कास्थिमत्स्य वर्गातील राजीफॉर्मीस उपगणातील ऱ्हिनोबॅटिडी कुलातील एक खाद्य मासा. त्याचे शास्त्रीय नाव ऱ्हिंकोबॅटस जीडेन्सीस आहे. भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम किनाऱ्यावर ते आढळतात. मुंबईत तो लांग या नावाने ओळखला जातो. त्याचा आकार गिटार वाद्यासारखा असल्यामुळे त्याला ‘गिटार फिश’ असेही म्हणतात.

रांजा (ऱ्हिंकोबॅटस जीडेन्सीस)

रांजाचा आकार मुशी (शार्क) व पाकट (रे मासा) यांच्यामधला असून तो वरच्या आणि खालच्या बाजूंनी चपटा असतो. रंग फिकट राखाडी असून पोटाची बाजू पांढरट असते. डोके आणि धड एकमेकाला चिकटलेले असून शरीराचा हा भाग थाळीसारखा दिसतो. वक्षपर याच भागावर असतात. श्रोणिपरांची जोडी असून ती धडाच्या बाजूला असते. धड शेपटीकडे निमुळते होत गेलेले असून त्यावर दोन पृष्ठपर व एक अधरपर असतो. शेपटी लांब व पुच्छपराने वेढलेली असते. त्वचा खरबरीत असून त्यांवर काटे असतात. पूर्ण वाढ झाल्यावर त्याची लांबी सु. ३·१ मी. एवढी भरते; मात्र त्याआधीच ते पकडले जातात. पूर्ण वाढलेल्या माशाचे वजन सु. २२५  किग्रॅ. भरल्याचे आढळून आले आहे. तो ताजा किंवा सुकवून खातात. ताज्या माशाला विशेष मागणी असते.

रांजा मासे खेकडे, माखली, शेवंडे आणि लहान मासे यांच्यावर उपजिविका करतात. ते जरायुज तसेच अंडजरायुज असतात. त्यांच्या यकृतापासून तेल मिळते. तेलामध्ये अ-जीवनसत्त्व आणि ड-जीवनसत्त्व असून तेल पूरक अन्न म्हणून वापरतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा