पावटा (Dolichos lablab)

पावटा : (वाल,वरणा,वालपापडी; हिं.सेम; गु. वाल;क. चप्परद, अवरे; सं. शिंबी, निष्पाव; इं. लॅबलॅब, इंडियन बटर बीन, हायसिंथ बीन; लॅ. डॉलिकॉस लॅबलॅब ; कुल-लेग्युमिनोजी; उपकुल-पॅपिलिऑनेटी). हे एक परिचित कडधान्ये आहे.समशीतोष्ण व उष्ण कटिबंधांत सामान्यपणे हे आढळणारे असून भारतात अनेक वर्षे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, द. गुजरात, महाराष्ट्र इ. प्रदेशांत लागवडीत आहे. ह्याचे मूलस्थान भारत असावे व येथून ते चीन, प.आशिया, ईजिप्त इ. प्रेदशांत नेले असावे असे मानतात.वराहमिहिर यांच्या बृहत्संहितेत (वृक्षायुर्वेद; इ.स. सहावे शतक) निष्पाव या संस्कृत नावाने पावट्याचा उल्लेख आला आहे. ही वनस्पती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) वेल अथवा लहान झुडपासारखी असून हिची अनेक शारीरिक लक्षणे हिच्या वंशातील कुळिथामध्ये व हिच्या कुलात व उपकुलात वर्णिल्याप्रमाणे आहेत.पाने संयुक्त, त्रिदली, एकाआड एक असून त्यांच्या बगलेत फुलोरे (मंजऱ्या) सेतरत, फुले पांढरी, लालसर किंवा जांभळी असून त्यांची संरचना पतंगरूप असते. शिंबा (शेंग) २-१२ सेंमी. लांब, अरुंद किंवा रुंद, चपटी किंवा फुगीर, वाकडी असून तीत २-४ चपट्या किंवा गोलसर बिया असतात. त्याचा रंग पांढरा ते काळा या दरम्यान विविध प्रकारच्या छटांचा असतो. शेंगेवर सतत राहणारा किंजलाचा अवशेष असतो. बियांवर संधिरेषा (लांबट कंगोऱ्यासारखा भाग) असते.

पावट्यांमध्ये दोन प्रमुख प्रकार व अनेक उपप्रकार उपलब्ध असून त्यांची लागवड भारतातील भिन्न राज्यांत व भारताबाहेरील इतर देशांत केलेली आढळते.लागवडीच्या अनेक उपप्रकारांतील लाक्षणिक भेद स्पष्टपणे वर्णिलेले नसल्याने ते परस्परांपासून वेगळे ओळखणे कठीण जाते.टिपिकसलिग्नोसस हे दोन प्रमुख प्रकार पुढे स्थूलमानाने वर्णिले आहेत.

टिपिकस (Bonavist)

टिपिकस : (म. पावटा; इं. बोनाविस्ट). हिचे वर चढणारे वेल असून ते आशिया, आफ्रिका,अमेरिका व भारत या प्रदेशांत एक वर्षापुरतेच बागेत लावले जातात. या वेलीला विशिष्ट वास येतो. फुले,शेंगांचे विविध आकार व आकारमान आणि बियांचे रंगरूप यांतील विविधता लक्षात घेऊन उपप्रकार केलेले आहेत. कोवळ्या शेंगा मांसल असून त्यांची किनार पांढरी, हिरवी किंवा जांभळी असते. बिया पांढऱ्या, पिवळ्या,तपकिरी जांभळ्या अथवा काळ्या असतात.शेंगा व बिया ह्या दोन्हींचा उपयोग स्वयंपाकात करतात; वेल गुरांना खाऊ घालतात.

लिग्नोसस (Australian bean)

