वाटाणा ही वनस्पती फुलपाखरासारख्या पाकळ्या असणार्‍या पॅपिलिऑनेसी (Papilionaceae) कुलातील आहे. पाच पाकळ्यांपैकी बाहेरील दल मोठा मानक (Vexillum) म्हणून ओळखला जातो आणि दोन्ही बाजूकडील पाकळ्या ह्या पंख (elae) आणि उरलेल्या दोन पाकळ्या आतील बाजूने एकत्रित होडीच्या आकाराची रचना, कील (Carina) तयार करतात. मधमाश्या मोठ्या, रंगीत मानकामुळे आकर्षित होतात आणि पंखावर उतरतात. पंखावर बसलेल्या मधमाशीच्या वजनामुळे कील खाली येते आणि त्यामुळे परागकोश आणि कुक्षी बाहेर येऊन माशीच्या शरीरावर परागकण पडतात. जेव्हा ती मधमाशी त्या फुलावरून उडून जाते, तेव्हा परागकोश आणि कुक्षी आपल्या मूळ जागेवर परततात. परागकण घेऊन मधमाश्या दुसऱ्या फुलाकडे जातात, तेव्हा मधमाशीच्या भारामुळे परागकोश आणि कुक्षी बाहेर येतात आणि माशीच्या पाठीवर असलेल्या आधीच्या फुलातील परागकण कुक्षीला चिकटून परपरागीभवनाची क्रिया पूर्ण होते.

संदर्भ : https://www.researchgate.net/publication/276120869 From keel to inverted keel flowers: functional morphology of “upside down” papilionoid flowers and the behavior of their bee visitors

समीक्षक : शरद चाफेकर