आंबा हा सदाहरित वृक्ष अॅनाकार्डिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मॅँजिफेरा इंडिका आहे. भारतात आंब्याची लागवड सु. ४,००० वर्षांपूर्वीपासून होत असावी, असे मानतात. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत यूरोपातील लोकांनी भारतातून ही वनस्पती अन्य उष्णकटिबंधीय देशांत नेली. ब्राझील, भारत, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, फिलिपीन्स, मध्य व दक्षिण अमेरिका इ. प्रदेशांत या वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. भारतात जम्मू आणि काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्यांतील टेकड्यांचे प्रदेश सोडून सर्वत्र आंब्याची लागवड होते.
हा वृक्ष सु. २५ मी. पर्यंत उंच वाढू शकतो. खोडाची साल जाड, काळपट, खरबरीत व भेगाळलेली असते. पाने साधी, गर्द हिरवी, एकाआड एक, चकचकीत, लांबट भाल्यासारखी व चिवट असतात. देठाचा खालचा भाग फुगीर असतो. फुले लहान एकलिंगी वा द्विलिंगी, एकाच झाडावर, लालसर किंवा पिवळट व तिखट वासाची असून परिमंजरीत (मोहोर) येतात. साधारणपणे जानेवारी-मार्चमध्ये आंब्याला मोहोर येतो. मोहोर आल्यानंतर साधारण पाच महिन्यांत फळ पिकते. फळांची साल हिरवी, नारिंगी, शेंदरी लाल किंवा पिवळ्या रंगाची असू शकते. फळात मोठी, चपटी व एक कोय असते. फळांचा आकार, स्वाद, रंग वगैरे गुण प्रकाराप्रमाणे निरनिराळे असतात. सालीने वेढलेल्या फळात रसाळ गर असतो. काही फळांमधील गर तंतुमय असतो. गरात ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्वे असतात. कच्या फळांना कैरी म्हणतात. कैरी आंबट, पाचक व शीतल तर पक्व फळे (आंबा) गोड, सारक व मूत्रल असतात. कच्ची फळे लोणची, मुरंबे, पन्हे व आमचूर यांकरिता, तर पिकलेली फळे खाण्यास, आंबापोळी आणि मिठाईसाठी उपयुक्त असतात. खोडाच्या सालीतील टॅनिनामुळे ती कातडी कमाविण्यास आणि रेशीम, सूत व लोकर रंगविण्यास वापरतात. आंब्याचे लाकूड बांधकाम, शेतीची अवजारे आणि खोकी तयार करण्यासाठीही वापरतात.
भारतात आंबा हे नगदी पीक असून त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. क्षेत्रफळाचा विचार करता आंब्याच्या लागवडीत उत्तर प्रदेश राज्याचा क्रमांक पहिला लागतो. आंब्याचे रायवळ, तोतापुरी व कलमी इत्यादी प्रकार आहेत. कलमी आंब्यांत हापूस, पायरी, नीलम, केशर, रत्ना इ. जाती प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील हापूस जगप्रसिद्ध असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ त्याने काबीज केली आहे. आंबा प्रामुख्याने उष्ण प्रदेशातील असून त्याला अतिशीत हवामान वा कडाक्याची थंडी मानवत नाही. फळे तयार होताना त्याला कोरडे हवामान लागते. जगातील अनेक उत्कृष्ट फळांपैकी आंबा एक फळ असून त्याला उष्ण प्रदेशातील ‘फळांचा राजा’ असे म्हणतात.