लिग्नोसस : (इं. ऑस्ट्रेलियन बीन, फील्ड बीन). हा झुडपासारखा प्रकार शेतात लावण्यास वापरतात. याची पाने वरच्या प्रकारापेक्षा लहान असून शेंगांची साल जाड व धागायुक्त असते. त्या रुंद,चपट्या, आयत असून बिया ४-६ व गोलसर, पांढऱ्या, तपकिरी किंवा काळ्या असतात.तमिळनाडू व कर्नाटक येथे बरीच मोठी लागवड असून ते महत्त्वाचे पीक मानतात. सुरत,बेळगाव, कुलाबा आणि रत्नागिरी जिल्ह्यांत हे पीक काढतात.भारतीय कृषि-संशोधन-संस्थेने ‘अर्ली प्रॉलिफिक’ ह्या प्रकाराची लागवडीकरिता शिफारस केली असून तो वसंत व शरद या दोन्ही हंगामांत पेरणीस योग्य आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने महाराष्ट्रासाठी क्र. २१, क्र. १२५ – ३६ व सिलेक्शन २ के २ या प्रकारांची शिफारस केली आहे; याच्या शेंगा फिकट हिरव्या, लांब व गुळगुळीत असतात. खाण्यास त्या उत्तम मानल्या जातात; त्यांचे गुच्छ येतात. कोवळ्या शेंगांची भाजी करतात.जून शेंगांतील दाण्यांची उसळ करतात. श्रावण घेवड्यापेक्षा त्यात प्रथिन जास्त असते. पावट्याचे वेल गुरांना खाऊ घालतात.पावट्याच्या कोवळ्या शेंगांतील खाद्य भागातील भिन्न घटकांचे १०० ग्रॅममधील प्रमाण पुढे दिल्याप्रमाणे असते : जलांश ८६.१ ग्रॅ.; मेद ०.७ ग्रॅ.; प्रथिन ३.८ ग्रॅ.; धागा (चोथा) १.८ ग्रॅ.; कार्बोहायड्रेटे ६.७ ग्रॅ.; खनिजे ०.०९ ग्रॅ.; यांशिवाय अ आणि क जीवनसत्त्वे, निकोटिनिक अम्ल,रिबोफ्लाविन,थायमीन,ऑक्झॅलिक अम्ल, काही धातू, गंधक, फॉस्फरस इ. असतात.पावट्याच्या सुक्या बियांच्या (डाळीच्या) पिठात १०० ग्रॅममध्ये पुढील घटक आढळतात : जलांश ९.६ ग्रॅ.; प्रथिन २४.९ ग्रॅ.; मेद (स्निग्ध पदार्थ) ०.८ ग्रॅ.; कार्बोहायड्रेटे ६०.१ ग्रॅ.; खनिजे ३.२ ग्रॅ.; चोथा १.४ ग्रॅ.; कॅल्शियम ०.०६ ग्रॅ.;फॉस्फरस ०.४५ ग्रॅ.; यांशिवाय लोह २.० मिग्रॅ. व निकोटिनिक अम्ल १.८ मिग्रॅ. असते. ह्यातील प्रथिन कुळिथामधील प्रथिनापेक्षा अधिक पचनशील असते. पावटे (बीजे) वाजीकर (कामोत्तेजक), ज्वरनाशी, दीपक (भूक वाढविणारे) असून नाकातून होणाऱ्या रक्तस्रावावर व कफविकारांवर गुणकारी आहेत.

लागवड व मशागत : या पिकाला सुरुवातीस उष्ण हवामान व शेंगा लावण्याची सुरुवात झाल्यावर थंड व कोरडे हवामान आवश्यक असते. पाण्याचा उत्तमपणे निचरा होणाऱ्या मध्यम काळ्या आणि पोयट्याच्या जमिनीत हे पीक उत्तम येते. स्वतंत्र मुख्य पीक म्हणून याची क्वचित लागवड करतात. बहुधा मिश्रपीक म्हणून ऊस, हळद, मिरची, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी इ. या पिकांबरोबर घेतात. ऊस, हळद व मिरची या पिकांच्या भोवताली पावट्याची लागवड करतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात बाजरी व खरीप ज्वारी या पिकांचे बी पेरताना मधून मधून पावट्याचे, चार किंवा आठ ओळींचे पट्टे, दोन ओळींतील अंतर ६०-७५ सेंमी. ठेवून पेरतात.ज्या पिकाबरोबर हे मिश्रपीक म्हणून लावतात त्या पिकाला दिल्या जाणाऱ्या खताचा, पाण्याचा व आंतर मशागतीचा फायदा आपोआप या पिकाला मिळतो. त्याबाबतीत वेगळी काळजी घ्यावी लागत नाही.

पावट्याच्या वेलांच्या जवळ झाडाच्या लहान लहान फांद्या किंवा कपाशीच्या पळकाट्या रोवून त्यांच्यावर वेल चढवितात. हिवाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे लागणीनंतर साडेतीन ते चार महिन्यांनी शेंगांची पहिली तोडणी करतात. हिरव्या पण पूर्ण भरलेल्या शेंगा भाजीसाठी तोडतात. शेंगा तोडणीचा हंगाम अडीच ते तीन महिने टिकतो. या मुदतीत चार-पाच तोडे मिळतात.हेक्टरी ५,००० ते ८,००० किग्रॅ. हिरव्या शेंगा मिळतात.

रोग व कीड : या पिकावरील रोग व कीड यांच्या माहितीकरिता ‘घेवडा’, ‘श्रावण’ व ‘वाटाणा’ या नोंदी पहाव्यात.

संदर्भ :

  • Chauhan, D.V.S. Vegetabel Production in India, Agra, 1972.
  • Choudhury, B. Vegetables, New Delhi, 1967.
  • C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol.III, New Delhi, 1952.

प्रतिक्रिया व्यक्त करा