शरीराच्या प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक) प्रणालीमध्ये प्रामुख्याने रक्तातील पांढर्‍या पेशी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. लसिका पेशी (एक प्रकारच्या पांढर्‍या पेशी) व त्यापासून तयार होणारी प्रतिपिंडे शरीरात प्रवेश करणार्‍या जीवाणूंचा नायनाट करतात आणि शरीराला निरोगी ठेवण्याचा प्रयत्‍न करतात.

शरीराच्या प्रतिरक्षा प्रणालीचे कार्य सुरळीत होत नसेल, तर गंभीर मानवी आजार संभवतात. या प्रणालीतील स्वयंनियमनाच्या अभावामुळे आत्मप्रतिरक्षा रोग होतात. यात प्रतिरक्षा प्रणाली बाह्य पदार्थ आणि शरीरातील स्वपदार्थ यांच्यात फरक करू शकत नाही; लसिका पेशी आणि प्रतिपिंडे शरीरातीलच पेशी आणि ऊतीच्या घटकांवर हल्ला करतात. परिणामी अ‍ॅडिसन रोग, असाध्य पांडुरोग, संधिवात, संधिज्वर, चर्मकाठिण्य, अवटुशोथ आणि मूत्रपिंडाचे विकार असे आत्मप्रतिरक्षा रोग उद्भवतात.

आज ४० पेक्षा जास्त मानवी आजार हे निश्चित किंवा संभाव्य आत्मप्रतिरक्षा रोग म्हणून वर्गीकृत केलेले आहेत आणि जगाची ५ % ते ७ %  लोकसंख्या या रोगांनी बाधित आहे. बहुतांशी सर्व आत्मप्रतिरक्षा रोग कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा संभाव्य लक्षणांशिवाय होतात आणि बहुतेक रुग्ण या रोगांमुळे त्रस्त झालेले दिसतात. विशिष्ट विषाणूंमुळे आणि जीवाणूंमुळे प्रतिरक्षा प्रणालीच्या कार्यात अडथळा निर्माण होत असावा, असा एक अंदाज आहे. या रोगांची कारणे अजूनही स्पष्ट झालेली नाहीत. समृद्धीमुळे बदललेल्या जीवन पद्धतीच्या दुष्परिणामांची ही काही उदाहरणे आहेत, असा एक मतप्रवाह आहे. उदा., संधिवात आणि लठ्ठपणा एकमेकांशी निगडित असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने विकसित देशांत संधिवात हा सर्वसामान्य रोग असल्याचे जाहीर केलेले आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक असून रजोनिवृत्तीनंतर हे रोग होतात.

आत्मप्रतिरक्षा रोगांवर उपचार करताना सामान्यपणे प्रतिरक्षा प्रणाली सुधारणार्‍यावर भर देतात. या रोगांवर कॉर्टिकोस्टेरॉइड औषधे गुणकारी ठरतात.