(प्लांट फायबर). वनस्पती जगतातील सु. २,००० वनस्पतींपासून तंतू मिळतात किंवा काढले जातात. हे तंतू खोडातील, पानातील किंवा फळातील बारीक व जाड भित्ती असलेल्या पेशी किंवा ऊती यांच्यापासून मिळवितात. मात्र, व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे तंतू सु. ५० वनस्पतींपासून मिळवितात. वनस्पतिजन्य तंतूंचे तंतुबल हे त्यांवर होणारा पाणी, उष्णता व सूक्ष्मजीव यांचा परिणाम यांवर अवलंबून असते.

द्विदलिकित वनस्पतींच्या पानांच्या देठापासून किंवा खोडापासून जे तंतू काढले जातात, त्यांना मऊ तंतू म्हणतात. खोडाच्या अंतर्सालीपासून काही मीटर लांबीचे तंतू मिळतात. ते लांबट दृढ पेशींपासून बनलेले असतात. त्यांचा व्यास २०–३० म्यूमी. (मायक्रॉन) असून अडीच ते अनेक मिमी. लांब असतात. खोड, देठ पाण्यात कुजवून किंवा सौम्य रसायनांची प्रक्रिया करून ते मिळविले जातात. ताग, अंबाडी यांच्यापासून तंतू मिळविण्यासाठी खोड जुडी करून बांधून पाण्यात ठेवतात. अनेक दिवस पाण्यात ठेवल्याने जीवाणूंची प्रक्रिया होऊन तंतू खोडापासून विलग होतात. त्यानंतर हे तंतू स्वच्छ पाण्याने धुतात आणि उन्हात, मोकळ्या जागी वाळवतात. या प्रक्रियेने ताग, हेंप, अंबाडी (केनाफ), फ्लॅक्स, रॅमी, सन, जंगली कापूस (युरेना), आग्या, खाजोटी इ. वनस्पतीपासून तंतू मिळवितात.

तागापासून मिळणारे तंतू किंवा धागे यांचा उपयोग पोते, गालिचे, लिनोलियम यांच्या आधारस्तरासाठी, आवेष्टनासाठी, सुतळी व दोरे तयार करण्यासाठी, तसेच विद्युत निरोधनासाठी करतात. हेंप म्हणजे गांजा देणारी वनस्पती. ही वनस्पती जगात सर्वत्र वाढते. हेंपचे तंतू दोन मीटर लांबीचे असतात. तंतू बळकट असल्याने दोर व पोती करण्यासाठी त्यांचा वापर होतो.

अळशीच्या म्हणजेच फ्लॅक्सच्या तंतूमध्ये भरपूर सेल्युलोज असते. हे तंतू तागाच्या तंतूपेक्षा बारीक, बळकट व चकचकीत असतात. फ्लॅक्सच्या सेल्युलोजाचे व इतर जैवरसायनांचे विरंजन करून त्यापासून पांढरे स्वच्छ धागे मिळवतात. या धाग्यांपासून कपड्यांचे व लहानमोठ्या आच्छादक रुमालांचे कापड तयार करता येते. हे तंतू बळकट असल्याने त्यांचा उपयोग मासे पकडण्यासाठी जाळी, शिलाईचा दोरा तसेच आग विझविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नळ्यांकरिता केला जातो. या तंतूंपासून तयार होणाऱ्या कापडाला ‘लिनन’ म्हणतात. या कापडाचा मऊपणा आल्हाददायक व सुखद असल्याने जगात अळशी (फ्लॅक्स) वाढवली जाते.

वनस्पतिजन्य तंतू : (१) अंबाडी, (२) रॅमी, (३) नारळाचे वेष्टण, (४) कापूस.

बंगाली भाषेत कांकुरा किंवा चिनी गवत या नावाने ओळखली जाणारी तंतुमय वनस्पती म्हणजे रॅमी. रॅमीचे तंतू बळकट परंतु ठिसूळ असतात. तंतूचे विरंजन केल्यास ते पांढरे शुभ्र होतात आणि रंगवायला सोपे जातात. रॅमीच्या खोडाच्या पट्ट्या काढून त्यावर रसायनांची प्रक्रिया करून उच्च प्रतीचे तंतू मिळवतात. या तंतूतील चिकट पदार्थ निघून गेल्यावर ते पांढरे, मुलायम व रेशमासारखे तलम होतात. चीन व जपान या देशांत याचे उत्पादन केले जाते. खास करून कपड्यांसाठी या तंतूंचा वापर होतो. अंबाडी, सन, जंगली कापूस तसेच आग्या, खाजोटी (नेटल) इ. वनस्पतींच्या खोडापासून कमी-जास्त प्रमाणात तंतू काढण्यात येतात. त्यांचा उपयोग दोर, पोती व गालिच्यांचे अस्तर यांच्या निर्मितीसाठी करतात.

काही एकदलिकित वनस्पतींच्या पानांपासून कठीण तंतू मिळवतात. या तंतूंचा व्यास खोडापासून मिळणाऱ्या तंतूपेक्षा जास्त असून हे तंतू कठीण असतात. या तंतूंचा रंग फिकट बदामी किंवा करडा असतो. पानांपासून तंतू हाताने व यंत्राच्या साहाय्याने वेगळे करतात. कँटाला, एस्पार्टो, लेटोना, मॉरिशस काबुऱ्या, माड, कॅरोआ, नागीन इ. वनस्पतींच्या पानापासून तंतू काढतात. कॅंटाला, सिसाल तसेच वन्य अननस इत्यादींच्या पानातून काढलेले तंतू थोड्या प्रमाणात स्थानिक उपयोगासाठी वापरातात. मात्र हे तंतू रंग व बळकटपणा यादृष्टीने हलक्या दर्जाचे असतात. सर्वांत जास्त प्रमाणात व विविध उपयोगात आणला गेलेला तंतू म्हणजे कापूस वनस्पतीपासून प्राप्त झालेला तंतू. कापसाचे बोंड पिकल्यावर ते तडकते आणि आतील कापसाचा ओलावा कमी झाला की, त्यातील तंतूंना विशिष्ट आकार येतो. सूक्ष्म निरीक्षण केले तर तो आकार पीळ दिलेल्या फितीसारखा दिसतो (पहा : कापूस).

पांढरी किंवा काटेरी सावर, लाल सावर, सामोहू या वनस्पतींच्या बियांभोवती परंतु फळांच्या सालीपासून (वाढलेले) तंतू काढतात. या तंतूच्या गुणधर्मानुसार त्यांचा उपयोग भरणद्रव्य व उष्णतानिरोधक म्हणून करतात. नारळापासून काथ्या तयार करतात. काथ्यापासून हातऱ्या, चटया, दोर, ब्रश, कुंचले, पायपोस इ. तयार करतात. वनस्पती तंतूंचा उपयोग कापड, दोर, ब्रश, कुंचले, भरणपदार्थ, कागद, फेल्ट तंतू आणि सेल्युलोज व इतर रासायनिक पदार्थ यांच्या निर्मितीत कच्चा माल म्हणून करतात. रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर कापूस, फ्लॅक्स व रॅमी यांच्या तंतूमध्ये सेल्युलोजचे प्रमाण जास्त असल्याचे आढळते, तर पानांपासून मिळणाऱ्या तंतूंमध्ये लिग्निन, पेक्टीन व सेल्युलोज हे पदार्थ आढळतात. वनस्पतींप्रमाणे प्राण्यांपासूनही तंतू मिळवता येतात, त्यांना प्राणिजन्य तंतू असे म्हणतात. (पहा : प्राणिजन्य तंतू).