जीवाणूंमुळे मनुष्याला होणारा एक प्राणघातक संक्रामक रोग. एंटेरोबॅक्टेरिएसी कुलातील यर्सिनिया पेस्टिस  या जीवाणूंमुळे प्लेग हा रोग होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २००७ सालापर्यंत प्लेग हा एक साथीचा आजार मानला जात होता.

यर्सिनिया पेस्टिस या जीवाणूंचा प्रसार निरोगी व्यक्तीच्या शरीरात पुढील मार्गांनी होऊ शकतो: प्लेगबाधित रुग्णाच्या शिंकण्यातील कण निरोगी व्यक्तीच्या शरीरावर पडल्याने व त्याने वापरलेल्या वस्तू हाताळल्याने, य. पेस्टिस  जीवाणुबाधित दूषित अन्न किंवा पाणी यांचे सेवन केल्याने किंवा य. पेस्टिस  जीवाणूंचा प्रसार कीटक तसेच अन्य प्राण्यांमार्फत झाल्याने. १८९४ मध्ये फ्रेंच-स्विस जीवाणुतज्ज्ञ ॲलेक्झांडर यर्सिन आणि जपानी वैज्ञानिक किटाझाटो यिबासाबुरो यांनी हा जीवाणू स्वतंत्ररीत्या प्रथम शोधला. पाश्‍चर इन्स्टिट्यूटचा गौरव करण्यासाठी या जीवाणूला पाश्‍चुरेला पेस्टिस असे नाव दिले; परंतु यर्सिन यांनी या जीवाणूंवर संशोधन पुढे चालू ठेवल्यामुळे नंतर त्या जीवाणूंना यर्सिनिया पेस्टिस हे नाव दिले गेले.

सूक्ष्मदर्शिकेखाली दिसणारे प्लेग रोगाचे यर्सिनिया पेस्टिस जीवाणू

निसर्गात जेथे विशेषेकरून कृंतक गणातील प्राणी मोठ्या संख्येने राहतात अशा अधिवासात यर्सिनिया पेस्टिस जातीचे जीवाणू आढळून येतात. हे जीवाणू प्लेग रोगाचे कारक असतात. प्लेग हा रोग प्रथम झेनोप्सायला केओपिस  या जातीच्या पिसवांना होतो. या पिसवा उंदराच्या शरीरावर वाढत असल्याने उंदीर हा प्लेगचा पहिला बळी ठरतो. महत्त्वाचे म्हणजे प्लेगचा वाहक उंदीर नसतो. मात्र प्लेगबाधित उंदरावर वाढलेली प्लेगवाहक पिसू जेव्हा मनुष्याला दंश करते तेव्हा मनुष्यामध्ये प्लेग रोगाचे संक्रामण होते. प्लेगचे जीवाणू पिसूमध्ये गुणित होत जातात, ते एकमेकांना चिकटतात आणि त्यांची गुठळी तयार होते. जीवाणूंच्या या अशा प्रकारे तयार झालेल्या गुठळीमुळे पिसूचा जठरमार्ग बंद होतो आणि तिची उपासमार होते. मग ती पिसू आश्रयीला चावते आणि अन्न मिळवत राहते. मात्र तरीही तिची भूक शमत नाही. पिसू तिच्या शरीरातील दूषित रक्त मनुष्याच्या (आश्रयीच्या) शरीरावर जेथे दंश केलेला असतो तेथील जखमेवर ओकते. अशा प्रकारे प्लेगच्या जीवाणूंचा प्रवेश निरोगी व्यक्तीच्या शरीरात होतो आणि त्या व्यक्तीला प्लेग हा रोग होतो. त्यानंतर पिसू मरून जाते.

प्लेग या रोगाचे लक्षणांनुसार सामान्यपणे खालील तीन प्रकार दिसून  येतात.

ब्युबॉनिक प्लेग : (लसीका ग्रंथीचा प्लेग). जेव्हा प्लेगबाधित पिसू शरीराला दंश करते, तेव्हा दंशाच्या जागी ती दूषित रक्त सोडते. त्यामुळे प्लेगचे जीवाणू शरीरात शिरतात. शरीरातील भक्षकपेशींनी जरी या जीवाणूंचे भक्षण केले, तरी ते जिवंत राहतात आणि त्यांचे प्रजनन होत राहते. शरीरात शिरल्यावर ते लसीका संस्थेत प्रवेश करतात आणि अंतराली द्रवाचा ऱ्हास घडवून आणतात. तसेच हे जीवाणू शरीरात अनेक प्रकारांचे जीवविष निर्माण करतात. लसीका वाहिनीवाटे हे जीवाणू लसीका ग्रंथीपर्यंत पोहोचतात व दाह निर्माण करतात आणि त्यामुळे लसीका ग्रंथींना सूज येते. रुग्णाला थंडी वाजून ताप येतो. जांघेत किंवा काखेत सूज येऊन खूप दुखते. या अवस्थेत उपचार न केल्यास या रोगाचे संक्रामण रक्तप्रवाहात मिसळून सेप्टिसेमिक प्लेग होतो किंवा फुप्फुसाला संक्रामण झाल्यास न्यूमोनिक प्लेग होऊ शकतो.

सेप्टिसेमिक प्लेग : (पूयुक्त प्लेग). ब्युबॉनिक प्लेग या रोगाचे वेळीच निदान न झाल्यास तसेच उपचार न केल्यास रक्तवाहिन्यांतून हे जीवाणू शरीरभर पसरतात आणि पूयुक्त प्लेग होऊ शकतो. लसीका ग्रंथीचे स्राव रक्तवाहिन्यांतून जात असल्यामुळे प्लेगचे जीवाणू शरीराच्या सर्व भागांत पोहोचतात. या प्रकारच्या प्लेगमध्ये तयार झालेल्या जीवविषामुळे शरीरात गाठी तयार होतात. या गाठींमुळे यकृत, प्लीहा, मूत्रपिंड यांतील ऊतींचा ऱ्हास होतो आणि रक्त गोठण्याच्या क्रियेवर परिणाम होऊन त्वचेत आणि इतर इंद्रियांमध्ये रक्तस्राव होऊन शरीरावर लाल-काळे चट्टे दिसू लागतात. प्रतिजैविकांचे उपचार केल्यास रुग्ण वाचू शकतो. हा प्लेग जीवघेणा असून ज्या रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसू लागतात असे रुग्ण फार काळ जगत नाहीत.

न्यूमोनिक प्लेग : (फुप्फुसाचा प्लेग). फुप्फुसाला संक्रामण झाल्यास हा प्लेग उद्भवतो. रुग्णाच्या संपर्कातून, विशेषेकरून शिंकांमधून बाहेर पडणाऱ्या तुषारांतून याचा प्रसार होतो. जीवाणूचा उबवणकाल २–४ दिवस असतो. मात्र, काही वेळा हा काल फक्त काही तासांचा असू शकतो. डोकेदुखी, ताप येणे, अशक्तपणा, थुंकीतून व ओकारीतून रक्त पडणे ही याची लक्षणे आहेत. तातडीने उपचार न झाल्यास १–६ दिवसांत रुग्ण दगावू शकतो.

लस आणि प्रतिजैविके:  १८९७ मध्ये मुंबईत वॉल्डेमार हाफकिन या रशियन वैद्याने ब्युबॉनिक प्लेग या रोगावरील लस प्रथम शोधून काढली. प्लेग या रोगावर प्रतिजैविकांचे उपचार अधिक प्रभावी ठरतात. स्ट्रेप्टोमायसिन, क्लोरँफिनिकॉल, टेट्रासायक्लिन, डोऑक्सिसायक्लिन, जेंटामायसिन इत्यादी प्रतिजैविके या रोगावर वापरली जातात.

प्लेग झालेला रुग्ण

इतिहास: प्लेग या रोगाच्या साथी प्राचीन काळापासून येत असल्याचा उल्लेख वैद्यकशास्त्राच्या इतिहासात आढळतो. प्लेगची पहिली ज्ञात जगद्‌व्यापी साथ इ. स. ५४१–५४२मध्ये पसरली होती. ही साथ चीनमध्ये पसरली होती आणि तिचा प्रसार आफ्रिकेपर्यंत झाला होता. साथ जेव्हा शिगेला पोहोचली, तेव्हा दररोज सु. १०,००० लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळाली आहे. या रोगाची दुसरी मोठी ज्ञात साथ १३४७–१३५१ या कालावधीत आली. आशिया, यूरोप आणि आफ्रिका या तीनही खंडांत ही प्लेगची साथ पसरली होती. त्या वेळी जगाची लोकसंख्या ४५ कोटींवरून ३७ कोटींपर्यंत कमी झाल्याचे मानतात. प्लेगची तिसरी ज्ञात साथ १८५५ मध्ये चीनच्या युनान प्रांतात पसरली. या साथीत चीनमध्ये आणि भारतात मिळून सु. १ कोटी २० लाख लोक मृत्युमुखी पडले होते. १८९६ मध्ये भारतातील मुंबई इलाख्यात प्लेगची मोठी साथ पसरली होती. या साथीत सु. ४०,००० लोक मरण पावले. १९९४ मध्ये सुरत शहरात प्लेगची साथ उद्भवली होती. प्रशासनाने वेळीच योग्य धोरणे राबविल्यामुळे या साथीत केवळ ५४ लोक दगावले. मात्र, सु. ३ लाख लोक तेव्हा स्थलांतरित झाले होते. १९९४ आणि २०१० मध्ये पेरू या देशात आणि अमेरिकेतील संयुक्त संस्थांनामधील ऑरेगन राज्यामध्ये प्लेगचे रुग्ण आढळले होते.

प्रतिबंधक उपाय: प्लेग या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी काही उपाय आवश्यक आणि उपयुक्त असतात. उदा., उंदीर व घूस या प्राण्यांची बिळे होऊ न देणे किंवा त्यांना खाद्य न देणे, मृत प्राण्यांवर किंवा उंदरांवर कीटकनाशकांचा वापर करून पिसवा न होऊ देणे. विशेषत: परिसर स्वच्छ ठेवल्यास प्लेग आणि इतर संक्रामक रोगांचे प्रमाण आपोआपच आटोक्यात येते. १९९४ साली भारतात उद्भवलेल्या प्लेगच्या साथीनंतर आजपर्यंत पुन्हा प्लेगची साथ आलेली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा