठी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेण्यासंबंधी मार्गदर्शन व त्यांच्या विविध समस्यांवर समुपदेशन मिळणे गरजेचे असते. अशा वेळी मुलामुलींवर न रागावता त्यांच्या चुका कौशल्याने दाखवून देणे, चर्चेसाठी त्यांना घरातील वातावरण मोकळे ठेवणे आणि उत्तम सामाजिक व नैतिक वागणुकीचा आदर्श स्वत:च्या वर्तनाने मुलामुलींना घालून देणे हे पालकांचे कर्तव्य असते. मुलामुलींमधील ऊर्जेला योग्य वळण देऊन कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व घडविणे, व्यायाम व खेळांच्या माध्यमातून सर्वांशी मिळून-मिसळून वागण्यास शिकवणे आणि संघभावना वाढविणे या बाबी सकारात्मक परिणाम घडवून आणतात. त्यामुळे या वयातील मुलामुलींचा सर्वांगीण विकास होऊन समाजाचाही विकास घडून येतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा